Book Review : शेअर बाजारातील घोटाळ्यांचा लेखाजोखा...

The Scam : या काळात चक्क कोट्यवधी डिमॅट अकाउंट उघडले गेले. थोडीफार बागायती असलेल्या खेडेगावातही अनेक तरुण पोरे या बाजारात अगदी कमी किंवा शून्य ज्ञानाच्या आधारे गुंतवणूक करू लागले.
Book Review
Book ReviewAgrowon

पुस्तक ः द स्कॅम
लेखक ः देबाशिष बसू, सुचेता दलाल
अनुवाद ः अतुल कहाते, पूनम छत्रे
प्रकाशक ः मनोविकास प्रकाशन, पुणे.
पाने ः ४१४
मूल्य ः ४९९

The Scam Book : दोन वर्षाच्या कोरोना महामारीच्या काळामध्ये सर्वच जण घरात अडकून पडलेले असताना अगदी ग्रामीण, निमशहरी लोकही शेअर बाजारात आले. त्यातच एका इन्शुरन्स कंपनीचा आयपीओ येणार, आणि त्यात सर्व विमाधारक आणि त्यांचे एजंट यांच्यासाठी काही कोटा राखीव ठेवलेला असल्यामुळेही अनेकजणांनी डिमॅट अकाउंट उघडले. त्याला जोड मिळाली ती शून्य टक्के चार्जेस असलेल्या डिमॅट अकाउंटची सेवा पुरविणाऱ्या ऑनलाइन कंपन्यांची. त्यामुळे या काळात चक्क कोट्यवधी डिमॅट अकाउंट उघडले गेले. थोडीफार बागायती असलेल्या खेडेगावातही अनेक तरुण पोरे या बाजारात अगदी कमी किंवा शून्य ज्ञानाच्या आधारे गुंतवणूक करू लागले.

केवळ गुंतवणूकच नाही, तर यु ट्यूबमुळे अनेकजण ‘इंट्रा डे’ सारख्या अधिक धोकादायक प्रकारामध्ये आपले पैसे खेळवू लागले. त्यातून त्यांनी कधी काही रकमा मिळवल्या, तर त्याहीपेक्षा अधिक घालविल्याही. पण नुकसानीपेक्षा मिळालेल्या पैशांचा अधिक उदोउदो केला जात असल्यामुळे प्रसारही वाढत गेला. अर्थात, ज्या कंपन्यांमध्ये आपण गुंतवणूक करत असतो, त्यांचे बॅलन्स शीट सह अन्य बाबी तपासणे गरजेचे असते. असा अभ्यास करण्यापेक्षाही गुंतवणूकीसाठी अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या सल्लागारांवर विश्वास ठेवला जातो. मग ते कुठेतरी किरकोळीत शेअर बाजाराचा क्लास घेणारे, किंवा युट्यूबवर काहीतरी सिद्धांत मांडत आपले अंदाज वर्तविणारे किंवा टिव्हीवर दाखवले जाणारे तथाकथित तज्ज्ञ असोत. त्यातून आर्थिकदृष्ट्या मोठा धोका निर्माण होऊ शकतो. त्यातही ज्यांच्याकडे मोठे भांडवल आहे, अशा दलालांपासून, वेगवेगळ्या फंडांपर्यंत वेगवेगळे लोक, संस्था या शेअरबाजारांमध्ये मोठमोठ्या उलाढाली करत असतात. त्यातील उलाढाली इतक्या मोठ्या असतात की त्या त्या दिवसांचे निर्देशांकाची घसरण किंवा उसळी नियंत्रित करू शकतात. कधी एखादी अशी उसळी किंवा घसरण अचानक निर्देशांकामध्ये आली तर आपला संयम ठेवण्यासाठी या साऱ्या यंत्रणा कशा कार्य करतात, हे आपल्याला माहिती असले पाहिजे.

