BBF Technology : ‘बीबीएफ` तंत्रज्ञान ठरतेय शेतकऱ्यांना उपयुक्त

BBF Machine Sowing : रब्बीतील ओलाव्यासाठी सपाट वाफे तंत्रज्ञान
BBF Technology
BBF TechnologyAgrowon

सुदर्शन सुतार
Soyabean Farming With BBF Technology : महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे सोलापूर येथे विभागीय कृषी संशोधन केंद्र कार्यरत आहे. त्या अंतर्गत सोलापूर भागातील सोयाबीन शेतीत ‘बीबीएफ’ तंत्रज्ञानाची प्रात्यक्षिके व प्रसार केला जात
आहे. या तंत्राचा अवलंब केलेल्या शेतकऱ्यांना त्याचे विविध फायदे मिळण्यासह एकरी उत्पादनवाढही साधता आली आहे. विभागीय केंद्राने विकसित केलेल्या सपाट वाफे तंत्रज्ञानाचा फायदा रब्बीतही ओल टिकवण्यासाठी होणार आहे.

सोलापूरपासून २० किलोमीटरवर उत्तर सोलापूर तालुक्यात मार्डी, नरोटेवाडी, राळेरास, बाणेगाव ही गावे आहेत. येथे पाण्याचा खात्रीचा स्रोत नाही. विहीर, बोअरवरच शेती अवलंबून आहे. सोलापूरची बाजारपेठ जवळ असल्याने जेमतेम पाण्यावर कांदा, भाजीपाला तर हंगामी म्हणून तूर, सोयाबीन, सूर्यफूल, मूग, उडीद आदी पिके होतात. अलीकडील वर्षांपासून या भागातील शेतकरी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या सोलापूर येथील विभागीय कृषी संशोधन केंद्राच्या संपर्कात आहेत. तेथील सुधारित तंत्रज्ञान व मार्गदर्शनातून त्यांच्या शेती पद्धतीत बदल होत आहे.

बीबीएफ तंत्राचा प्रसार

राष्ट्रीय संवेदनाक्षम हवामान बदल आधारित प्रकल्पासाठी (निक्रा) सोलापूरच्या या संशोधन केंद्राची निवड झाली आहे. त्यातून मार्डी, नरोटेवाडी, राळेरास, बाणेगाव या गावांमध्ये काही वर्षांपासून हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. त्या माध्यमातून कोरडवाहू पीकपद्धतीनुसार मूलस्थानी जलसंधारण, यांत्रिकीकरणासह अलीकडील दोन वर्षांत ‘बीबीएफ’ तंत्रज्ञानाची ( रुंद सरी वरंबा) प्रात्यक्षिके व प्रसार
करण्यात येत आहे. केंद्राचे तत्कालीन प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. विजय अमृतसागर, विद्यमान शास्त्रज्ञ डॉ. नितीन रणशूर, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सुहास उपाध्ये, डॉ. शशिशेखर खडतरे व धीरज साठे यांचे मार्गदर्शन होत आहे. यंदाच्या खरिपात २० शेतकऱ्यांकडे सुमारे ५० एकरांत बीबीएफ तंत्राने सोयाबीन घेण्यात आले आहे.

BBF Technology
Soybean 'BBF' Method : पाणथळ जमिनीत सोयाबीन ‘बीबीएफ’ पद्धतीने लावा

असे आहे तंत्रज्ञान व्यवस्थापन

-मध्यम काळ्या, पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीची निवड.
-एक नांगरट, कुळवाच्या दोन पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करणे.
-फुले संगम (केडीएस-७२६) वाण.
-'बीबीएफ पद्धतीत ४५ बाय १० सेंटिमीटर असे लावण अंतर. ट्रॅक्टरचलित यंत्रात बियाणे, खत देण्याचीही सोय. दोन ओळी व बियाणांतील अंतर आवश्यकतेनुसार बदलता येते. प्रत्येक पिकासाठी विविध बियाणाच्या तबकड्या, चकत्या. गरजेप्रमाणे त्या बदलता येतात. आंतरपीक घेता येते.
-प्रति किलो पाच ग्रॅम ट्रायकोडर्माची बीजप्रक्रिया.
-सोयाबीन गटाचे रायझोबियम २५० ग्रॅम, स्फुरद विरघळवणारे जिवाणू २५० ग्रॅम प्रति १० किलो अशी जिवाणू संवर्धकांची बीजप्रक्रिया.
-शेणखत हेक्टरी १२ ते १५ टन तर पेरणीवेळी ५०ः७५ः४५ खताचा वापर.
-पुढे वेळेवर कोळपणी व एक खुरपणी.
-सध्या पावसाच्या स्थितीनुसार पाणी. पुढे फुलोऱ्यात एक पाणी.


