Kharif Season Update : पाऊसमानाबाबत यावर्षीच्या पहिल्या अंदाजानंतर शेतकरी तसेच शासन-प्रशासन पातळीवर खरीप हंगामाचे नियोजन सुरू झाले आहे. राज्यातील बहुतांश शेती जिरायती आहे. अशा शेतीत पावसाच्या पाण्यावरील खरीप हंगामच महत्त्वाचा मानला जातो.
येत्या खरीप हंगामासाठी राज्यात पुरेशी रासायनिक खते उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे खतांबाबत चिंतेची गरज नाही, असे कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे. खरे तर हंगामाच्या पूर्वी दरवर्षीच कृषी विभागाकडून बियाणे, खते, कीडनाशके या प्रमुख निविष्ठांचा गरजेनुसार पुरवठा केला जाईल, असे आश्वासन दिले जाते.
परंतु प्रामुख्याने बियाणे, रासायनिक खते यांचा अपुरा पुरवठा आणि त्याचेही खूपच असमान वितरण होत असल्याने राज्याच्या अनेक भागांत टंचाई जाणवते. तसेच काही कंपन्या आणि वितरक व्यापारी अधिक मागणी असलेल्या बियाणे, खतांची कृत्रिम टंचाई देखील करतात.
याद्वारे काळ्या बाजारातून ठरावीक दरापेक्षा जास्तीच्या दराने अशा खते, बियाण्यांची विक्री केली जाते. मुळात रासायनिक खतांच्या किमती मागील चार वर्षांत खूपच वाढल्या आहेत. त्यात काळ्या बाजारातून अधिक दराने शेतकऱ्यांना खते खरेदी करावी लागली तर तो त्यांच्यावर नाहक भुर्दंड बसतो.
शिवाय बनावट-भेसळयुक्त खतांच्या वापराने अपेक्षित उत्पादन तर मिळत नाही, उलट अशा खतांनी जमिनी खराब होत असल्याचेही दिसून येते. पाणी आणि रासायनिक खतांच्या अतिवापराने देखील जमिनी क्षारपड, चिबड होतात.
या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांच्या गरजेनुसार पुरेशा प्रमाणात आणि रास्त दरात रासायनिक खतांचा पुरवठा व्हायला हवा.
रासायनिक खतांची कृत्रिम टंचाई कुणी करीत असेल तसेच बनावट-भेसळयुक्त खते कोणी विकत असेल तर त्यांना शोधून त्यांच्यावर तत्काळ कडक कारवाई झाली पाहिजेत.
रासायनिक खतांच्या उपलब्धतेबाबत चिंता करण्याची गरज नसली तरी वापराबाबत मात्र सर्वांनी चिंतन करण्यासारखी परिस्थिती राज्यात सर्वत्र आहे. एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि खतांचा संतुलित वापर ह्या दोन बाबी शेतीमालाची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि उत्पादनवाढीसाठी अत्यंत गरजेच्या आहेत.
राज्यातील बहुतांश शेतकरी माती परीक्षण करून न घेताच खतांचा वापर करतात, हे योग्य नाही. प्रथमतः शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील मातीचे परीक्षण करून घ्यावे. आणि माती परीक्षण अहवालानुसार रासायनिक खतांचा वापर करावयास हवा.
शेतकऱ्यांकडील पशुधन कमी झाल्यामुळे आपल्या शेतात शेणखतांचा वापर खूपच कमी झाला आहे. त्यामुळे जमिनीचा पोत खालावतोय. त्यामुळे शेतकऱ्यांनी शक्य असेल तेवढे चांगले कुजलेले शेणखत शेतात टाकायला हवे. पिकाचे अन्नद्रव्य व्यवस्थापन करताना जैविक तसेच हिरवळीच्या खतांकडे शेतकऱ्यांचे कमालीचे दुर्लक्ष होते.
जैविक खते गरजेनुसार उपलब्ध होत नाहीत, शिवाय त्यांच्या गुणवत्तेचीही समस्या सर्वत्र आहे. हिरवळीची खते वापरणे थोडे कष्टदायक आणि वेळखाऊ आहे. या खतांकडे दुर्लक्ष होण्यामागची ही प्रमुख कारणे आहेत.
एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनातील शेवटचा घटक रासायनिक खते आहेत. ही खते वापरायला सोपी अन् जलद परिणामकारक आहेत. त्यामुळे यांच्या वापरावर शेतकऱ्यांचा भर असतो. परंतु रासायनिक खतांचा वापर करण्यापूर्वी शेतकऱ्यांनी कंपोस्ट, हिरवळीचे खत, जैविक खत यांचा वापर शेतात केला पाहिजे.
याद्वारे रासायनिक खतांची मात्रा आपण काही प्रमाणात कमी करू शकतो. शेतकऱ्यांनी कंपोस्ट, हिरवळीचे तसेच जैविक खतांचा वापर केल्यास रासायनिक खतांची मात्रा किती कमी करता येते, याबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन करायला हवे.
असे झाले तरच कमी खर्चात अधिक पीक उत्पादन मिळून शेतीमालाचा दर्जा सुधारेल. अशा शेतीमालास अधिक दर मिळून शेतकऱ्यांचे एकंदरीतच अर्थकारण सुधारण्यास देखील हातभार लागेल.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.