Mumbai News : पंधराव्या कृषी नेतृत्व पुरस्कार समितीचा २०२४ चा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार महाराष्ट्राला जाहीर झाला. भारताचे माजी मुख्य न्यायाधीश आणि केरळचे राज्यपाल पी. सदाशिवम यांच्या अध्यक्षतेखालील समितीने ही घोषणा केली. नवी दिल्ली येथे ता. १० रोजी होणाऱ्या सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हा पुरस्कार स्वीकारणार आहेत. ‘ॲग्रिकल्चर टुडे’च्या वतीने या पुरस्कारांची सुरुवात केली आहे.
या पुरस्कारांसाठी समितीने राज्यातील पर्यावरण रक्षण, अन्न सुरक्षा यांच्या माध्यमातून घेतल्या गेलेल्या शाश्वत विकास धोरणांची दखल घेतली असल्याची माहिती राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी दिली. समितीचे विद्यमान अध्यक्ष सदाशिवम यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांचा या पुरस्कार निवड समितीमध्ये समावेश आहे.
राज्यात बांबू लागवड, तृण धान्य अभियान आणि औष्णिक वीज निर्मितीत बायोमासचा वापर असे अनेक उपक्रम राज्यात सुरू आहेत. याची दखल समितीने घेतली. हा पुरस्कार ता. १० रोजी नवी दिल्लीत होणाऱ्या १५ व्या कृषी नेतृत्व संमेलनात प्रदान केला जाईल.
या संमेलनात केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंग चौहान, केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी, तसेच ब्राझील, अल्जेरिया, नेदरलँडचे राजदूत, महाराष्ट्र, यूपी, हरियाना, हिमाचल प्रदेश, नागालँड या राज्यांचे मंत्रीगण व इतर मान्यवर सहभागी होणार आहेत.
या पुरस्काराबाबत माहिती देताना पाशा पटेल म्हणाले, ‘२१ लाख हेक्टर क्षेत्रावर देशातील सर्वांत मोठे बांबू मिशन राबविण्याचा निर्णय आहे. यात नंदूरबार येथील धडगांव तालुक्यातील ७० गावच्या सरपंचांनी केंद्रीय फलोत्पादन सचिव प्रभातकुमार यांच्या समोरच आमचा प्रश्न बांबू लागवडीशिवाय सुटणार नाही, अशी मागणी केली. केंद्रानेही त्याला होकार दिला.
या वर्षीच्या राज्याच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री पवार यांनी नंदूरबार जिल्ह्यातील एक लाख २० हजार एकर जमिनीमध्ये केंद्र आणि राज्य मिळून हरित पट्टा निर्माण करण्याचे जाहीर केले आहे. या अभियानासाठी अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पातही तरतूद केली आहे. याशिवाय सरकारने १२३ प्रकल्पांना मार्गी लावून सुमारे १७ लाख हेक्टरची सिंचन क्षमता निर्माण करण्याचा चंग बांधला आहे. मिलेट मिशन, नमो शेतकरी महासन्मान योजना आदी योजना शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने राबविल्या आहेत.
आतापर्यंत हा पुरस्कार ज्येष्ठ नेते माजी कृषिमंत्री शरद पवार, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, शिवराजसिंह चौहान, खासदार अखिलेश यादव तसेच दिवंगत प्रकाशसिंह बादल, वर्गीस कुरियन, एमएस. स्वामिनाथन यांना दिला गेला आहे. स्व. स्वामिनाथन यांनी दहा वर्षे या संस्थेचे अध्यक्षपद भूषविलेले आहे. सध्या डॉ. एम. जे. खान या संस्थेचे अध्यक्ष आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.