
जितेंद्र दुर्गे, हेमंत डिके
सोयाबीन हे पीक ओलितावर किंवा पावसाच्या पाण्यावरही घेतले जाते. ओलिताची सोय असलेल्या आणि ठिबक सिंचनाची सोय उपलब्ध असलेल्या ठिकाणी दोन लॅटरलमधील अंतरानुसार अथवा तीन ते साडेतीन फुटावर सऱ्या पाडून गादीवाफे (म्हणजेच शेतात रुंद वरंबा व अरुंद सऱ्या) तयार करून घ्यावे. साधारणत: दोन ते अडीच फुटाचे वरंबा अथवा गादीवाफे तयार होतील. ते मजुरांद्वारे सपाट करून त्यावर ठिबकच्या लॅटरल पसरून घ्याव्यात.
लॅटरलच्या दोन्ही बाजूला अर्धा ते पाऊण फूट अंतर ठेवून दोन झाडातील अंतर ६ इंच ते ९ इंच ठेवत मानवचलीत टोकण यंत्राने अथवा मजुरांद्वारे सोयाबीन बियाणे टोकावे. तुषार सिंचनाची सोय असलेल्या ठिकाणीही वरील प्रमाणे गादीवाफ्यावर लागवड करता येईल. मात्र ओलिताची सोय नसलेल्या (म्हणजेच कोरडवाहू) शेतकऱ्यांनी गादीवाफा पद्धतीचा अवलंब करू नये. पावसात मोठा खंड पडल्यास मोठे नुकसान होऊ शकते.
टोकण करताना
मानवचलित टोकन यंत्राच्या साहाय्याने अथवा मजुरांद्वारे टोकण पद्धतीने जोडओळीत सोयाबीनची लागवड करावयाची झाल्यास, ट्रॅक्टरचलित पेरणीयंत्राणे अथवा बैलजोडीच्या साहाय्याने संपर्ण शेतात काकर पाडून घ्यावेत. त्यानंतर टोकण करतेवेळी प्रत्येक तिसरी ओळ खाली ठेवावी. म्हणजेच जोडओळीत पेरणी होईल.
सोयाबीनची उगवण झाल्यानंतर खाली ठेवलेल्या तिसऱ्या ओळीच्या ठिकाणी डवऱ्याच्या जानोळ्याला दोरी गुंडाळून दांड पाडून घ्यावेत. ट्रॅक्टरचलित पेरणी यंत्राने काकर पाडताना जोडओळींचा अंदाज घेऊन खताच्या बॉक्समधील कप्प्यांच्या माध्यमातून जोडओळींमध्ये खत देता येईल. बैलजोडीचलित काकरीने काकर पाडतानासुद्धा जोडओळींचा अंदाज घेऊन सरत्याचा वापर करून खत देता येईल. ओलित तसेच कोरडवाहू दोन्ही परिस्थितीत या पद्धतीने सोयाबीन जोड ओळीत घेता येईल.
ट्रॅक्टरचलित पेरणी यंत्राद्वारे जोडओळीत पेरणी
नऊ दात्यांच्या ट्रॅक्टरचलित पेरणीयंत्राने पेरणी करताना यंत्राच्या बियाण्याच्या व खताच्या बॉक्समधील कप्प्यातील अलीकडून व पलीकडून दोन नंबरची व मधली नळी (दोन नंबर, पाच नंबर व आठ नंबरची नळी) टिकली लावून बंद ठेवावी. ट्रॅक्टर प्रत्येक वेळी पलटून येताना व जाताना नेहमीच्या प्रचलित पद्धतीने पेरणी केल्यास जोडओळीत पेरणी होईल. सोबतच खतही देता येईल.
सात दात्याच्या ट्रॅक्टरचलित पेरणीयंत्राने पेरणी करताना पेरणी यंत्राच्या बियाण्याच्या व खताच्या बॉक्समधील कप्प्यातील पहिली, मधली व शेवटची नळी टिकली लावून बंद करावी. ट्रॅक्टर प्रत्येक वेळी पलटून येताना व जाताना पेरणी यंत्राचे शेवटचे दाते खाली ठेवलेल्या काकरात ठेवावे. म्हणजे जोडओळीत पेरणी होईल. सोबतच जोडओळींना खतसुद्धा देता येते.
सहा दात्याच्या ट्रॅक्टरचलित पेरणी यंत्राने पेरणी करताना पेरणी यंत्राच्या बियाण्याच्या व खताच्या बॉक्समधील अलिकडून दोन नंबरची व पलिकडून दोन नंबरची नळी टिकली लावून बंद करावी. ट्रॅक्टर प्रत्येक वेळी पलटून येताना व जाताना नेहमीच्या प्रचलित पद्धतीसारखी पेरणी केल्यास जोडओळीत पेरणी होईल. सोबतच जोडओळींना खतसुद्धा देता येईल.
