Biporjoy Cyclone Gujrat Update : कच्छ-सौराष्ट्रला ‘बिपरजॉय’चा तडाखा

Cyclone Update : चक्रीवादळामुळे गुजरातच्या पश्चिम गुजरात वीज कंपनी लि.चे मोठे नुकसान झाले. विजेचे सुमारे ५,१२० खांब कोसळले. त्यामुळे सुमारे ४,६०० गावे अंधारात बुडाली होती.
Biporjoy Cyclone Gujrat Update
Biporjoy Cyclone Gujrat UpdateAgrowon

Ahmedabad News : गुजरातेतील कच्छ-सौराष्ट्र भागाला तडाखा देणाऱ्या ‘बिपोरजॉय’ चक्रीवादळामुळे विजेचे सुमारे ५,१२० खांब कोसळले. त्यामुळे, तब्बल साडेचार हजार गावांतील वीजपुरवठा विस्कळीत झाला. त्यापैकी साडेतीन हजार गावांतील वीजपुरवठा पूवर्वत करण्यात आला असून अद्याप एक हजार गावे अंधारात आहेत.

या चक्रीवादळामुळे सुमारे ६०० वृक्ष उन्मळून पडले. त्याचप्रमाणे, तीन राज्य महामार्गांवरील वाहतूक वृक्ष कोसळल्यामुळे ठप्प झाली. अनेक घरांचेही नुकसान झाले असून, सुदैवाने जीवितहानीचे वृत्त नाही.

अरबी समुद्रात निर्माण झालेले ‘बिपोरजॉय’ चक्रीवादळ गुरुवारी (ता. १५) संध्याकाळी साडेसहा वाजता गुजरातेतील जखाऊ बंदराजवळ धडकले. त्यानंतर रात्री अडीचपर्यंत चक्रीवादळ धडकण्याची प्रक्रिया (लॅंडफॉल) सुरू होती.

सुमारे १४० कि.मी. प्रतितास वेगाने वाहणारे वारे व मुसळधार पावसामुळे विजेचे खांब व वृक्ष उन्मळून पडले. समुद्रकिनाऱ्याजवळील सखल भागातील गावांत समुद्राचे पाणी घुसले. मात्र, या चक्रीवादळामुळे जीवितहानी झाली नाही.

चक्रीवादळामुळे गुजरातच्या पश्चिम गुजरात वीज कंपनी लि.चे मोठे नुकसान झाले. विजेचे सुमारे ५,१२० खांब कोसळले. त्यामुळे सुमारे ४,६०० गावे अंधारात बुडाली होती. त्यापैकी ३,५८० गावांतील वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे.

Biporjoy Cyclone Gujrat Update
Biporjoy Cyclone : बिपरजाॅय चक्रीवादळाचे गुजरातमध्ये थैमान

मदत आयुक्त अलोककुमार पांडे यांनी सांगितले, की चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या रहिवाशांना तत्काळ नुकसानभरपाई देण्याचा आदेश सरकार काढेल. गुजरातेतील किनारी आठ जिल्ह्यांत प्रशासनासह प्रसारमाध्यमे, सामाजिक संस्था, पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली एकमेकांशी समन्वय साधत बचाव व मदतकार्य राबविले.

या सामुदायिक प्रयत्नांमुळे अरबी समुद्राजवळील सर्वाधिक एक लाख लोकसंख्येचे स्थलांतर करता आले. नुकसानीची आकडेवारी प्राथमिक असून प्रशासनाकडून ती अद्ययावत केली जाईल.

कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर होणार

‘बिपोरजॉय’ चक्रीवादळ जखाऊ बंदराला धडकल्यानंतर काही तासांतच या अतितीव्र चक्रीवादळाचे तीव्र चक्रीवादळात रूपांतर झाले. त्यानंतर, आणखी तीव्रता कमी होऊत ते ईशान्येकडे सरकले. दक्षिण राजस्थानावर कमी दाबाच्या क्षेत्रात त्याचे रूपांतर होणार आहे.

असे झाले नुकसान

वृक्ष- ५८१

पक्की घरे - ९

कच्ची घरे- २०

विजेचे खांब- ५,१२०

चक्रीवादळामुळे जीवितहानी नाही, २३ जखमी

‘बिपोरजॉय’ चक्रीवादळामुळे जीवितहानी झाली नाही. मात्र, २३ जण जखमी झाले, अशी माहिती राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (एनडीआरएफ) महासंचालक अतुल कारवाल यांनी सांगितले. ते म्हणाले, की चक्रीवादळ धडकण्यापूर्वी दोघांचा मृत्यू झाला असला तरी ते धडकल्यानंतर एकाही मृत्यूची नोंद नाही.

प्रशासन व इतरांनी कमीत कमी जीवित व वित्तहानीसाठी प्रयत्न केल्याने हे शक्य झाले. कच्छ जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले, मात्र, राजकोट वगळता इतरत्र गुजरातेत इतरत्र जोरदार पाऊस पडला नाही, असेही ते म्हणाले. गुजरातेत एनडीआरएफच्या एकूण १८ तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या.

Biporjoy Cyclone Gujrat Update
Cyclone Biporjoy Update : बिपॉरजॉय चक्रीवादळाचा गुजरातमध्ये हाहाकार, पिकांसह, जनावरे गेली वाहून

राजस्थानात मुसळधार पाऊस

गुजरातला धडकल्यानंतर तीव्रता कमी झालेले ‘बिपोरजॉय’ चक्रीवादळ राजस्थानकडे सरकले असून चक्रीवादळाच्या प्रभावामुळे राजस्थानातील जालोर व बारमेर जिल्ह्यांत गुरुवारी (ता. १५) रात्री मुसळधार पावसाने हजेरी लावली. या जिल्ह्यांत काही ठिकाणी ६० ते ७० मि.मी. पावसाची नोंद झाली.

‘बिपोरजॉय’ चक्रीवादळामुळे एकाच्याही मृत्यूची नोंद झाली नाही, हे सर्वांत मोठे यश आहे. सामुदायिक प्रयत्नांमुळे हे शक्य झाले. चक्रीवादळ धडकण्यापूर्वी एक लाख जणांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले होते.
अलोककुमार पांडे, मदत आयुक्त

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com