Village Story : बहर

Article by Sameer Gaikwad : कामिनी गावात आल्याचं दत्तूला उशिरा कळले. ती आल्याचं कळताच बहाणा बनवून दत्तू गावात जाई. तोपर्यंत कामिनी तिच्या सासरी परतलेली असे.
Village Story
Village StoryAgrowon
Published on
Updated on

Rural Story : लग्नाला एक तप उलटून दोन लेकरांची आई झाल्यावरही कामिनीच्या सौंदर्यात तसूभर फरक पडला नव्हता. आताशा समृद्धी श्रीमंतीत रुळलेल्या कामिनीचा गतकाळ वेगळा होता. कामिनीचा बाप नावालाच साधू होता बाकी त्याचं वर्तन विपरीत होतं. गावात जी मोजकी मंडळी दारूच्या आहारी गेली होती त्यात साधूचा नंबर बराच वरचा होता.

त्याची कमाई शून्य होती, पण मुजोरी टिकोजीरावाच्या वरची होती. चार धटिंगण घरी आणायचे आणि त्यांना फुकटचे खाऊ पिऊ घालायचे, फालतूचा रुबाब या त्याच्या सवयी. नशेच्या गर्तेत चिचुंद्रीच्या डोक्याला चमेलीचं तेल लावायला तयार असणाऱ्या साधूने बायकोपोरांच्या घासाची चौकशी कधी केली नव्हती.

साधूने थोरल्या कामिनीच्या पाठीवर जुळ्या मुली, नंतर मुलगा आणि पुन्हा मुलगी असं लटांबर वाढवलं होतं. साधूच्या नानाविध खोडींपायी वेशीपाशी त्याला अनेकांनी कुटून काढला होता, पण त्याचा पीळ कधीच जळला नव्हता. आई वत्सलाबाईसह कामिनी रोजंदारीनं कामावर जाई. कामिनी म्हणजे आटीव दुधाची ढेप होती.

कामावर निघालेली कामिनी वाटेनं चालू लागली, की गावभरच्या बुभुक्षित नजरा तिच्यावर खिळत. ती मात्र भुईवर डोळे खिळवून खालच्या मानेनं जायची. ज्याची वर्दी येईल त्याच्या रानात या मायलेकी जायच्या. राबराबायच्या. त्यांच्या कष्टावरच चूल पेटायची. बहुत करून नरसू साळव्याचीच वर्दी यायची.

नरसू साळव्याचं दहा एकराचं रान होतं. रानाच्या मधोमध आठ परस खोल असलेली जुनी दगडी ताशीव विहीर होती, जिला कधी पाणी असायचं तर कधी नसायचं. जमीन पण फारशी कसदार नव्हती, रान मुरमाड होतं. काळ्याकरड्या मातीत दगडगोट्यांची चळत असायची. नांगरट करताना बैलांच्या तोंडाला फेसाची तार यायची.

दरसाली मातीत बरड यायचीच. नरसूला दोन भाऊ होते. त्यांचंही स्वतःचं शेतशिवार होतं, घरदार होतं. नरसूला चार पोरींच्या पाठीवर दत्तू झालेला. त्यामुळे मुलींच्या मानाने त्याचे कोडकौतुक जास्तीच झालेलं. नरसूच्या आईनं आपल्या नातवाला सहाणेवर घासून बनवलेलं चाटण पाजलेलं, पौष्टिक गोडधोड खाऊ घालून तेव्हापासूनच त्याच्या मानेवर जणू वशिंड आलेली.

Village Story
Village Story : भेट...

शेतातली कामं वक्तशीर व्हावीत म्हणून गरज पडेल तेव्हा वत्सलेच्या घरी कामाची वर्दी पोहोच होई, वर्दी मिळताच मायलेकी कामावर येत, अंग मोडून काम करत. कधी कधी हप्ता, पंधरवडा सलग कामावर येत तेव्हा घरचं काम समजून त्या काम करत. वत्सलेसोबत कामिनी येणार असली, की दत्तूला हुरूप येई, त्याच्या अंगावरचं मांस वाढे आणि काळजातला मोर थुईथुई नाचे. याचं कारणही तसंच होतं.

