Pista Farming : बेव्हर्ली, कॅलिफोर्निया पिस्ता, बदामाचे आगर

Almond Farming : अमेरिकेतील बेव्हर्ली आणि कॅलिफोर्निया परिसरात फळबागा, फळ प्रक्रिया उद्योग आणि मोठे डेअरी फार्म आहेत. या भागात प्रामुख्याने पिस्ता आणि बदाम लागवड मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते.
Pistachio Farming
Pistachio FarmingAgrowon

Agriculture In America : अमेरिकेतील अभ्यास दौऱ्यामध्ये सकोवा नॅशनल पार्क येथे जात असताना डोंगराळ प्रदेशातील रस्ता संपला आणि पुढे नजर जाईल तिकडे हिरवेगार मळे दिसायला लागले. हा परिसर बेव्हर्ली म्हणून ओळखला जातो.

या ठिकाणी फळबागा, फळ प्रक्रिया उद्योग आणि मोठे डेअरी फार्म दिसतात. प्रवासामध्ये मुख्य रस्ता सोडून आम्ही डोंगराळ भागात जाण्यासाठी लहान रस्ता पकडला तेव्हा द्राक्षासारखे घड असणाऱ्या झाडांच्या बागा दिसायला लागल्या. तेव्हा मलाही कळलं नाही ही फळे नेमकी कोणती आहेत? माझे बंधू म्हणाले, की ही पिस्त्याची बाग आहे.

या भागात पिस्ता लागवड मोठ्या प्रमाणात आहे. आम्ही एका फळबागेत थांबून पिस्त्याचे झाड आणि त्याला लागलेली फळे पाहिली. येथील शेतकऱ्यांकडून मला थोडीफार या पिकाबाबत चर्चादेखील करता आली.

अमेरिकेमध्ये मध्यपूर्व स्थलांतरित लोकांनी १८५४ मध्ये पिस्ता आणला. १८७५ मध्ये फ्रान्समधून आयात केलेली काही झाडे सोनोमा (कॅलिफोर्निया) येथे लावण्यात आली. या झाडांची वाढ हळू असल्याने वनस्पती शास्त्रज्ञ विल्यम्स यांनी इराण येथून उष्ण कोरड्या वातावरण आणि हिवाळ्यातही चांगल्या प्रकारे वाढतील अशा वीस जाती आणल्या.

या जाती अमेरिकेत चांगल्या प्रकारे रुजल्या. पिस्त्याची मूळ जन्मभूमी ही इराण, सीरिया, लेबनॉन, रशिया आणि अफगाणिस्तान. पुरातत्व शास्त्रज्ञांना ईशान्य इराक जवळ जेरोम येथे खोदकामाच्या ठिकाणी पिस्त्याचे पुरावे सापडल्याचा उल्लेख आहे.

फार पूर्वीपासून पर्शियन लोक पिस्त्याचा वापर मोठ्या प्रमाणात करत आहेत. मिठाई, फळांचे सॉस घट्ट करण्यासाठी पिस्त्याचा वापर केला जातो. भारतात जम्मू-काश्मीरमध्ये पिस्ता लागवड आहे. काही प्रमाणात कर्नाटक, तमिळनाडू, पश्‍चिम बंगाल, पंजाब राज्यांतही प्रायोगिक लागवड झालेली आहे.

Pistachio Farming
Groundnut Crop: 'गरिबाचे बदाम' अशी ओळख भुईमुगाला कोणी दिली?

पूर्वीच्या काळी इराण, सीरिया, लेबनॉनमधून युरोपात मोठ्या प्रमाणामध्ये पिस्त्याची आयात केली जायची. साधारणपणे १८८० च्या दशकात आयात पिस्ता अमेरिकेत खूप लोकप्रिय झाला होता. १८५४ ते १८७५ पर्यंत अमेरिकेतील हवामानात येऊ शकणाऱ्या पिस्ता जातींची लागवड करून नवीन जातींचे संशोधन करण्यात आले.

त्यातून मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली. उत्पादनवाढीला चालना मिळाली. अमेरिकेत पिस्त्याची मोठ्या प्रमाणात विक्री सुरू झाली. त्यामुळे अमेरिकेत पिस्ता लोकप्रिय होऊन मागणीत वाढ झाली. देशांतर्गत लागवडीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने उत्पादनदेखील वाढले. त्यामुळे पिस्ता निर्यातीला चांगल्या प्रकारे चालना मिळाली.

साधारणपणे १९६० च्या दशकात कॅलिफोर्निया, ॲरिझोना विभागांत मोठ्या प्रमाणात पिस्ता लागवडीस चालना मिळाली. परागीकरणासाठी प्रति तीस मादी झाडांपाठीमागे एका नर झाडाची लागवड केली जाते. सध्या अमेरिकेमध्ये सुमारे ४,४६,००० एकरांपेक्षा जास्त क्षेत्रावर पिस्ता लागवड करण्यात आली आहे.

सुमारे एक हजार शेतकरी पिस्ता उत्पादनात गुंतलेले आहेत. पाणी कमी लागत असल्यामुळे अनेक शेतकरी बदाम, अक्रोडऐवजी पिस्ता लागवड क्षेत्र वाढवत आहेत. झाडांची योग्य वाढ होऊन त्यांना फळे येण्यासाठी सात ते दहा वर्षे लागतात. एक झाड पुढे १०० वर्षे फळे देते. साधारण लाल गुलाबी रंग आल्यावर फळे तयार होतात.

