Jowar Crop Update : खरिपासाठी ज्वारीचा जैवसमृद्ध वाण : परभणी शक्ती

Jowar Management : जैवसमृद्धीकरण (बायोफोर्टिफिकेशन) ही अन्नधान्य पिकांची पोषकता वाढविण्याची एक प्रक्रिया आहे. पोषकता वाढविण्याच्या या प्रक्रियेमध्ये पिकांमधील प्रथिने, तेल, जीवनसत्त्वे, खनिजे आणि सूक्ष्म पोषक घटकांची प्रमाण वाढवले जाते.
Jowar Farming
Jowar FarmingAgrowon

प्रीतम भुतडा, डॉ. एल. एन. जावळे

Jowar Production : ज्वारी हे अन्नधान्य व चाऱ्यासाठीचे महत्त्वाचे पीक आहे. भारतात ज्वारीखालील क्षेत्र व उत्पादनात महाराष्ट्राचा पहिला क्रमांक आहे. कमीत कमी निविष्ठांसह विविध हंगाम व भौगोलिक परिस्थितीत घेता येणारे पीक म्हणून ज्वारी प्रसिद्ध आहे.

याच ज्वारी पिकामध्ये आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्यांचे प्रमाण वाढवून त्याचे वेगळे वाण विकसित केले जात आहे. अशा जैवसमृद्ध (बायोफोर्टिफाइड) वाणामुळे कुपोषणासह आरोग्याच्या समस्या कमी होतील.

जैवसमृद्धीकरण (बायोफोर्टिफिकेशन) म्हणजे काय?

जैवसमृद्धीकरण (बायोफोर्टिफिकेशन) ही अन्नधान्य पिकांची पोषकता वाढविण्याची एक प्रक्रिया आहे. पोषकता वाढविण्याच्या या प्रक्रियेमध्ये पिकांमधील प्रथिने, तेल, जीवनसत्त्वे, खनिजे आणि सूक्ष्म पोषक घटकांची प्रमाण वाढवले जाते.

हे घडवून आणण्यासाठी पीक पद्धती, पारंपरिक पीक प्रजनन पद्धती किंवा अत्याधुनिक जैवतंत्रज्ञानावर आधारित जनुकीय अभियांत्रिकी आणि जनुकीय समुदाय संपादन यांचा आधार घेतला जातो. जैवसमृद्धीकरण हा कुपोषणाचा मुकाबला करण्याचा एक शाश्‍वत पर्याय आहे. त्यामुळे मानवी आहारासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रमुख पिकांमध्ये सूक्ष्म पोषक घटकांची कमतरता दूर करणे शक्य होते.

Jowar Farming
Kharif Jowar : खरीपात कोणत्या ज्वारीची करावी पेरणी, एक्सपर्ट काय सांगतात?

परभणी शक्ती (पीव्हीके १००९)

प्रसारित वर्ष व क्षेत्र – २०१८, संपूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी.

कालावधी – ११५ ते १२० दिवस

धान्य उत्पादन - ३६ ते ३८ क्विंटल/ हेक्टर, कडबा उत्पादन - ११० ते ११५ क्विंटल/हेक्टर

यात पारंपरिक ज्वारी वाणापेक्षा लोह (४२ मि. ग्रॅ./किलो) व जस्ताचे (२५ मि.ग्रॅ./ किलो) प्रमाण अधिक.

ज्वारीची भाकरी रुचकर व पचनास हलकी, दाण्याची व कडब्याची प्रत उत्तम. या वाणाचा कडबा जनावरे चवीने खातात. ज्वारी जात दाण्यावरील बुरशीजन्य रोगास, खोडमाशी तसेच खोडकीड यासाठी मध्यम सहनशील.

जमीन - पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या जमिनीत हे पीक उत्तम येते. मध्यम ते भारी जमीन निवडावी. ज्वारीचे पीक हे ५.५ ते ८. ४ (सामू) असलेल्या जमिनीत घेता येते. ज्वारी हे पीक पाणथळ जमिनीत वाढत नाही.

पूर्वमशागत व भर देणे

जमिनीची पूर्वमशागत चांगली केल्यास जमिनीत हवा खेळती राहते. तणांचा प्रादुर्भाव कमी राहतो. पूर्वीचे पीक निघाल्यावर लगेच जमिनीची नांगरट करावी. उन्हाळ्यामध्ये एकदा नांगरणी करून वखराच्या २ ते ३ खोल पाळ्या देऊन जमिनीची चांगली मशागत करावी. जमिनीचे सपाटीकरण करून घ्यावे. काडीकचरा वेचून शेत स्वच्छ करावे.

