Bidri Sugar Election Result : कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी आणि कागल तालुक्याची मिनी विधानसभा म्हणून गाजलेल्या बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा कल आज(ता.०५) समजणार आहे. या निवडणुकीत ५६ हजार ९१ मतदारांपैकी ४९ हजार ९४० मतदारांनी हक्क बजावला आहे.
यासाठी १२० टेबलवर मतमोजणीला सुरूवात झाली आहे. दरम्यान ही निवडणुक जिल्ह्यातील नेत्यांनी अत्यंत प्रतिष्ठेची केल्याने सभासद कोणाला कल देणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.
दरम्यान मतमोजणीचा पहिला कल हाती आला आहे. कागल तालुक्यातील बोळावी, आनुर, सेनापती कापशी, काळमा बेलेवाडी, चिमगाव या गावांतील मतमोजणी पार पडली यावेळी के. पी. पाटील यांचे विमान सुसाट जात असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. तर विरोधी गटालाही सभासदांनी चांगलीच पसंती दिल्याचे दिसत आहे. दरम्यान अद्याप पहिल्या टप्प्यातील कल हाती आला आहे.
मतदानावेळी किरकोळ वादावादीचे प्रकार वगळता १७३ मतदान केंद्रावर सर्वत्र शांततेत मतदान पार पडले. यामुळे पोलिसांनी खबरदारी म्हणून मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. दोन्ही आघाडीचे ५० उमेदवार, शेतकरी संघटनेचे दोन आणि चार अपक्ष अशा ५६ उमेदवारांचे भवितव्य आज समजणार आहे.
जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी या निवडणुकीत लक्ष घातल्याने प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सध्याकाळी ५ पर्यंत कोणत्या गटाला बहुमत मिळणार हे स्पष्ट होणार आहे. या निवडणुकीत दोन कॅबिनेट मंत्री, दोन खासदार, दोन आमदार, पाच माजी आमदार, दोन जिल्हाध्यक्ष, गोकुळ अध्यक्ष एकमेकांविरोधात उभे ठाकल्याने अवघ्या कोल्हापूर जिल्ह्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
त्यामुळे या निवडणुकीसाठी राधानगरी, गारगोटी, कागल, करवीर या तालुक्यांची विधानसभेची रंगीत तालीमच एक प्रकारे पार पडल्याचे बोलले जात आहे. विधानसभेची पेरणी करण्यासाठी सर्वच नेत्यांकडून मोठी ताकद पणाला लावण्यात आली.
मागच्या दोन महिन्यांपासून विद्यमान अध्यक्ष के पी पाटील आणि आमदार प्रकाश आबिटकर यांच्यात कारखाना निवडणुकीवरून जोरदार खडाजंगी पहायला मिळत होती. दरम्यान प्रकाश आबिटकर यांना के पी पाटील यांचे मेहुणे ए वाय पाटील यांची साथ मिळाल्याने आबिटकर गटाला मोठी साथ मिळाली होती. परंतु सभासद कोणाला स्पष्ट बहुमत देणार हे काही तासांत समजणार आहे.
बिद्री साखर कारखान्यासाठी सत्ताधारी श्री महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडी विरुद्ध राजर्षी शाहू परिवर्तन विकास आघाडी असा दुरंगी सामना पहायला मिळाला. या निवडणुकीमुळे आगामी विधानसभेसाठी सुद्धा बरंच चित्र स्पष्ट होणार असल्याने नेमकं या निवडणुकीमध्ये कोण वरचढ ठरणार आणि कोणाचा करेक्ट कार्यक्रम होणार याचं उत्तर सुद्धा अवघ्या काही तासांमध्ये मिळणार आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.