Book Review
Book Review : माणसांच्या प्रवाही गोष्टी

बॅंका, त्यावर नियंत्रण ठेवणारी मध्यवर्ती बॅंक (आरबीआय), सरकारी आणि सार्वजनिक रोख्यांचे व्यवहार करणाऱ्या विविध संस्था, बॅंका, लोकांकडून गुंतवणुकीसाठी पैसा गोळा करणारे फंड किंवा योजना, शेअर बाजार, त्यामध्ये आपल्या कंपन्यांचे शेअर किंवा आयपीओ आणू पाहणारे कंपन्यांचे प्रवर्तक असे अनेक घटक कार्यरत असतात. यातील एक, दोन किंवा अनेक घटक एकत्र येऊन शेअर बाजारामध्ये कसा धुमाकूळ घालू शकतात, याचे स्पष्ट उदाहरण म्हणजे हर्षद मेहता. खरेतर शेअरबाजाराशी अजिबात संबंध नसलेल्या व्यक्तीलाही हर्षद मेहता हा बिग बुल या नावाने (कू) प्रसिद्ध असणारा हा दलाल माहीत असतो. १९९२ मध्ये घोटाळ्यामध्ये बॅंकातील मोठमोठ्या रकमांच्या साह्याने आपल्याला हव्या त्या शेअरच्या किमती हव्या तशा फिरविण्याची किमया त्याने करून दाखवली होती. अगदी भारताच्या तत्कालीन पंतप्रधानांनाच एक कोटी लाच दिल्याचा उल्लेख सर्वांना आठवत असतो. पण त्याची अन्य माहिती आणि नेमका हा घोटाळा कसा घडला, याची अजिबात माहिती नसते.

त्यावर एका बाजूला कारवाई सुरू असतानाच नऊ वर्षातच म्हणजे २००१ मध्ये केतन पारेखचा घोटाळा उघड झाला. पहिला घोटाळा उघड करण्यामध्ये सुचेता दलाल या पत्रकाराने प्रसिद्ध केलेल्या नेमक्या बातम्या आणि अहवाल यांनी महत्त्वाचे काम केले होते. त्यांनी व देबाशिष बसू यांनी एकत्रितपणे हे पुस्तक लिहिले आहे. भारतात घडलेल्या दोन सर्वात मोठ्या स्टॉक मार्केट घोटाळ्यांबद्दलचे एकमेव पुस्तक असे या पुस्तकाविषयी बोलले जाते. त्याची इंग्रजीमध्ये प्रथम आवृत्ती १९९३ मध्ये आली होती. त्यानंतर पुढील केतन पारेखच्या घोटाळा व या दोन्ही घोटाळ्यामध्ये विविध तपासयंत्रणा, नियामक संस्था यांच्याकडून तपासामध्ये राहिलेल्या
त्रुटी अशी प्रचंड मोठी भर घालून पुन्हा त्याची प्रसिद्धी करण्यात आली. त्याचा मराठी अनुवाद अतुल कहाते आणि पूनम छत्रे यांनी मनोविकास प्रकाशनामार्फत केला आहे.
कोणत्याही यंत्रणांमध्ये असलेली छिद्रे, पळवाटा, मूळ नियम वाकवून आपल्याला पाहिजे तसे करण्याची संस्था, व्यक्ती यांची वृत्ती, या साऱ्यांचा स्वतःसाठी फायदा घेण्याची सर्वांची दलाली वृत्ती यामुळे नियमित अंतराने काही घोटाळे उघड होत असतात. खरेतर अर्थकारणाविषयी ज्यांना थोडेतरी जाणून घ्यावयाचे आहे, अशा विद्यार्थी, स्टॉक एक्स्चेंज किंवा वित्त बाजाराशी संबंध असणाऱ्या प्रत्येकाने हे पुस्तक वाचले पाहिजे. नुकत्याच शेअर बाजारात उतरलेल्या शेतकऱ्यांच्या पोरांनी तर हे पुस्तक नक्कीच वाचले पाहिजे. कारण त्यातून त्यांना या बाजारातील अनेक गोष्टींचा अंदाज येऊ शकतो. आपल्या पैशांसोबत कसे खेळले जाते, हे समजले तरच आपण अधिक चांगल्या प्रकारे शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करू शकू!

- सतीश कुलकर्णी

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com