Indrajeet Bhalerao : शेतकऱ्यांसाठी कल्याणकारी योजना मागणारा भुलोबा

Indian Devotional : महाराष्ट्रभर हा सण साजरा केला जातो. भुलोबा, शंकरोबा, संक्रोबा, श्रीयाळ शेठ, शिराळ अशी वेगवेगळी नावं यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात वापरली जातात.
Indian Devotional
Indian Devotional Agrowon
Published on
Updated on

इंद्रजीत भालेराव

Indian Festival : नागपंचमीचा दुसरा दिवस म्हणजे भुलोब्याचा दिवस. आमच्या गावात दोन घरी असे भुलोबा असायचे. त्या दिवशी दिवसभर आम्ही घरच्या बायांसोबत खूप आनंदानं फिरत राहायचो. भुलोबाभोवती गावातल्या सगळ्या बाया गाणी म्हणायच्या. भुलोबाचं मोठेपण सांगायच्या. भुलोबाचा गौरव करायच्या. खूप सुंदर पद्धतीनं तो दिवस साजरा व्हायचा. आता असं समजतय की महाराष्ट्रभर हा सण साजरा केला जातो. भुलोबा, शंकरोबा, संक्रोबा, श्रीयाळ शेठ, शिराळ अशी वेगवेगळी नावं यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात वापरली जातात.

कुठं हा महादेवाचा प्रतिनिधी भोळा देव म्हणजे भुलोबा, शंकरोबा म्हणून पूजला जातो, तर कुठं तो श्रीयाळसेठ म्हणून पूजला जातो. आमच्या भागात जो हा भुलोबा साजरा केला जातो तो घरातल्या कुण्या तरी मुलाच्या नवसाचा असतो. तो नवस कधी पाच वर्षांचा असतो तर, कधी अकरा वर्षाचा असतो. आपापल्या पद्धतीनं हा नवस बोलून पूर्ण केला जातो. गावात बऱ्याच घरातून असे नवस बोलले जातात आणि आदलून बदलून वेगवेगळ्या घरातून असे भुलोबा साजरे केले जातात. माझ्या लहानपणी माझ्या गावात असे दोन नवसाचे भुलोबा होते. एक मानेजींच्या वाड्यात सुजाणामायचा आणि दुसरा सखाराम सरपंच यांच्या वाड्यात भागामायचा.

नंतर समजलं की ज्याला आमच्या गावातल्या बाया भुलोबा म्हणतात तो एक शेतकऱ्यांचं कल्याण करणारा औट घटकेचा म्हणजे साडेतीन घटीकांचा राजा होऊन गेला. हिंगोलीचे इतिहास संशोधक कै. अण्णासाहेब टाकळगव्हाणकर यांनी हा इतिहास शोधून काढला आणि तो आपल्या पुस्तकातून जगासमोर मांडला. त्यातून कळालं की हा एक लोककल्याणकारी राजा होता. त्याला मिळालेल्या औट घटकेच्या राज्यात त्यानं स्त्रियांचं आणि शेतकऱ्यांचं कल्याण केलं. म्हणून युगानुयुगं स्त्रिया त्याची आठवण ठेवतात आणि गाणी म्हणतात.

हा बिदरच्या बादशहाचा राज्यातला शेठ म्हणजे सावकार होता. तेराव्या शतकात सलग बारा वर्ष पडलेल्या दुर्गादेवीच्या दुष्काळात या सेठ म्हणजे सावकारानं आपली धान्याची कोठारं खुली करून गोरगरिबांना मदत केली. त्यांचा आशीर्वाद मिळवला. त्यामुळं त्याची किर्ती सर्वत्र दुमदुमू लागली. त्याचं हे कर्तृत्व पाहून बिदरच्या बादशहानं त्याला काय हवं ते मग, असं सांगितलं. तर त्यानं औट घटकेसाठी आपणाला राजाच्या सिंहासनावर बसवावं आणि काही निर्णय घेण्याचे अधिकार द्यावेत असं सांगितलं. त्याची ती इच्छा पूर्ण करण्यात आली. तेव्हा त्यानं स्त्रिया आणि शेतकऱ्यांसाठी पुष्कळ गोष्टींचे कायदे केले. त्यानं स्वतःसाठी काही न मागता स्त्रियांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी कल्याणकारी योजना मागितल्या. म्हणून बाया श्रीयाळ शेठला निरोप देताना गाणं म्हणतात,

