Indrjeet Bhalerao : घोड्यावरची अखंड कविता

Poem On Horse : घोडा हा या कवितेचा विषय आहे. विलास खरंतर कृषीसंस्कृतीतून आलेला आहे. कृषीसंस्कृतीमधून आलेल्या माणसाच्या काळजात रुतून बसलेले असतात ते कृषी संस्कृतीतले पशु. त्यात गाई, म्हशी, बैल, शेळ्या, मेंढ्या, कुत्री, मांजरं, कोंबड्या, रानपाखरं यांचा समावेश असतो.
Indrajeet Bhalerao Article
Indrajeet Bhalerao Article Agrowon
Published on
Updated on

इंद्रजीत भालेराव

खूप दिवसानंतर विलासचा हा कवितासंग्रह आला आहे. याला कवितासंग्रह म्हणण्याऐवजी दीर्घकविता म्हणनेच जास्त योग्य होईल. बहुप्रतिक्षित हा शब्द खऱ्या अर्थानं विलासच्या या पुस्तकाला लागू पडतो. कविता लिहायला सुरुवात करून बरोबर चाळीस वर्षानंतर हे पुस्तक बाजारात आलेले आहे.

मला वाटतं याबाबतीत विलासने नेमाडे सरांच्या हिंदूंचाही विक्रम मोडलेला आहे. आम्ही विद्यापीठात शिकायला होतो तेव्हापासून म्हणजे १९८५ पासून विलास ही कविता लिहीत आहे. या पुस्तकाच्या उपोद्धातात तर तो म्हणतोय, तशी या कवितेची सुरुवात १९८० साली म्हणजे विलास दहावीच्या वर्गात असतानाच झालेली आहे.

मग तर ही कविता लिहायला सुरुवात करून आता पंचेचाळीस वर्षे उलटून गेलेली आहेत. या पंचेचाळीस वर्षात मराठी कवितेच्या किती लाटा आल्या आणि गेल्या. त्या सगळ्या लाटांचा प्रभाव या कवितेवर नक्कीच असणार. या कवितेने त्यातलं काय काय पचवलेलं आहे आणि काय काय स्वतःत रिचवलेलं आहे, हे तपासणं हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय होऊ शकतो.

घोडा हा या कवितेचा विषय आहे. विलास खरंतर कृषीसंस्कृतीतून आलेला आहे. कृषीसंस्कृतीमधून आलेल्या माणसाच्या काळजात रुतून बसलेले असतात ते कृषी संस्कृतीतले पशु. त्यात गाई, म्हशी, बैल, शेळ्या, मेंढ्या, कुत्री, मांजरं, कोंबड्या, रानपाखरं यांचा समावेश असतो.

आतापर्यंत कृषीसंस्कृतीतून आलेल्या कवींच्या कवितांतून वरील पशुपक्षी नेहमीच आलेले आहेत. सर्वाधिक कविता बैलावर लिहिलेल्या सापडतात. अगदी वसंत आबाजी डहाके, गुरुनाथ धुरी, सुदाम राठोड यांनीही बैलांवर कविता लिहिलेल्या आहेत. पण घोडा कधी कुणाच्या कवितेत फारसा आलेला दिसत नाही. अरुण शेवते यांनी 'घोड्यांच्या कविता' नावाचा एक स्वतंत्र संग्रह याआधी लिहिलेला आहे.

पण तो आता माझ्यासमोर नसल्यामुळे आणि फार दिवसापूर्वी वाचला असल्यामुळे आता त्यातलं काही आठवतही नाही. त्यानंतर विलासने हा थोडासा उपेक्षित राहिलेला घोडा नेमका उचलला आहे आणि आपल्या कवितेत भरपूर दामटला आहे. विठ्ठल वाघ यांनी जसा 'वृषभ सुक्ता'त बैल दामटला होता. दामटणे म्हणजे चालवणे, पळवणे. अर्थातच विलासच्या या कवितेतच्या बहुतेक टापा टापीत आहेत तर काही टापा सटकलेल्याही आहेत. दीर्घ कवितेत असे होणे अगदी स्वाभाविक आहे.

कृषीसंस्कृतीतल्या इतर पशुंपेक्षा विलासला घोडाच का महत्त्वाचा वाटला असावा ? त्यामागच्या काही कारणाचा आपणाला अंदाज करता येऊ शकतो. एक तर आपण काहीतरी नवे करावे, इतरांनी केले तेच नको, ही उर्मी त्यामागे असावी. दुसरे कारण म्हणजे विलासचे संस्कारक्षम वयातले भावविश्व घोड्याने सर्वाधिक व्यापलेले असावे, तिसरे कारण म्हणजे विलासच्या घरात पाटीलकी होती.

पाटीलकी असलेल्या घराचे लक्ष शेतीपेक्षा गावाचे नेतृत्व करण्याकडे जास्त असते. नेतृत्वाच्या वरचढीचा भाग म्हणजे मांडीखाली घोडा असणे अपरिहार्य समजले जाते. गाव सारा पायाने चालत असतो तेव्हा पाटील घोड्यावर बसून ऐटीत चाललेला असतो.

