Rural Development : जिंतूर तालुक्यातील भोगावदेवी गावाने केली दुष्काळावर मात

Drought Update : प्राचीन ऐतिहासिक वारसा असलेल्या भोगाव देवी (ता.जिंतूर, जि. परभणी) येथील शेतकऱ्यांनी लोकसहभागातून लघु सिंचन तलावातील गाळ काढला. त्यामुळे पाणीसाठवण क्षमता वाढली. कधी काळी पडीक असलेल्या जमिनींची उत्पादकता वाढण्यास मदत झाली.
Rural Development
Rural DevelopmentAgrowon
Published on
Updated on

Water Management : परभणी जिल्ह्यात जिंतूर- औंढा नागनाथ राज्यमार्गावरील भोगाव देवी येथे आई श्री.जगदंबा देवीचे प्राचीन मंदिर (श्रीदेवीसाहेब संस्थान) आहे. मंदिरासमोर २५ फूट उंच दगडी दीपमाळ आहे. राज्यभरातील भाविक दर्शनासाठी येतात.

मंदिराजवळ लघु सिंचन तलाव आहे. डोंगरावर वृक्षलागवड करण्यात आली आहे. परभणी जिल्ह्यातील हे प्रमुख तीर्थक्षेत्र पर्यटनस्थळ म्हणून विकसित होत आहे.

दृष्टीक्षेपात भोगावदेवी गाव

भौगोलिक क्षेत्र....२७१८ हेक्टर, पैकी लागवडी योग्य- २२१६ हे.

लोकसंख्या- (सन २०११ नुसार) ५५८१, शेतकरी खातेदार- १९१०

प्रमुख पिके- सोयाबीन, कपाशी, तूर, हरभरा, ज्वारी, हळद

फळबाग- १२ हेक्टर, हळद- ४५० हेक्टर

ठिबक सिंचन संच- सुमारे २००

शेतकरी गट- १५

कुटुंब संख्या...१६००

स्वच्छतागृहे...१४००

Rural Development
Water Management : गाळ अन् वाळू पाणी व्यवस्थापन महत्त्वाचे

पाणीटंचाई समस्या

अवर्षण प्रवणक्षेत्र असलेल्या जिंतूर तालुक्यात डोंगराळ भागातील शेतकऱ्यांची मदार खरिपावरच अवलंबून असते. भोगाव देवी शिवारातील २० ते २५ टक्के जमीन माळरानाची, दगड- गोटे, हलक्या प्रतीची आहे. शेतकऱ्यांना सातत्याने दुष्काळाला सामोरे जावे लागते.

दरवर्षी उन्हाळ्यात पाणी टंचाई असे. विहिरी अधिग्रहण कराव्या लागत. टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागे. श्रीदेवीसाहेब मंदिराजवळ जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाअंतर्गत ६५ एकरांवर तलावाचा विस्तार आहे.

उत्तर दिशेला डोंगरावर पडणाऱ्या पावसाचे पाणी ओहोळ, ओढे, नाले तलावात येऊन जमा होते. या तलावाची निर्मिती १९७२ च्या दुष्काळात झाली. त्यानंतरची ३५ ते ४० वर्षात त्यात मोठ्या प्रमाणात गाळ जमा झाला. पाणी साठवणक्षमता कमी झाली.

समस्येवर मात

गावातील जन कल्याण समिती आणि लोकसहभागातून २०१५-१६ मध्ये जलयुक्त शिवार अभियानांतर्गत तलावातील गाळ काढण्याची मोहीम सुरू झाली. जिंतूर येथील ज्ञानोपासक महाविद्यालयातर्फे राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत विद्यार्थ्यांनी श्रमदान करून तलाव स्वच्छता मोहीम राबविली. परिसरात वृक्षारोपण केले.

आता पाणी साठवणक्षमता वाढली आहे. दीर्घकाळ पाणीसाठा उपलब्ध राहत आहे. गावशिवारातील विहिरींना पाणी राहात आहे. प्राचीन बारवांमधीलही गाळ काढला आहे.

पीकपध्दतीत बदल

तलावांमधून ४० ते ५० हजार ब्रास उपसलेला गाळ शेतकऱ्यांच्या शेतात वापरला. त्यातून ४०० ते ५०० एकर जमिनींची सुपीकता वाढत आहे. गहू, हरभरा, उन्हाळी भुईमूग, तीळ, ऊस, आंबा,सीताफळ, पेरू आदींचे क्षेत्र वाढत आहे. गावाशेजारी वनक्षेत्र आहे. त्यामुळे हरिण, रानडुक्कर, नीलगायी आदी वन्य प्राणी शेतीची नासाडी करतात.

परंतु हळदीला त्यांचा त्रास नसल्याने पाच- सहा वर्षांत त्याखालील क्षेत्रात ४५० हेक्टरपर्यंत वाढ झाली आहे. गादीवाफे व ठिबक सिंचनाचा अंगीकार केल्याने एकरी २८ ते ४० क्विंटल (वाळवलेल्या) पर्यंत उत्पादन मिळत आहे. हिंगोलीसह अन्य मार्केटमधील व्यापाऱ्यांची या हळदीला पसंती मिळत आहे.