त्या वेळी यंत्राच्या साह्याने झाड हलवून फळे गोळा केली जातात. फळ काढणीसाठी झाड तीन ते चार सेकंद यंत्राने हलवले जाते, त्यामुळे पक्व फळे गळून पडतात. ही पक्व फळे गोळा केली जातात. पुढे प्रक्रिया करून कवचासह किंवा कवच विरहित प्रकारांमध्ये खारवून किंवा न खारवता फळांची विक्री वेगवेगळ्या मार्गातून केली जाते.

Pistachio Farming
Pista Production : मानवी आहारात पिस्ता कसा आला?

आनंदी फळ ः

पिस्ता हे फळ आनंदाशी संबंधित आहे, म्हणूनच चीनमध्ये या फळास ‘हॅपी नट’ आणि इराणमध्ये ‘स्माइलिंग नट’ असे म्हणतात. चीनमध्ये नववर्षानिमित्त भेट म्हणून अनेक वेळा पिस्ता फळे दिली जातात. साधारण २८ ग्रॅम पिस्त्यांमधून एका अंड्याएवढी म्हणजे सहा ग्रॅम प्रथिने मिळतात. पिस्ता हे विविध प्रकारची जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंटचा खजिना आहे. त्यामुळे अनेक आजारांवर उपचार आणि प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी पिस्त्याला मागणी आहे.

कॅलिफोर्निया ः बदामाचे आगर

कॅलिफोर्नियातील सकोवा नॅशनल पार्कच्या रस्त्यावर बेव्हर्ली फिल्ड परिसरात पिस्ता लागवडीबरोबरीने हजारो एकरांवर बदामाच्या बागा मोठ्या प्रमाणात आहेत. नजर जाईल तिकडे बागा, सुंदर घरे आणि फळ प्रक्रियेच्या इमारती दिसतात. आपल्याकडे आपण बागेत, बांधावर, एखाद्या घराजवळ बदामाचे मोठे झाड पाहतो. हिरवे बदाम, पानगळती सुरू झाल्यावर लाल पिवळी होणारी पाने आपण पाहतो. पण व्यावसायिक बदामाची लागवड मला अमेरिकेत पाहण्यास मिळाली.

बदाम हे फळ अत्यंत पौष्टिक आणि प्रथिने, जीवनसत्त्वांसोबत खनिज द्रव्यांनी परिपूर्ण आहे. त्यामुळे जागतिक बाजारपेठेत यास चांगली मागणी आहे. बदाम फळाची लोकांमध्ये जागृती व्हावी, मोठ्या प्रमाणात वापर वाढावा यासाठी अमेरिकेत १६ फेब्रुवारी हा दिवस ‘राष्ट्रीय बदाम दिवस’ म्हणून साजरा केला जातो.

ग्रीक आणि रोमन मंडळींच्या खाद्य संस्कृतीत बदामाचे अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. बदाम उत्पादनात जगात अमेरिका आघाडीवर आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्निया हे राज्य सर्वांत मोठे बदाम उत्पादक राज्य आहे. जगाच्या तुलनेत ८० टक्के उत्पादन कॅलिफोर्निया राज्यात होते. अठराव्या शतकात स्पॅनिश मिशनऱ्यांनी कॅलिफोर्नियामध्ये बदाम आणला.

अनुकूल वातावरण आणि जमिनीमुळे येथील शेतकऱ्यांनी बदाम लागवडीस सुरुवात केली. बदामाच्या अल्ट्रा, बट्टे, कॅलिफोर्निया, पेपर शेल, पियरलेस, कार्मेल, मखदूम, वारीस या जाती चांगले उत्पादन देतात. साधारण तीन ते पाच वर्षांत फळे यायला सुरुवात होते. बदामाचे झाड २५ ते ३० वर्षांपर्यंत उत्पादन देते. या पिकास कमी पाणी लागते. परागीभवनासाठी मधमाश्‍या फार महत्त्वाच्या भूमिका बजावतात. त्यामुळे बदामाच्या फळबागेत मधमाशीपालन व्यवसायाला चालना मिळाली आहे. बदामाच्या कवचाचा उपयोग पशुखाद्यामध्ये केला जातो.

कॅलिफोर्नियामध्ये सप्टेंबर-ऑक्टोबरपासून परिपक्व फळे झाडावरून काढली जातात. मोठ्या यंत्राद्वारे बदामाची झाडे हलवली जातात. जमिनीवर पडलेली फळे तिथेच आठ, दहा दिवस वाळवली जातात किंवा यंत्राद्वारे गोळा करून ती सावलीमध्ये वाळवतात. त्यानंतर प्रक्रियेसाठी कारखान्यात नेली जातात. कॅलिफोर्निया परिसरात बदाम प्रक्रिया करणारे मोठे प्रकल्प कार्यरत आहेत. त्यांनी या बदामाचे जागतिक पातळीवर चांगले ब्रॅण्डिंग केले आहे.

(लेखक सेवानिवृत्त सहायक आयुक्त (पशुसंवर्धन) आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com