
Bhandara News: लष्कराच्या आयुध निर्माण कारखान्यात शुक्रवारी (ता.२४) सकाळी साडेदहाला झालेल्या स्फोटात चार जणांचे मृतदेह हाती लागले असून, अद्याप ५ जण बेपत्ता असल्याची माहिती आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तविली जात आहे. घटनेतील पाच जखमी व्यक्तींवर उपचार सुरू आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे.
जवाहरनगरस्थित ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या आरकेआरच्या ब्रॅंच सेक्टरमध्ये हा स्फोट झाला. पहाटे सात वाजता या विभागात कर्मचारी येतात. त्यानंतर सकाळी नऊ वाजता प्रत्यक्ष कामास सुरुवात होते. १२ः३० ते १ः३० या वेळेत भोजनाची सुटी असतो. सायंकाळी पाच वाजता शिफ्ट पूर्ण होते. बर्फ किंवा खाणीत स्फोट घडविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या लो टेंपरेचर एक्सप्लोसिव्ह (एलटीपीई) तसेच आरडीएक्स सारख्या स्फोटकाचे उत्पादन या ठिकाणी होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, हा स्फोट झाला त्यावेळी प्रक्रिया, देखभाल, गुणवत्ता नियंत्रण या विभागांचे कामगार तेथे उपस्थित होते. सुमारे १४ कामगार उपस्थित असताना अचानक स्फोट झाल्याची माहिती आहे. स्फोटके तयार करण्यासाठी असलेल्या इमारतीचे छत स्फोटानंतर कोसळले. त्याखाली सर्वच्या सर्व १४ कामगार दबले. सुमारे पाच किलोमीटरपर्यंत या स्फोटाचे आवाज ऐकू आले. घटनास्थळी एनडीआरएफ, एसडीआरएफ तसेच राज्य शासनाकडून बचावकार्य राबविण्यात येत आहे.
चार मृतदेह आढळले
घटनास्थळावरून बचाव पथकाला चंद्रशेखर गोस्वामी (वय ५९), मनोज मेश्राम (वय ५५), अजय नागदेवे (वय ५१) तसेच अंकित बारई (वय २०) या चौघांचे मृतदेह मिळाले. एन. पी. वंजारी (वय ५५), संजय राऊत (वय ५१), राजेश बडवाईक (वय ३३), सुनीलकुमार यादव (वय २४), जयदीप बॅनर्जी (वय ४२) हे जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, उर्वरित पाच जणांचा उशिरापर्यंत शोध सुरू होता. परिणामी घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
टेस्टिंग सुविधा
स्फोट झालेल्या कारखान्यात चाचणी सुविधा व अत्याधुनिक प्रयोगशाळा आहे. या ठिकाणी भारतीय लष्करासाठी अनेक प्रकरणाची उत्पादने तयार केली जातात. त्यामध्ये ॲसिडपासून अनेक प्रकारच्या स्फोटकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे जानेवारी २०२४ मध्ये देखील या आयुध निर्माण कंपनीत भीषण स्फोट झाला होता. त्यावेळी एक कर्मचारी ठार झाला होता.
पीडितांना सर्वोतोपरी मदत : राजनाथ सिंह
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले आहे. समाज माध्यमावर त्यांनी, भंडारा येथील आयुध निर्माण कंपनीत झालेल्या स्फोटाबाबत जाणून अतिशय दुःख झाले. शोकग्रस्त कुटुंबाप्रती माझ्या संवेदना. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत ही प्रार्थना. घटनास्थळी बचाव पथके तैनात आहेत. पीडितांना सर्वोतोपरी मदत करण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.