छोट्या ट्रॅक्टरच्या पाच दात्यांच्या पेरणी यंत्राने पेरणी करताना पेरणी यंत्राच्या बियाण्याच्या व खताच्या बॉक्समधील मधल्या कप्प्यातील नळी टिकली लावून बंद करावी. ट्रॅक्टर प्रत्येक वेळी पलटून येताना व जाताना एक ओळ सुटेल एवढे अंतर सोडावे. म्हणजे जोडओळीत पेरणी होऊन, सोबतच खतसुद्धा देता येईल.
ओलिताचे शेत असो की कोरडवाहू वरील कोणत्याही पद्धतीने जोडओळीत पेरणी केली तरी सोयाबीनच्या उगवणीनंतर खाली राहिलेल्या तिसऱ्या ओळीत दांड पाडून घ्यावे. त्यासाठी डवऱ्याच्या जानोळ्याला दोरी गुंडाळल्यास दांड पाडणे सोपे जाते. यामुळे जोडओळीतील सोयाबीन वरंबावर येईल.
बैलजोडीने पेरणी करताना
बैलजोडीचलीत तीन दात्यांच्या काकरी व सरत्याने जोडओळीत पेरणी करताना पहिल्या व तिसऱ्या सरत्यातून बियाणे व खत द्यावे. मधले सरते डमी ठेवावे. (म्हणजेच या सरत्यातून बियाणे व खत देऊ नये.) बैलजोडी या धुऱ्यावरून त्या धुऱ्यावर पोहोचल्यानंतर पलटून येताना व जाताना प्रचलित पद्धतीने पेरणी करावी.
जोडओळीत पेरणी होईल. त्याच वेळी जोडओळींना खत सुद्धा देता येईल. सोयाबीनची उगवण झाल्यानंतर खाली ठेवलेल्या तिसऱ्या ओळीच्या ठिकाणी डवऱ्याच्या साह्याने जानोळ्याला दोरी गुंडाळून दांड पाडून घ्यावे. म्हणजे जोडओळीतील सोयाबीनचे पीक वरंबावर येईल. ओलित असो की कोरडवाहू सर्व शेतकरी या पद्धतीने जोडओळीत सोयाबीनची पेरणी करू शकतात.
बैलजोडीचलित चार दात्याच्या चौफणीने जोडओळीत पेरणी करताना फक्त मधल्या दोन फण्यावर पेरणी करावी. काठावरील दोन्ही फण रिकामे ठेवावेत. पलटून येताना व जाताना पेरणी यंत्राचे शेवटचे फण शेवटच्या खाली ठेवलेल्या काकरात ठेवल्यास जोडओळीत पेरणी होते. सोयाबीन उगवून आल्यानंतर खाली राहिलेल्या तिसऱ्या ओळीच्या ठिकाणी डवऱ्याच्या साह्याने दांड पाडून घ्यावेत. म्हणजेच सोयाबीनचे जोडओळीतील पीक वरंब्यावर येईल.
जोडओळ पद्धतीचे फायदे
बियाणे व त्यांच्या खर्चात ३३ टक्के बचत होते.
तसेच खते व खताच्या खर्चात ३३ टक्के बचत होते.
खाली ठेवलेल्या तिसऱ्या ओळीच्या ठिकाणी दांड पाडल्यास कमी पावसाच्या स्थितीत पावसाच्या पाण्याचे मूलस्थानी संवर्धन व जास्त पावसाच्या स्थितीत अतिरिक्त पावसाचे पाणी सरीमध्ये जमा होऊन निचरा साधतो.
एकसमान सूर्यप्रकाशाचे वितरण व खेळती हवा यामुळे पिकाची वाढ जोमात होते.
पिकाची निरीक्षण व निगराणी करणे शक्य.
आवश्यक असल्यास फवारणी करणे सोपे होते.
ओलिताची सोय असल्यास सरीतून पाटपाणी, ठिबक किंवा स्प्रिंकलरने पाणी देणे शक्य होते.
- जितेंद्र दुर्गे, ९४०३३०६०६७
(जितेंद्र दुर्गे हे श्री शिवाजी कृषी महाविद्यालय, अमरावती येथे आणि हेमंत डिके हे प्रादेशिक संशोधन केंद्र, अमरावती येथे कार्यरत आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.