शेवटच्या पाळीपूर्वी १०-१५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे.

पेरणीची वेळ

- मोसमी पाऊस १०० मि.मी. झाल्याबरोबर वाफसा येताच पेरणी करावी.

- या वर्षी पाऊस अद्याप बऱ्याच ठिकाणी पडलेला नाही. जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पेरणी करून घ्यावी. उशिरा पेरणी केल्यास खोडमाशीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होऊन झाडांची संख्या कमी होते. उत्पादनातील घट टाळण्यासाठी पेरणी वेळेवर करावी.

लागवडीचे अंतर व विरळणी

अंतर : दोन ओळींमध्ये ४५ सें.मी., दोन झाडांतील अंतर १५ सें.मी. इतके ठेवावे.

बियाणे : हेक्टरी १० किलो

पेरणीची खोली : ३ ते ४ सें. मी. खोलीवर पेरणी करावी. बी त्यापेक्षा जास्त खोलीवर जाणार नाही.

विरळणी पेरणीपासून १२ ते १५ दिवसांनी करावी.

बीजप्रक्रिया

बियाणापासून होणारे रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून कार्बोक्झिन (३७.५ टक्के) अधिक थायरम (३७.५ टक्के डीएस) हे संयुक्त बुरशीनाशक ३ ग्रॅम प्रति किलो बियाणे.

खोडमाशीच्या नियंत्रणासाठी, इमिडाक्लोप्रीड (४८ टक्के एफएस) १४ मि.लि. प्रति किलो बियाणे या प्रमाणात प्रक्रिया करावी.

जिवाणू संवर्धक ॲझोटोबॅक्टर, स्फुरद विघळविणारे जिवाणू प्रत्येकी २५० ग्रॅम प्रति १० किलो बियाणे या प्रमाणे प्रक्रिया केल्यास उत्पादनात वाढ होते.

रासायनिक खते

८० किलो नत्र, ४० किलो पालाश प्रति हेक्टरी द्यावे. यापैकी ४० किलो नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश पेरणीसोबत द्यावे. उरलेली ४० किलो नत्राची मात्रा २५ ते ३० दिवसांनी द्यावी. खत देताना जमिनीत पुरेसा ओलावा असल्याची खात्री करावी.

जमिनीत उपलब्ध पालाशचे प्रमाण जास्त असेल तर पालाशची मात्रा देणे टाळावे. (१५० किलो १०:२६:२६ मिश्रखत व ५० किलो युरियाच्या माध्यमातून आणि उरलेले अर्धे नत्र पेरणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी ८५ किलो युरियाद्वारे द्यावे.)

आंतरमशागत

तणाची स्पर्धा टाळण्यासोबतच कोरडवाहू क्षेत्रामध्ये पावसाचा ओलावा अधिक काळ टिकवून ठेवण्यासाठी आंतरमशागत महत्त्वाची आहे.

पीक ४० दिवसांचे होईपर्यंतच २ ते ३ वेळा कोळपणी करावी. तणांचा जास्त प्रादुर्भाव असल्यास आवश्यकतेनुसार १ ते २ वेळा निंदणी करावी. तणनाशक वापरल्यास पिकाच्या पेरणीनंतर, परंतु उगवणपूर्व ॲट्राझीन अर्धा किलो प्रति हेक्टरी ६५० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.

Jowar Farming
Kharif Jowar : खरीपात कोणत्या ज्वारीची करावी पेरणी, एक्सपर्ट काय सांगतात?

आंतरपीक

मध्यम ते भारी जमीन आणि हमखास पावसाच्या भागामध्ये खरीप ज्वारी : सोयाबीन २ :४ किंवा ३:६ प्रमाणात घेता येते.

ज्वारी : तुरीचे आंतरपीक ३:३ किंवा ४:२ या प्रमाणात घ्यावे. सोयाबीन, मूग, उडीद ही कमी कालावधीची पिके आंतरपिके म्हणून घेताना ज्वारी : मूग किंवा उडीद २:४ या पीक पद्धतीचा अवलंब करावा.

पाणी व्यवस्थापन

खरीप ज्वारी हे कोरडवाहू पीक असल्यामुळे ओलिताची गरज भासत नाही. परंतु पाऊस न पडल्याने पिकाला ताण पडल्यास पिकाची वाढ खुंटू नये म्हणून पाणी देण्याची सोय असल्यास पिकाच्या पुढील संवेदनशील अवस्थेत संरक्षित पाणी द्यावे.