हे सगळे संदर्भ समजून घेण्यासाठी विलास ज्या कर्नाटक सीमेलगत औराद शहाजानीच्या आसपास वाढला त्याच भागात जडणघडण झालेले आणखी एक लेखक सुरेंद्र पाटील यांनी केलेले अलीकडील ललितलेखन फार उपयुक्त आहे. सुरेंद्र पाटील यांचे आजोबा, त्यांचा घोडा आणि त्यांनी केलेले गावाचे नेतृत्व, याचे विपुल संदर्भ त्यांच्या लेखनात येतात. सुरेंद्र पाटील यांचं हे लेखन वाचलं की विलासची कविता आणखीच समजत जाते.

Indrajeet Bhalerao Article
Indrajeet Bhalerao : कधीच न आटणारा सगळ्यात जुना 'आड'

काहीतरी विलक्षण वेगळे करण्याच्या नादात विलासने या कवितेत भाषेचे जे प्रयोग केलेले आहेत ते कौतुकास्पद असले तरी अक्षरशः दमवणारे आहेत. ते वाचणाराला दमवतात, कविता समजून घेणाराला तर आणखीच दमवतात. अक्षरजुळणी करणाराला त्यांनी किती दमवले असेल ते पानोपानी दिसतेच. अक्षरजुळणी करणाराला लागलेल्या धापा आणि त्याच्या हातातून निसटलेले काना, मात्रा पानोपानी गरंगळताना दिसतात.

अर्थात अक्षरांच्या विरूपीकरणाचे मुद्दाम केलेले प्रयोग ते वेगळे आहेत. ते अर्थातच माझ्यावरील विधानात गृहीत धरलेले नाहीत. शिवाय औराद परिसरातील मराठी बोली, बंजारा बोली, उर्दू बोली, कानडी बोली, तेलंगी बोली, बनभिकाराची बोली अशा कितीतरी बोलींचा उपयोग इथे कवीने केलेला आहे.

या सगळ्या बोलींचे सामान्य वाचकाला आकलन होणे अवघड आहे. म्हणून खरंतर सोबत शब्दकोशही दिला असता तर कवितेचा अर्थ समजून घ्यायला तो सामान्य वाचकांना उपयोगी पडला असता. पाली, संस्कृत, अरबी भाषेतलेही पुष्कळ शब्द इथे येतात. ज्यांचे अर्थ सर्वांनाच माहीत असतील असे नाही. पुस्तकात मधोमध एकच विसावा दिलेला आहे. पण या भाषेच्या दमछाकीमुळे वाचाकाला अनेकदा विसावा घ्यावा लागतो.

या कवितेत जो घोडा येतो त्याचा पैस अतिविशाल आहे. आदीम घोड्यापासून ते ॲनिमेशनच्या नकली घोड्यापर्यंत, पुराणकथांपासून ते इंजिनच्या हॉर्सपॉवरपर्यंत, मल्हारी मार्तंडापासून ते बनभिकारापर्यंत, जत्रेतल्या लाकडी घोड्यापासून ते दिंडीतल्या रिंगणी घोड्यापर्यंत, म्हणी वाक्प्रचारातल्या मौखिक घोड्यापासून ते गीत लोकगीतातल्या रेकॉर्डमधून खिदळणाऱ्या घोड्यापर्यंत, संस्कृत-पाली-अरबी भाषेपासून ते भटक्यांच्या बोलीपर्यंत, सारंगखेड्याच्या जागतिक अश्वबाजारापासून ते उद्गीरच्या आठवडी बाजारापर्यंत, प्रतिमा-प्रतिक-रूपकापासून ते कवितेच्या विरूपीकरणापर्यंत, परिपूर्तीच्या आठवडी शब्दकोड्यापासून ते दंडातल्या मंत्रताईतांपर्यंत, तान्ह्या बाळाला पाठीवर सुरक्षित घेऊन जाणाऱ्या घोड्यापासून ते बलदंडालाही उलथून फेकणाऱ्या वारूपर्यंत, लोककथेतल्या घोड्यापासून जाहिरातीतल्या घोड्यापर्यंत, तेजतर्रार घोड्यापासून मरतुकड्या घोड्यापर्यंत, लोककथेतल्या घोड्यापासून इसापनीतीतल्या घोड्यापर्यंत, वरातीतल्या घोड्यापासून राजरथाच्या घोड्यापर्यंत, उजळणीतल्या घोड्यापासून पाढ्यातल्या घोड्यापर्यंत, ओवीतल्या घोड्यापासून शिवीतल्या घोड्यापर्यंत, घोड्याच्या बिजापासून ते वंशाच्या विस्तारापर्यंत, दहा माणसांना राबवणाऱ्या घोड्यापासून ते गावखोरीची हराळी फुकणाऱ्या घोड्यापर्यंत, घोडगंगा साखर कारखान्यापासून ते चेतक चौकापर्यंत, लाल घोड्यापासून ते काळा घोडा फेस्टिवल पर्यंत, शिल्पातल्या घोड्यापासून ते टॅटूतल्या घोड्यापर्यंत, घोड्याच्या जणूकापासून ते घोड्याच्या लिदीपर्यंत असा हा या घोड्याचा पैस अतिविशाल आहे