BBF Technology
Nano Urea Technology : शाश्‍वत शेतीसाठी ‘नॅनो युरिया’ तंत्रज्ञान ठरेल उपयुक्त

शेतकऱ्यांचे अनुभव

संशोधन केंद्राच्या संपर्कात मी दहा वर्षे आहे. तीन वर्षांपासून सोयाबीनमध्ये बीबीएफ तंत्राचा वापर करतो आहे. त्याचा फायदा म्हणजे दोन वर्षांपासून पाऊस भरपूर आहे. सऱ्यांमधून अतिरिक्त पाणी वाहून जाते व पिकाचे नुकसान टळते. बेडवर चार ते पाच काकऱ्या असतात. जेव्हा पाणी कमी पडते त्यावेळी सरी विहिरीच्या पाण्याने भरली तरी बेड भिजतो. पाझराने ओलावा टिकवून धरता येतो. बेड साडेसहा ते सात फूट रुंद आहे. सरीची खोली नऊ इंच तर रुंदी एक ते सव्वा फूट आहे. माझ्याकडे ट्रॅक्टर असून केंद्राद्वारे बीबीएफ यंत्र भाडेतत्वावर मिळते. त्यानुसार यंदा माझे सात एकर, भावाचे पाच- सहा एकर तर पाणी फाउंडेशनच्या सहकार्यातून अन्य शेतकऱ्यांना भाडेतत्वावर ४० एकर क्षेत्र बीबीएफ तंत्राने पेरून दिले आहे. एकरी उत्पादन साडेनऊ ते ११ क्विंटलपर्यंत मिळते. उत्पादनात एकरी तीन-चार क्विंटल वाढ झली आहे. बियाणे केडीएम वाणाचे असल्यास एकरी २२ किलोपर्यंत तर जेएन ३३५ सारखे असल्यास १७ ते १८ क्विंटलपर्यंत लागते.

दाजी काळे, नरोटेवाडी



दोन वर्षांपासून सोयाबीनमध्ये ‘बीबीएफ’ चा वापर करतो आहे. यंदा साडेतीन एकर सोयाबीन या
तंत्रज्ञानाखाली आहे. दोन ओळीतील अंतर १८ इंच ठेवतो. मागील वर्षी खूप पाऊस झाला. सरींमधून अतिरिक्त पाणी वाहून गेल्याने पिकाचे नुकसान टाळता आले. एकरी २२ किलोपर्यंतच बियाणे लागते. पूर्वी पारंपरिक पद्धतीत एकरी ८ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळायचे. आता बीबीएफ व जोडीला व्यवस्थापन यातून मागील वर्षी एकरी १३ ते १४ क्विंटल उत्पादन मिळाले. यंदा १५ क्विंटल उत्पादनाचे उद्दिष्ट आहे.

नागेश काळे, मार्डी

पूर्वी भाजीपाला, कांदा अशी पिके घ्यायचो. कृषी संशोधन केंद्राकडून नव्या तंत्रज्ञानाची माहिती घेत ज्वारी, गहू, हरभरा, तूर, सोयाबीन अशी पिके यशस्वी करण्याचा प्रयत्न करीत आहे. यंदा बीबीएफ तंत्राचा वापर सोयाबीनच्या अडीच एकरांत आहे.

विठ्ठल काळे, मार्डी


कोरडवाहू पिकांतील तंत्रज्ञाना वापराची प्रात्यक्षिके, प्रशिक्षण व प्रयोगांना शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद आहे. सुधारित वाणाचा वापर, बीजप्रक्रिया, यांत्रिकीकरणाचा वापर वाढवला आहे.

डॉ. नितीन रणशूर,
प्रमुख शास्त्रज्ञ व सहयोगी संचालक, विभागीय कृषी संशोधन केंद्र, सोलापूर

बदलती हवामान परिस्थिती, पावसाचा लहरीपणा यांचा विचार करता मूलस्थानी जलसंधारणाचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. त्या दृष्टीने विविध तंत्रज्ञान प्रसार करतो आहोत. यावर्षी जास्त संख्येने शेतकरी त्याचा वापर करताहेत.
डॉ. सुहास उपाध्ये, वरिष्ठ शास्त्रज्ञ (केंद्रांतर्गत)

ओलावा टिकविणारे सपाट वाफे तंत्र

मोठ्या आकाराचे सपाट वाफे व त्याच्या निर्मितीचे ट्रॅक्टरचलित यंत्र विभागीय केंद्राने विकसित केले
आहे. यात सहा मीटर लांब, दोन मीटर रुंद व वरंब्याची उंची २० ते ३० सेंटीमीटर असे वाफ्याचे आकारमान आहे. हेक्टरी ८०० वाफे तयार करता येतात. प्रति वाफ्यात पावसाचे २० सेमी उंचीचे पाणी साठवता येते. (मूलस्थानी जलसंधारण) त्यानुसार प्रति वाफा २४०० लिटर पाण्याचा किंवा हेक्टरी काही लाख लिटर पाण्याचा संचय होऊन ते पाणी जमिनीत मुरते. त्याचा रब्बीतील पिकांना मोठा फायदा होऊ शकतो.


संपर्क-
दाजी काळे- ९८९०८०८२८४
नागेश काळे- ७४९८३३२४१०
डॉ. सुहास उपाध्ये- ९८५०६०१८९०

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com