दत्तू म्हणजे मदनाचा पुतळाच होता. पिळदार अंगयष्टीचा, मजबूत बांध्याचा, उंचापुरा दत्तू पाहता क्षणी नजरेत भरायचा. शेतात राबून त्याचा गोरा रंग रापून गेला होता. धनुष्याकृती पाणीदार डोळ्यांत चमक असायची. रेखीव ओठांवरची बारीक मिशांची लव त्याला शोभून दिसे. उभट चेहरा, तीक्ष्ण नाक, भव्य रुंद कपाळ, पातळ निमुळती कानशिलं, ओठांच्या खाली निमुळत्या हनुवटीवर असणारी दाढीची त्रिकोणी लव यामुळे तो अगदी कोरीव दिसायचा.

हातात कुदळ घेऊन रानात दारं धरत असला, की त्याच्या दुटांगी धोतराचे सोगे वर ओढलेले असत आणि केळीच्या बुंध्यागत घटमुट असलेल्या पिंडऱ्यांकडे लक्ष जाई. उघड्या अंगानं कुऱ्हाड घेऊन लाकडं फोडत असताना त्याच्या दंडातल्या बेंडकुळ्या वरखाली होत. भरदार छातीचा पिंजरा वरखाली होई. कातळासारखी असलेली पाठ फुलून येई. मोटेनं शेंदलेलं पाणी मोठाल्या घागरीत भरून दुई हातानं आणताना मनगटावरच्या धमन्या टरारून फुगत.

खळं करून झाल्यावर बारदाना झटकताना त्याच्या माथ्यावरचे केस वाऱ्यावर उडत, त्यात अडकून पडलेलं कुसं त्याला खुलून दिसे. एकामागोमाग एक पन्नास पोती उचलून त्यांची रास रचणे किंवा बैलगाडीत चढवणे हे त्याच्यासाठी किरकोळ काम होतं. ओझ्यानं बैलगाडीचं चाक कुठं चिखलात रुतलं की दोन आऱ्यांमध्ये आपला ताटलीसारखा पंजा घालून तो नेटाने बैलगाडी ओढून नेई. चाक ओढताना अंगाला वंगण लागलं, की त्याच्या गोऱ्या रंगावर तीट लावल्यागत भासे. दत्तू दिसायला जितका देखणा आकर्षक होता तितकाच मनाने निर्मळ होता. थोडंफार शिकला सवरलाही होता.

तंगीपायी सालगडी ठेवणं परवडेनासं झालं, तेव्हा नरसूने दत्तूची शाळा बंद केली आणि कामाचं जू त्याच्या मानेवर ठेवलं. आठवीत असतानाच दत्तूची शाळा सुटली. शाळेसोबत स्वप्नेही मागे राहिली, दिली घेतलेली फुले दप्तरात चुरगाळून गेली, लपून छपून घेतलेलं मोरपीस वहीच्या पानात दफन झालं. नंतर कधीतरी सारवणात वह्यांना पाय फुटले, मोरपिसाच्या आठवणी उरल्या.

हे मोरपीस कामिनीने दिलेलं. वत्सलेनं जोवर जमेल तोवर कामिनीला शाळेत धाडलेलं. घरात खाणारी तोंडे वाढली तेव्हा कामिनीची आबाळ होऊ लागली. फाटक्या गणवेशात अंग लपेनासं झालं, वह्या, पुस्तके वेळेवर मिळेनाशी झाली, घरातल्या कामापायी दांड्या पडू लागल्या. आपल्यामुळे आईला अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतंय याची समज आल्यावर कामिनीनं शाळा सोडून दिली.

नेमक्या त्याच वर्षी दत्तूनेही रजा घेतलेली. शाळेत असताना दत्तूला कामिनीचं विलक्षण आकर्षण होतं. तिच्या सौंदर्याची भुरळ पडली नसती तर नवल. कामिनीलाही दत्तू आवडायचा, त्याचं राजबिंडं व्यक्तिमत्त्व आणि विनम्रता यांचं तिला अप्रूप वाटे. दोघेही लपून छपून भेटत, वह्या देताना त्यात खाणाखुणा करत.

शाळेच्या मागच्या बाजूस असणारं गुलमोहराचं झाड त्यांच्या भेटीगाठीचं ठिकाण असे. शाळेला सुट्टी असली की दत्तूचं मन लागत नसे, मग कुठल्या तरी निमित्ताने तो साधू काशीदच्या घरापुढून चकरा मारे. कामिनी नजरेस पडली नाही की घालमेल आणखी वाढे. तासंतास विहिरीत पोहल्यावर त्याच्या अंगातला वणवा शांत होई.