Indrajeet Bhalerao Article
Indrajeet Bhalerao : शेतकऱ्यांसाठी कल्याणकारी योजना मागणारा भुलोबा

घोड्याशी संबंधित कवीच्या बालपणातल्या कितीतरी आठवणी या कवितेत येतात. त्यातून कवीचं बालपण साकारत जातं, तसाच त्याचा भोवतालही साकारत जातो. त्यात शेत आहे, शेतातल्या पेरणीच्या काळात उडीद खाऊन पोट फुगून मेलेला आणि अख्ख्या घराला खोरी करून गेलेला घोडा आहे, कवीची मुस्लिम मैत्रीण आहे, तिच्या वडिलांची भाकरी घेऊन सोबत शेताला जाणं आहे, एक नदी आहे, त्यातले मासे पकडून भाजून खाणारं बालपण आहे,

कवीचे नातेवाईक आहेत, कवीचं घरदार आणि परिसर स्थानिक बोलीसह आलेलं आहे. घरच्यांनी विकत घेतलेले, घरी नांदलेले आणि नंतर मेलेले अनेक घोडे यात आहेत. नदीला पूर आल्यावर सगळ्या बायांसह आजीमायला पूर पार करून देणारा घोडा आहे. घरचा हाल्या मेल्यावर पाण्याच्या पखाली वाहणारा घोडा आहे. घोड्यासाठी गवताचे भारे आणणारे आजोबा आहेत.

माळेगावच्या जत्रेतून आणलेली चंदाघोडी आणि तिच्या अनेक आठवणी आहेत. कवीला अजोळाहून रानावनातून पिकापाण्यातून पळवत आणणारी ही चंदा घोडी आहे. सडकेने जाताना जीप बरोबर धावणारी ही चंदा घोडी आहे. अण्णाला पोहत नदीपार करणारी ही चंदा घोडी आहे, दुष्काळात झाडपाला खाऊन त्या घोडीचे जगणे आहे,

चंदा घोडीच्या अशा अनेक आठवणी इथे आहेत. दारूच्या गर्तेत सापडून बापानं उध्वस्त करत नेलेलं घर आणि त्यामुळे डोळ्याला पदर लावून शोक करणारी आजी, या कवितेच्या एका तुकड्यात येते. गाव सोडून आपण शहरात आलो आणि सगळ्याच आपल्याशा भावविश्वाला अंतरलो, अशी वेदनाही शेवटी शेवटी एका तुकड्यात येते. म्हणजे एका अर्थानं या कवितेत घोड्यांच्या टापांसोबत कवीच्या चरित्राच्या टापा आपणाला ठळकपणे ऐकू येतात.

बैलाच्या लोकगीतावर घोड्याचे आरोपण करून सजवलेली एक कविता इथे दिसते. जात्यावरच्या ओवींवर घोड्यांचे कलम करून तयार केलेल्या पाच कविता इथे दिसतात. खेळ, कोडे, कहाण्या, चकव्याला घोडा भिडवून तयार केलेल्या कविताही पाहायला मिळतात. अशा प्रकारे दिसेल तिथे घोडा शोधत आपल्याच तंद्रीत निघालेला कवी पूर्णपणे घोड्याच्या रंगात रंगलेला आहे. बऱ्याच ठिकाणी ते स्वाभाविक वाटत असले तरी अनेक ठिकाणी ते अस्वाभाविकही वाटते. पण विरूपीकरण हे या कवितेचे एक वैशिष्ट्यच असल्यामुळे ते शोभूनही दिसते. यातले बरेच तुकडे कविता म्हणून चांगलेच आहेत पण घोडा या विषयाशी त्यांचा संबंध फारच ओढून ताणून लावावा लागला आहे, हे जाणवत राहतं.

निरोपाच्या कव्वालीतून, निर्गुणी भजनातून, जात्यावरच्या मर्तीकाच्या ओवीतून ही कविता भैरवीकडे प्रवास करते. ती भैरवी असार आयुष्याची आहे, यःकश्चीत जीवनाची आहे, जगाच्या निरोपाची आहे, मैफलीच्या निरोपाची आहे, जीवनाच्या तत्त्वज्ञानाची आहे आणि शेवटी कवितेच्या भरत वाक्याची आहे.

माझ्या खूप आधीपासून कविता लिहिणाऱ्या विलासच्या कवितेला रणधीर शिंदे यांच्यासारख्या समीक्षकाची पाठराखण, मंगेश नारायण काळे यांची रेखाटने, शब्द प्रकाशनासारख्या प्रकाशन संस्थेचा शिक्का अशा काही प्रतिष्ठेच्या गोष्टी प्रथमच लाभत आहेत. प्रकाशकांनी पुस्तक अरबी घोड्यासारखे उमदे सादर केलेले आहे.

(सदर लिखाण ज्येष्ठ कवी इंद्रजित भालेराव यांच्या फेसबुक वॉलवरून घेतले आहे.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com