Indian Devotional
Indian Agriculture : शून्य मशागत : शाश्वत शेतीचा दीपस्तंभ

गंगुबाई लेकी

तोडे लेऊन जाय गं

शिराळासारखा भोळा राजा

कव्हा येईल माय गं

अशी सुंदर गाणी म्हणत या श्रीयाळाची मिरवणूक निघत असे आणि त्यांचे विसर्जनही होत असे. नदीच्या काठाची चिकन माती आणून त्याचा तीन ताळाचा हा भुलोबा तयार करण्यात येत असे. हा तीन तळाचा भुलोबा म्हणजे श्रीयाळ शेठ यांचा राजवाडा धन धान्यानं भरलेला, म्हणून आत सर्व प्रकारचं धान्य ठेवलं जायचं. आणि वरतून त्याला कसया, ज्वारीच्या लाह्या, गुंजा चिकटवल्या जात असत. त्याची सुंदर सजावट करण्यात येत असे. त्याच्यावर शिखर काढून त्याला लाडू, करंज्या, पापड्या, यांचा हार घातला जात असे. आमच्या गावात बबन सोनार म्हणून एक गृहस्थ होते. त्यांच्याकडं ही कला होती. त्यामुळं आमच्या गावचे दोनही भूलोबा तयार करण्याचं काम बबन सोनाराकडं असायचं. सोन्याचांदीचे दागिने घडवणारे कुशल हात हा मातीचा भुलोबा तितक्याच कौशल्याने बनवायचे आणि त्याच्यावर नैसर्गिक बियांची सजावट करून त्याला सजवायचे. त्यासाठी कसया आणि ज्वारीच्या भाजलेल्या लाह्या यांचा उपयोग केला जात असे. त्यासोबतच गुंजांचाही वापर केला जात असे.

कसया आणि लाह्या आम्हाला सहज उपलब्ध होत पण गुंजा उपलब्ध होत नसत. त्यामुळं भुलोबाचं विसर्जन झाल्यावर त्या भुलोबाच्या गुंजा काढून घेण्यासाठी आम्हा लहान मुलांमध्ये स्पर्धा लागलेली असे. त्यासाठी भुलोबासोबतच आम्हीही हौदात उडी मारायचो. त्या गुंजा जमवून, स्वतःच्या डबीत ठेवून, आम्ही खूप श्रीमंत होत असू. या गुंजांचं मोल मुलांमध्ये खूपच असायचं. त्यामुळं ज्याच्याकडं जास्त गुंजा तो जास्त श्रीमंत समजला जायचा. गडद काळा आणि गडद लाल अशा रंगाच्या या गुंजा चकचकीत दिसायच्या. त्यामुळं त्या एखाद्या मौल्यवान दागिन्यासारख्या वाटायच्या. त्यांचं मूल्य जास्त असल्यामुळं मुलांमधले चोर अशा गुंजांच्या पाठीमागे असायचे. ते अशा गुंजांच्या चोऱ्या पण करायचे. कुणाच्या गुंजा कोणत्या हे ओळखता येत नसे, त्यामुळं चोर ओळखण्यात मोठीच अडचण होत असे.

गणपतीची मिरवणूक जशी चौका चौकात थांबत, कसरती दाखवत गणपती मंडळं पुढं पुढं चालतात तसंच या भुलोबाचंही असायचं. तो एका ठिकाणाहून उचलून पुढच्या चौकात ठेवला जायचा. तिथं बाया फेर धरून एक गाणं म्हणायच्या. तिथल्या आजूबाजूच्या घरातल्या बाया त्याची पूजा करायच्या. मग पुन्हा तो पुढच्या चौकात ठेवला जायचा. तिथे पुन्हा बाया फेर धरून दुसरं गाणं म्हणायच्या. आणि तिथल्या आजूबाजूच्या घरातल्या बाया त्याची पूजा करायच्या. असं करत करत तो आडापर्यंत नेला जायचा. आडावर त्याला आंघोळ घालून त्याचं तिथल्या हौदात विसर्जन केलं जायचं.

