Murud News : खरीप हंगाम जवळ येत असल्याने शेतकऱ्यांना निविष्ठा वेळेवर उपलब्ध व्हाव्यात, यासाठी कृषी विभागाने तयारी सुरू केली आहे. खरीप हंगामात (Kharif Season) बोगस बियाण्यांची विक्री होऊ नये, याकरिता रायगड जिल्हा स्तर आणि प्रत्येक तालुका स्तरावर प्रत्येकी एक असे एकूण १६ भरारी पथके तयार केली आहेत.
या पथकांमार्फत बोगस बियाणे विक्रीला आळा घालण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी उज्ज्वला बाणखेले यांनी दिली आहे.
बियाणे, खते व कीटकनाशकांचा गुणवत्तायुक्त पुरवठा होण्याच्या दृष्टीने जिल्हास्तरावर सनियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या नियंत्रण कक्षामध्ये जी. आर. मुरकुटे (जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक) आणि मिलिंद चौधरी (मोहीम अधिकारी जिल्हा परिषद रायगड) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तालुकास्तरावर एक तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात आली आहे. तालुका कृषी अधिकारी या समितीचे सदस्य सचिव आहेत.
खरीप हंगामात बोगस बियाणे विक्री होऊ नये, याकरिता भरारी पथकामार्फत बोगस बियाणे विक्रीला आळा घालण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक टळेल आणि अनधिकृत विक्री होणाऱ्या बोगस बियाणे व खते विक्रीला लगाम घालण्यास मदत होईल.
खरीप हंगाम सुरू झाल्यानंतर खते व बियाणे यांच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. या कालावधीत फसवणूक होऊ नये, म्हणून शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी.
जिल्ह्यात खरीप हंगामापूर्वी मुबलक प्रमाणात बियाणे व खते शेतकऱ्यांना कशी मिळतील यासाठी तालुकास्तरावर सूक्ष्म नियोजन केले आहे. शेतकऱ्यांची फसवणूक करताना आढळल्यास भरारी पथकाद्वारे अचानक धाडी घालून वेळोवेळी तपासण्या केल्या जातील, असे जिल्हा अधीक्षक कृषी अदिकारी उज्वला बाणखेले यांनी सांगितले.
शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी
शेतकऱ्यांनी गुणवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत विक्रेत्याकडूनच बियाणे खरेदी करावेत, बियाणे खरेदी करताना पक्की पावती घ्यावी, बियाणे खरेदीची पावती व बियाण्यांच्या बॅगवरील टॅग व लॉट नंबर शेतकऱ्यांनी पडताळून पाहावे. ही बॅग फोडताना खालच्या बाजूने फोडावी म्हणजे वरील बाजूचा टॅग बॅगेला तसाच राहील.
बियाण्यांची फोडलेली पिशवी टॅगसह पिकाची काढणी होईपर्यंत जपून ठेवावी म्हणजे बियाणे उगवणी संदर्भात काही तक्रार आल्यास तक्रार दाखल करता येते.
तसेच कीटकनाशके व तणनाशके खरेदी करताना त्यांची अंतिम मुदत तपासून घ्यावी, गाडीवरून खते विक्री करणाऱ्या फ्लाय सेलर्सकडून खत खरेदी करू नये, कुठे असे फ्लाय सेलर्स आढळल्यास तात्काळ ९५०३१७५९३४ या संपर्क क्रमांकावर कळवावे, कोणी खत विक्रेता जास्त दराने युरियासारख्या अनुदानित खताची विक्री करत असेल तर याबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय अलिबाग अथवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयास लेखी तक्रार करावी.
करडी नजर
जिल्ह्यांत विक्री केंद्रावर बियाणे व खते यांचा साठा व गुणवत्ता तपासणे, गोडावून तपासणी, ई-पॉस मशीनवरील साठा, शंकास्पद असणारे बियाणे यांचे नमुने घेणे, खतांचे नमुने घेणे, संपूर्ण निविष्ठा विक्रेत्यांच्या दुकानांची तपासणी इत्यादी बाबींवर जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक जी. आर. मुरकुटे यांची करडी नजर असणार आहे. दोषी आढळल्यास दुकानाचे परवाने निलंबित करून कडक कार्यवाही करण्याचे सूचित केले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.