दर गुरुवारी आठवडे बाजार भरतो. परिसरातील गावांतील शेतकरी शेतमाल खरेदी- विक्रीसाठी येतात. कृषी निविष्ठा विक्री केंद्र सुरु झाले आहेत. गावातील व्यापारी सोयाबीन, तूर, हरभरा, हळद आदींची खरेदी करत आहेत. गावच्या अर्थकारणाला गती मिळाली आहे.

शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना

कृषी सहाय्यक सुनील भाले म्हणाले आत्मा अंतर्गत शेतकरी गटांना हळद प्रक्रिया यंत्र सामग्री, डाळ गिरण्या यांचा लाभ देण्यात आला. सेंद्रिय शेती अंतर्गत गांडूळ खतनिर्मिती होत आहे. जैविक निविष्ठा निर्मितीसाठी साहित्य दिले आहे. २०१५ मध्ये भोगावदेवी शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना झाली. ५२० शेतकरी त्याचे सभासद आहेत.

धान्याची स्वच्छता व प्रतवारी हा कंपनीचा प्रमुख उद्देश आहे. कंपनीचे अध्यक्ष शेषराव देवकर म्हणाले की सोयाबीनची सुधारित पद्धतीने म्हणजे बीबीएफ व टोकण पद्धतीने लावण करतो. विविध वाणांचा बिजोत्पादन कार्यक्रम घेतला. हमीभाव खरेदी केंद्राची सुविधा उपलब्ध केली.

दुग्धव्यवसायातून ताजे उत्पन्न

काही वर्षापूर्वी गावातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर दुग्धव्यवसाय करीत. मात्र शासकीय संकलन बंद झाल्यानंतर त्याचे प्रमाण कमी झाले. आता बारमाही चारा- पाणी उपलब्ध होत असल्याने अनेक शेतकरी पुन्हा या व्यवसायाकडे वळले आहेत. गावात एका डेअरीचे दूध संकलन केंद्र सुरु झाले आहे. दररोज ५०० ते ६०० लिटर दूध संकलन होते.

गावातील विकासकामे

- सरपंच शीतलताई मोरे, उपसरपंच महादेव शेवाळे, ग्रामसेवक मारुती मोरे व ग्रामपंचायत सदस्यांच्या पुढाकारातून विविध उपक्रमांची अंमलबजावणी. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ५० विहिरींची कामे. मुख्यमंत्री पेयजल योजनेंतर्गत विहीर, जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेची विहीर मंजूर.

-नळपाणीपुरवठा योजनेव्दारे कुटुंबांना पाणी पुरवठा.

-पाच ते सहा प्रमुख रस्त्यांवर ‘पेव्हर ब्लॉक’.

-चार पाणंद तसेच शेतरस्त्यांची कामे मंजूर. पैकी एका रस्त्याचे मजबुतीकरण झाले.

-पशुचिकित्सालयाची सोय

श्रीदेवीसाहेब संस्थानचे उपक्रम...

-श्रीदेवीसाहेब संस्थानची १५० एकर शेती करार पद्धतीने दिली आहे.

-संस्थान समितीचे अध्यक्ष माजी आमदार गुलाबचंद राठी, उपाध्यक्ष भगवानराव देशमुख यांच्या मार्गदर्शनातून मंदिर परिसरात मंगल कार्यालयाची बांधणी. माफक शुल्कात गरजूंना त्याची उपलब्धता.

-नवरात्र उत्सवात भाविकांसाठी अल्पदरात भोजन व्यवस्था. भक्त निवासाची सोय.

संपर्क- कृष्णकांत मोरे देशमुख- ९४२२५५७१४४, मारुती मोरे( ग्रामसेवक) ९८२२७७५०३३, सुनील भाले ( कृषी सहाय्यक) ९०४९२२३३०९

Rural Development
Water Stock In Marathwada : मराठवाड्यातील सर्वच प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा ३४ टक्क्यांवर
ॲग्रोवनचे आम्ही सुरवातीपासून वाचक आहोत. यंदा गावातील १५ हून अधिक शेतकरी त्याचे वार्षिक वर्गणीदार झाले आहेत. गावात झालेल्या विविध कामांमधून शेतीचे अर्थकारण भक्कम होऊ लागले आहे.
लक्ष्मीकांत ऊर्फ बालाजी मोरे देशमुख, प्रगतिशील शेतकरी, ८८०५५०३६१११
पाच वर्षात तलावातील १० ते १२ हजार ब्रास गाळ काढून खडकाळ, मुरमाड जमिनीवर वापरला. सिंचन व्यवस्था केली. आता १८ एकरांत बारमाही भाजीपाला, बागायती पिकांचे उत्पादन घेता येत आहे.
अनंत पुंड, ९२७३८१२५५५
आगामी काळाची गरज लक्षात घेऊन पाणीपुरवठा योजनांच्या स्त्रोंताचे बळकटीकरण केले आहे. शेतमाल वाहतूक सुलभ व्हावी यासाठी पाणंद व शेतरस्त्यांचे मजबुतीकरण केले जात आहे.
शीतलताई चंद्रकांत मोरे-देशमुख, सरपंच, भोगाव देवी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com