Patna News : देशभरात जवळपास ४० हजार शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन झाल्या; मात्र मूळ व्यावसायिक उद्देश व धोरण त्यांच्याकडे नाही. परिणामी त्यातील जवळपास २५ टक्के कंपन्या स्थापना होऊनही बंद आहेत. ही परिस्थिती बदलण्यासाठी बलस्थाने ओळखून व्यवसायिक विस्तार व मूल्यसाखळी विकसित करण्याची गरज आहे.
त्यातून आर्थिक समृद्धी आणावी, असे प्रतिपादन राष्ट्रीय कृषी विस्तार व्यवस्थापन संस्थेचे (मॅनेज) देखरेख व मूल्यमापन विभागाचे संचालक डॉ. के. सी. गुम्मागोलमठ यांनी केले. ‘सहकार भारती’या संस्थेच्या शेतकरी उत्पादक कंपनी प्रकोष्ठ आयोजित पहिल्या दोन दिवसीय एफपीओ राष्ट्रीय अधिवेशनात रविवारी (ता. २५) ‘शेतकरी उत्पादक कंपन्यांचे धोरण व कामकाज’ या विषयावर डॉ. गुम्मागोलमठ बोलत होते.
ते म्हणाले, की शेतकऱ्यांनी संघटित होऊन शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना केली. मात्र काही कंपन्यांसमोर आव्हाने आजही आहेत. कंपन्यांनी कामकाज बदल, व्यवसायिक दृष्टिकोन, तंत्रज्ञान व यांत्रिकीकरण स्वीकारण्याची गरज आहे.
गुजरातमधील ‘अमूल’ हे आदर्श उदाहरण असल्याचे या वेळी त्यांनी सांगितले. शेतीमालाचा प्रक्रिया व त्यांचा ब्रँड महत्त्वाचा आहे. आता शेतकऱ्याला व्यवसाय बनवण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
काही शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन झाल्यानंतर फक्त कृषी निविष्ठा विक्री व्यवसाय करत आहेत. मात्र यासाठी या कंपन्या नाहीत. त्यामुळे संचालक, अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी व भागधारक यांनी बाजारपेठ ओळखून उत्पादने विकसित करावी, असाही सल्ला त्यांनी दिला.
शेतकरी उत्पादक कंपन्यांचे सल्लागार निरंजन कुमार म्हणाले, की शेतीपुढे हवामान बदलाचे धोके आहेत. त्यावर पर्याय शोधले पाहिजेत. उत्पादन वाढ करून शेतकऱ्यांनी काढणीपशात हाताळणी, प्रतवारी करून विक्रीतून उत्पन्न वाढ साधावी.
बाजारपेठेतील चढउतार मागणी मागणीचा काळ यातील सूक्ष्म निरीक्षणे नोंदवून काम करण्याची गरज आहे. अभिजित जवळेकर यांनी कंपनीचे कामकाज व विविध नोंदणी दस्तावेज याबाबत सविस्तर माहिती दिली.
महिला कंपन्यांना पाठबळ देण्याची गरज
देशभरात अनेक ठिकाणी महिला शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन होत आहेत. त्याही संघटितपणे कामकाज करून पुढे येत आहेत. मात्र अनेक अटीशर्तीमुळे त्यांना अडचणी आहेत. केंद्र शासनाने समस्यांची माहिती घेऊन याबाबत अडचणी सोडवाव्यात.
केंद्रीय योजनांचा लाभ महिलांना कसा मिळेल यासाठी धोरण हाती घ्यावी. त्यातून महिला शेतकऱ्यांच्या कंपन्या सक्षम होतील, अशी मागणी पृथाशक्ती शेतकरी उत्पादक संघाच्या अध्यक्षा डॉ. भाग्यश्री टिळेकर यांनी केली.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.