Bhogavati Sugar Factory Election : मागच्या दोन महिन्यांपासून कोल्हापूर जिल्ह्यात गाजलेल्या भोगावती साखर कारखान्याची निवडणुक अखेर पार पडली. भोगावती साखर कारखान्यातील सभासदांनी पुन्हा एकदा काँग्रेस आमदार पी.एन. पाटील यांच्याबाजून कौल देत किंगमेकर केले आहे. काल रात्री उशिरापर्यंत झालेल्या मतमोजणीत आमदार पाटील गटाच्या राजर्षी शाहू शेतकरी सेवा आघाडीने २५ पैकी २४ जागा सुमारे अडीच हजारांच्या फरकाने जिंकल्या. त्यात सत्तारुढ गटातील बहुतांश विद्यमान संचालकांचा समावेश आहे.
विरोधी आघाडीचे नेते धैर्यशील पाटील कौलवकर आणि विद्यमान उपाध्यक्ष व त्यांचे चुलते उदयसिंह पाटील यांच्यामध्ये अखेरच्या क्षणापर्यंत मोठी चुरस झाली. शेवटच्या क्षणी विरोधी गटाचे नेतृत्व करणाऱ्या धैर्यशील पाटील यांचा विजय निश्चित करण्यात आला. यामुळे पी. एन. पाटील यांच्या गटाचा 'गड आला; पण सिंह हरला' अशी स्थिती झाली.
भोगावती कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आमदार पी. एन. पाटील यांना शेकापचे माजी आमदार संपतबापू पवार-पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, 'गोकुळ'चे अध्यक्ष अरुण डोंगळे व जनता दलाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव पाटील यांच्या साथीने एक पॅनेल केले होते. त्यांच्या राजर्षी शाहू शेतकरी सेवा आघाडीला माजी अध्यक्ष धैर्यशील पाटील यांच्या संस्थापक दादासाहेब पाटोल-कौलवकर आघाडीने तसेच माजी अध्यक्ष सदाशिवराव चरापले, भाजपचे हंबीरराव पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जालंदर पाटील यांच्या परिवर्तन आघाडीने आव्हान दिले होते. अत्यंत चुरशीने झालेल्या मतदानामध्ये वाढलेला टक्का अखेर पी. एन. पाटील यांच्या बाजूचा कौल देणारा ठरला.
गेल्या ३५ वर्षांच्या सत्तेमध्ये केवळ एक पंचवार्षिक वगळता सलगपणे आमदार पी. एन. पाटील यांच्या नेतृत्वाखालील कारखान्यावर सत्ता आहे. यावेळीही त्यांचा वट कायम असल्याचे निकालातून स्पष्ट झाले. पहिल्यापासूनच माजी अध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी 'एकला चलो रे' भूमिका घेतली होती. स्वबळावर आघाडी बनवून नवीन चेहरे घेऊन सभासदांसमोर गेलेल्या पाटील यांनी चांगलीच टक्कर दिली. ते विजयी झाले; मात्र त्यांना आपल्या सोबत्यांना विजयी करता आले नाही.
तिसऱ्या आघाडीला सभासदांनी नाकारल्याचे दिसून आले. तिसऱ्या आघाडीचे नेते व कारखान्याचे माजी अध्यक्ष सदाशिवराव चरापले, माजी उपाध्यक्ष हंबीरराव पाटील, नामदेवराव पाटील, जनार्दन पाटील यांनाही अपयशाला सामोरे जावे लागले. या निकालात फक्त विद्यमान उपाध्यक्ष उदयसिंह पाटील यांचा पराभव झाला, संस्था गटाच्या शेवटच्या मतमोजणीमध्ये 'पॅनेल टू पॅनेल' मतदान झाले असताना फक्त पाटील यांना वगळल्याचे दिसून आले.
याचीच चर्चा मतमोजणी केंद्रावर होती. आता आश्वासन पूर्तीचे आव्हान कारखाना आर्थिक अडचणीत असल्याच्या मुद्द्यावरून ही निवडणूक गाजली होती. आता सत्तेवर आलेल्या संचालक मंडळाला कारखाना कर्जमुक्त करावा लागेल व सभासदांची सवलतीची साखर देण्यासाठी कटिबद्ध व्हावे लागेल.
कौलव गट : राजाराम शंकर कवडे (१०७३०), धीरज विजयसिंह डोंगळे (१०८८८), धैर्यशील आनंदराव पाटील (८९२७) राशिवडे गट : मानसिंग विष्णूपंत पाटील (१२००२), अविनाश तुकाराम पाटील (११४०८), कृष्णराव शंकरराव पाटील (१०६४४), प्रा. आनंदा धोंडिराम चौगले (१०२५८). कसबा तारळे गट : अभिजित आनंदराव पाटील (१२३१५), रवींद्र दत्तात्रय पाटील (१०७५८), दत्तात्रय हणमा पाटील (१०९४३).
करवीर तालुका- कुरुकली गट : शिवाजी पांडुरंग कारंडे (१०४१५), धोंडिराम ईश्वरा पाटील (११०७६), केरबा भाऊ पाटील (१०७३१), पांडुरंग शंकर पाटील (१०३०८). सडोली खालसा गट : रघुनाथ विठ्ठल जाधव (११६१६), अक्षय अशोकराव पवार पाटील (१११६७), भीमराव अमृत पाटील (१०५२०), प्रा. शिवाजी आनंदराव पाटील (१०४९८).
हसूर दुमाला गट : प्रा. सुनील आनंदराव खराडे (११०२६) व सरदार चिल्लापा पाटील (११६७९). • महिला राखीव - सीमा मारुती जाधव (११५०९) व रंजना दिनकर पाटील (११४६७) अनुसूचित जाती - दौलू कांबळे ११८२१). इतर मागासवर्ग - हिंदूराव चौगले (९९२७) भटक्या विमुक्त जाती - तानाजी काटकर (११५४८)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.