Sugarcane Rate Bidri Sugar Factory : राज्यात सर्वाधिक तुटलेल्या उसाला दर देणारा साखर कारखाना म्हणून ओळख असलेल्या बिद्री सहकारी साखर कारखान्याने पुन्हा एकदा उच्चांकी दर देण्याचा विक्रम केला आहे. दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याने सन २०२३-२४ च्या गळीत हंगामात आलेल्या उसाला ३४०७ रुपये अंतिम ऊसदर देणार असल्याची घोषणा केली होती, त्यानुसार प्रतिटन ३ हजार २०० रुपये यापूर्वी अदा केले आहेत.
गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर वाढीव ऊसदर २०७ पैकी १०० रुपयांचा पहिला हप्ता तसेच परतीच्या व बिनपरतीच्या ठेवींवरील व्याज तसेच तोडणी-वाहतूकदारांचे कमिशन सबंधितांच्या बँक खात्यावर वर्ग केल्याची माहिती अध्यक्ष, माजी आमदार के. पी. पाटील यांनी दिली.
अध्यक्ष पाटील म्हणाले, गेल्या सन २०२३-२४ च्या गळीत हंगामात कारखान्यास ९ लाख ५४ हजार ७७६ मे. टन उसाचे गाळप झाले असून त्यापासून ११ लाख ९८ हजार ७०० क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन झाले आहे. सरासरी उतारा १२.५५ इतका मिळाला आहे. कारखान्याने सन २०२३-२४ च्या हंगामात आलेल्या उसाला प्रतिटन रुपये ३ हजार २०० प्रमाणे रक्कम रुपये ३०५ कोटी ५२ लाख यापूर्वी अदा केले आहेत.
याशिवाय, संचालक मंडळाने या हंगामासाठी प्रतिटन रुपये २०७ इतका वाढीव दर दोन हप्त्यात देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार पहिल्या हप्त्याची प्रतिटन १०० रुपये प्रमाणे होणारी रक्कम रुपये ९ कोटी ५२ लाख ऊस पुरवठादारांच्या बँक खात्यास वर्ग केली आहे.
तसेच कारखान्याकडे ऊस उत्पादकांच्या यापूर्वी कपात केलेल्या परतीच्या व बिनपरतीच्या ठेवीवरील व्याज रुपये ५९ लाख अदा केले आहे. सन २०२३-२४ या हंगामात तोडणी-वाहतुकदारांचे कमिशन डिपॉझिट रुपये १५ कोटी सबंधीतांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येत आहे. वाढीव ऊसदराचा दुसरा हप्ता लवकरच देण्याचे नियोजन असल्याचे अध्यक्ष पाटील यांनी सांगीतले.
यावेळी संचालक मंडळाचे सर्व सदस्य, व्यवस्थापकीय संचालक आर. डी. देसाई, कार्यकारी संचालक के. एस. चौगले यांच्यासह सर्व अधिकारी उपस्थित होते.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.