नांगरटीस उभं राहिलं की बांधावर कामिनी उभी असल्याचा भास होई. गोफणगुंडा भिरकावताना मागून तिने हात खेचल्यासारखं वाटे. भाकरी सोडून बसल्यावर तिने घास पुढे केल्यागत हा आ वासून बसे, मग कावून गेलेला नरसू त्याची आरती करे. मग कुठे दत्तू भानावर येई.

Village Story
Village Story : वर्तुळ...

कामिनीची अवस्थाही अशीच होती. खुरपायला बसली की हात खिळून जात आणि मनातलं पाखरू दत्तूकडं उडाण घेई. चुलीवर ठेवलेलं कोरड्यास आटून गेल्यावर घरभर ठसका पसरे मग कुठे तिचं चित्त जागेवर येई. मात्र जसजसे दिवस पुढे जात राहिले तसतसे त्यांच्यातलं अंतर वाढत राहिलं, अपवाद फक्त त्या दिवसांचा असे, जेव्हा वत्सला आणि कामिनी नरसूच्या शेतात कामावर येत.

कामिनी शेतात आली, की जुंधळ्यातल्या मोत्यांना धुमारे फुटत, गव्हाच्या लोंब्यांना उधाण येई, दंडातून वाहणारं पाणी तिच्या पावलांना स्पर्शण्यास आतुर असे, झाडांवरची पाखरे पंख फडफडवत, गोठ्यातल्या गायी अंग थरथरवत, लाली कुत्रीची पिलं तिच्या पायात घुटमळत. सगळं चराचर आतुरलेलं असे. दत्तूचं अवघं आकाश इंद्रधनुष्यी होई.

काम करताना नकळत तिचा स्पर्श होताच दत्तूच्या अंगांगात नागीण सळसळे. कामिनीचे गाल आरक्त होत. तारुण्यानं मुसामुसलेले ते जीव आगळीक होण्याच्या वळणावर पोहोचले होते. दत्तूला वाटायचं की कामिनीशीच आपलं लग्न व्हावं, पण नरसूच्या भीतीने दत्तूचं प्रेम ओठावर कधी आलंच नाही आणि कामिनीत ती हिंमत असण्याचा प्रश्‍नच नव्हता.

असाच काही काळ गेला. दरम्यान नरसू सलग काही वर्षे कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ यांच्या चरकात पिसून निघाला. नापिकीने त्याला कर्ज झालं. सावकारी कर्ज फेडण्याचा सोपा उपाय त्यानं शोधला. बक्कळ हुंड्यावर डोळा ठेवून गडगंज श्रीमंत असणाऱ्या मेव्हण्याकडं त्यानं दत्तूसाठी मुलीचा हात मागितला.

जगाच्या भाषेत रंगरूपाने डावी असणाऱ्या कुसुमशी दत्तूचं लग्न झालं. मनातल्या स्वप्नांना पायदळी तुडवत घाण्याला जुंपलेल्या बैलागत दत्तूने संसाराला जुंपून घेतलं. तिकडे साधूने कामिनीचा अक्षरशः सौदा केला. पंचक्रोशीच्या पलीकडे जाऊन पैसेवाल्या विधुर गुणाजीबरोबर कामिनीचा बार उडवून दिला. कुठल्याच अंगानं त्यांची जोडी शोभत नव्हती.

कामिनीने आपल्या सगळ्या इच्छा आकांक्षांचा चुराडा करून त्यावर आपल्या घरादाराच्या सुखाचा डोलारा उभा केला. बहिणींची लग्ने तिने थाटात केली. भावास जमीनजुमला घेऊन दिला. गावात आल्यावर कामिनीला वाटे, की दत्तूच्या शेतशिवाराकडे फेरफटका मारावा, चोरून त्याला पाहावं पण नीतिमत्तेच्या जोखडात पाय अडत.

कामिनी गावात आल्याचं दत्तूला उशिरा कळे. ती आल्याचं कळताच बहाणा बनवून दत्तू गावात जाई. तोपर्यंत कामिनी तिच्या सासरी परतलेली असे. दोघांची चुकामुक होई. अंधारून आल्यावर हिरमुसलेला दत्तू कास्तकाराच्या भेटीचं निमित्त करून शाळेमागच्या जुनाट गुलमोहराकडे जाई. तिथं त्याला कामिनीच्या देहगंधाचा दरवळ जाणवे. सुकून गेलेल्या पानमोकळ्या गुलमोहराला दत्तू येऊन गेल्यानंतर नव्याने बहराची स्वप्ने पडत!

: ८३८०९७३९७७

(लेखक प्रसिद्ध साहित्यिक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com