Pune News : शेतकऱ्यांची बनावट कागदपत्रे तयार करीत पंतप्रधान पीकविमा योजनेतून साडेसात कोटी रुपयांवर डल्ला मारण्याच्या प्रयत्नात असलेली टोळी कृषी खात्याने शोधून काढली आहे. ‘गुडे’ नावाचा म्होरक्या आंध्र प्रदेशात बसून सरकारमान्य सेतू केंद्राच्या माध्यमातून पीकविमा योजनेत गैरव्यवहार करीत असल्याचे गृह खात्याला कळविण्यात आले आहे.
आंध्र प्रदेशात राहणारी ‘गुडे श्रीनिवासुलू’ नावाची व्यक्ती नेमकी कोण आहे, त्याची पूर्वपीठिका काय, पीकविमा योजनेत बनावट ऑनलाइन अर्ज भरण्याची क्लृप्ती त्याला कोणी शिकवली, तसेच यापूर्वी किती वेळा त्याने बनावट अर्ज भरले, किती सरकारी अनुदान लाटले याविषयी कृषी खात्यात कमालीची उत्सुकता आहे.
‘गुडे’ने आंध्र प्रदेशात बसून धुळ्याच्या सिंदखेडा तालुक्यातील सार्वे गावातील नोंदी वापरल्या आहेत. या गावातील शेतकऱ्यांच्या नावाने बनावट कागदपत्रे तयार करीत त्याने बोगस पीकविमा प्रस्ताव तयार केले आहेत. कृषी खात्याने मात्र ‘गुडे’चा हा डाव उधळून लावला आहे.
पीकविमा योजनेचे संनियंत्रण कृषी आयुक्तालयाच्या विस्तार विभागाकडून केले जाते. सध्याचे विस्तार संचालक विनयकुमार आवटे हे पूर्वी मुख्य सांख्यिक होते. ते पीकविम्यातील तज्ज्ञ समजले जातात.
विमा योजनेतील उपयुक्तता आणि त्रुटी याचा अभ्यास श्री. आवटे व त्यांचा चमू सातत्याने करीत असतो. त्यामुळेच विमा योजनेद्वारे गैरव्यवहार करणारी अनेक प्रकरणे उघड झाली आहेत.
कारवाईच्या याच मालिकेत आता आंध्र प्रदेशातील मोठा मासा म्हणजे गुडे श्रीनिवासुलू गळाला लागला आहे. आंध्र प्रदेशात बसून एक ‘आपले सरकार केंद्र’ (सीएससी) गुडे कसा चालवतो व त्यातून महाराष्ट्रातील पीकविमा योजनेचे बोगस प्रस्ताव कसा तयार करतो, याची माहिती गोळा करण्यात आली. राज्याचे मुख्य सांख्यिक वैभव तांबे यांनी गुडेच्या कार्यपद्धतीचा बारकाईने अभ्यास केला व त्यानंतर पोलिसांकडे अहवाल पाठवला गेला.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या नावाने गुडेकडून ३७६७३४६००१४ या क्रमांकाच्या सेतू केंद्रातून बोगस पीकविमा प्रस्ताव तयार केले जातात. तो सेतू केंद्राचा पत्ता ‘नारायणा, १-१०५-१, वर्मा वरम, प्रकासम, आंध्र प्रदेश ५२३१११’ असा दाखवतो.
पोलिसांकडे कृषी खात्याने पाठवलेल्या अहवालात नमूद केले आहे, की पीकविम्याच्या बोगस प्रस्तावांमध्ये गुडेने स्वतःसह सात शेतकऱ्यांची नावे टाकली आहेत. स्वतःच्या नावावर नसलेल्या शेतजमिनीचा बोगस पीकविमा गुडेने काढला.
तसेच इतर सात शेतकऱ्यांचा विमादेखील त्यानेच काढला. महाराष्ट्रातील शेतजमिनींच्या नोंदीचा वापर करीत गुडेने एकूण दोन हजार ५३६ हेक्टरचे पीकविमा संरक्षित करून घेतले आहे. गुडेचा हा कारनामा पाहून कृषी खाते थक्क झाले आहे.
साडेसात कोटींसाठी हेराफेरी
गुडे श्रीनिवासुलू नावाच्या आंध्रातील ठगाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या विमा भरपाईच्या रकमा स्वतःच्या बॅंक खात्यात जमा होईल, अशी हेराफेरी केली आहे. गुडेचा हा डाव यशस्वी झाला असता, तर त्याला सात कोटी ५५ लाख रुपये मिळाले असते, असे कागदपत्रांवरून स्पष्ट होते आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.