जोमदार वाढीचा काळ (२८-३० दिवस), पीक पोटरीत येण्याचा काळ (५० ते ७५ दिवस), फुलोरा अवस्था (८० ते ९० दिवस),

दाणे भरण्याचा काळ (९५ ते १०० दिवस).

कीड व्यवस्थापन

१) खोड माशी - या किडीचा प्रादुर्भाव एक महिन्यापर्यंत आढळतो. रोपाची पोंगे मर होऊन जमिनीलगत फुटवे फुटतात.

नियंत्रणासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी

क्विनॉलफॉस (२५ टक्के प्रवाही) २ मि.लि. किंवा क्लोरपायरिफॉस (२० टक्के प्रवाही) २.५ मि.लि.

२) खोड किडा

या किडीचा प्रादुर्भाव पीक एक महिन्याचे झाल्यापासून पक्व होईपर्यंत आढळतो. पानाच्या मध्य शिरेला आडवी छिद्रे आढळतात. पोंगे मर दिसून येते. कणसाच्या सरताळ्यावरसुद्धा प्रादुर्भाव दिसून येतो.

नियंत्रणासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी

क्विनॉलफॉस (२५ टक्के प्रवाही) २ मि.लि. किंवा क्लोरपायरिफॉस (२० टक्के प्रवाही) २.५ मि.लि.

टीप - फवारतेवेळी कीटकनाशक पोंग्यात पडेल याची काळजी घ्यावी.

कापणी व मळणी

परिपक्व अवस्थेत ज्वारीची काढणी केल्यास अधिक उत्पादनाची हमी मिळते. कणसाचा दांडा पिवळा झाला, आतल्या भागातील दाणे टणक झाले व दाण्याचा खालच्या भागावर काळा ठिपका आला म्हणजे ज्वारीचे पीक ही शारीरिकदृष्ट्या पक्व झाल्याचे समजावे.

दाण्यामध्ये सर्वसाधारणपणे ओलाव्याचे प्रमाण २५ ते ३० टक्के असावे.

मळणीनंतर धान्य उन्हात चांगले वाळवून दाण्यातील ओलाव्याचे प्रमाण ९ ते १० टक्के आणल्यानंतरच साठवण करावी.

सुधारित उत्पादन वाढीच्या सूत्रांचा योग्य वापर, योग्य वेळी केला असता परभणी शक्ती या वाणाचे धान्य उत्पादन ३६ ते ३८ क्विंटल प्रति हेक्टर आणि कडब्याचे उत्पादन ११० ते ११५ क्विंटल प्रति हेक्टर मिळू शकते.

अधिक उत्पादन वाढीसाठी महत्त्वाचे मुद्दे

- पावसाच्या आगमनाबरोबर पेरणी केल्यास खोडमाशी आणि इतर रोगांचा प्रादुर्भाव टाळता येतो. अधिक उत्पादन मिळते.

- ज्वारीच्या ताटांची संख्या हेक्टरी १ लाख ८० हजार असावी.

-हमखास पावसाच्या प्रदेशात ८०:४०:४० तर कमी पावसाच्या प्रदेशात ६०:३०:३० ही रासायनिक खताची मात्रा वापरावी.

- शारीरिक पक्वता गाठल्यानंतरच कापणी करावी.

-आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा.

बियाणे उपलब्धता :

परभणी शक्ती या बायोफोर्टिफाइड वाणाचे बियाणे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत कार्यरत पुढील कार्यालयात बियाणे विक्रीस उपलब्ध आहे.

बीज प्रक्रिया केंद्र, परभणी; कृषी विज्ञान केंद्र, खामगाव, जि. बीड; कापूस संशोधन केंद्र, नांदेड; कृषी महाविद्यालय, गोळेगाव, जि. हिंगोली; कृषी विज्ञान केंद्र, बदनापूर, जि. जालना; गळीत धान्य संशोधन केंद्र, लातूर; कृषी विज्ञान केंद्र, छ. संभाजी नगर.

संपर्क - प्रीतम भुतडा (सहायक कृषी विद्यावेत्ता), ९४२१८२२०६६, डॉ. एल. एन. जावळे (ज्वारी पैदासकार), ७५८८०८२१५७, (ज्वारी संशोधन केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com