मिरवणूक जाता जाता बाया वेगळी गाणी म्हणायच्या. त्यात थोडी हसीमजाकही असायची. चौकात उभं राहिल्यावर फेर धरून जी गाणी म्हणायची ती वेगळी असत आणि एकदा भुलोबा उचलून पुढच्या चौकात येईपर्यंत रस्त्यात त्याच्यावर लाह्या शिंपत शिंपत जाताना म्हणायची गाणी वेगळी असत. या गाण्यांमध्ये प्रामुख्यानं जिच्या घरचा भुलोबा आहे तिला चिडवणारी गाणी असायची. आमच्या गावात सुजानामायचा भुलोबा असायचा. त्यांच्या भुलोबाच्या मिरवणुकीत बाया गाणं म्हणायच्या,

सुजाना माय चेंगट गं

लाह्याची मूठ देईना

कुखाचं बोट लावीना

असं म्हणून लाह्या शिंपायच्या तर परत येताना विरहाची गाणी म्हटली जायची.

लाह्या म्हणून लाह्या

परातभर लाह्या

याच वाटनं केल्या गं माय

शिराळाच्या बाया

लाकडं म्हणून लाकडं

गाडीभर लाकडं

याच वाटनं गेले गं माय

शिराळाचे माकडं

Indian Devotional
Indian Agriculture : शाश्‍वत शेतीच्या ‘पुजारी’

या गाण्यातल्या बाया म्हणजे गावातल्या स्त्रिया आणि या गाण्यातली माकडं म्हणजे आम्ही मुलं असा त्याचा अर्थ आम्ही घेत असू. अशी गाणी म्हणत बाया परत यायच्या आणि,

गंगुबाई लेकी

तोडे लेऊन जाय गं

शिराळासारखा भोळा राजा

कव्हा येईल माय गं

अशी विरहाची गाणी म्हटली जायची. कारण श्रीयाळ संपला म्हणजे नागपंचमीचा सण संपला. यानिमित्तानं माहेराला यायला मिळणाऱ्या सगळ्या सासुरवाशीनींना परत सासरला जावं लागणार, या विरहानं व्यथीत व्हायच्या आणि वरील गौरवोद्गार काढायच्या. पुन्हा हा राजा कधी येईल आणि आपणाला पुन्हा माहेराला कधी यायला मिळेल, असाही त्याचा एक अर्थ असायचा. जसं गणपतीला मुलं म्हणतात 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' कारण या निमित्तानं या सासुरवाशीनींना महिना, पंधरा दिवस आपल्या माहेरी राहायला मिळायचं.

माझ्या लहानपणी मी पाहिलेलं आहे की आमच्या एकेक बहिणी या सणासाठी म्हणून जमा व्हायच्या. वाड्यातल्या सगळ्याच घरातल्या विवाहित मुली या सणासाठी म्हणून परत यायच्या. या काळात शेतात काही कामंही नसायची. त्यामुळे सगळ्यांना येताही यायचं. या महिन्यात विविध सणही असायचे. यानिमित्तानं सगळ्या बाया रात्रीच्या वेळी एकत्रित येऊन कितीतरी आधीपासून या शिराळाच्या फेराच्या गाण्याची तयारी करायच्या. विसरलेल्या ओळी घोटायच्या. विसरलेले सूर आळवायच्या. दररोज संध्याकाळी जेवण झालं की वाड्यातल्या सगळ्या नवविवाहिता एकत्रित यायच्या आणि त्यांच्यासोबत एक दोन अनुभवी बायाही जमायच्या. जुन्या अनुभवी बाया ही गाणी पुढं म्हणायच्या. नव्या मुली मागे म्हणायच्या. अशा पध्दतीनं एका पिढीकडून ही गाणी पुढं पुढं जात राहायची.

आम्ही या फेराच्या मधोमध बसून सगळी गाणी ऐकायचो. फेर संपला की बहिणीच्या हाताला धरून घरी जायचो. आणि गुडुप झोपी जायचो. बहिणी आपापल्या सासरला निघून गेल्या की आम्हाला या फेराची स्वप्नं पडायची. आपण बहिणीचा हात धरून फेराकडं चाललो आहोत, बहिणीचा हात सोडून फेरामध्ये बसलेले आहोत, सगळ्या बहिणी छान छान गाणी म्हणताहेत, आपण मध्ये बसून ती गाणी ऐकत आहोत, फेर संपलेला आहे आणि बहिणीचा हात धरून आपण घरी येत आहोत. अशी स्वप्नं सारखी पडायची. स्वप्नातून जागं झालं की खूप हुरहुर वाटायची. वाटायचं पुन्हा हा सण लवकर यावा आणि पुन्हा बहिणी माहेरी याव्यात. त्यांनी फेर धरावा आणि आपण फेरामध्ये बसून त्यांची गाणी ऐकत रहावीत

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com