Summer Holiday : मुळात माणसांची संपन्नतेची आणि जगण्याची व्याख्याच गंडलीय!

Article by Uday Deshmukh : उन्हाळा म्हणजे लांबलचक सुट्टी. घर लहान पाहुण्यांनी भरलेले. दिवसच्या दिवस पाच तीन दोन,सत्ती लावणी वगैरे पत्त्यांचे डाव, नया व्यापार, कॅरम.
Summer Holiday
Summer HolidayAgrowon

उदय देशमुख

Article on Summer Holiday : उन्हाळा म्हणजे लांबलचक सुट्टी. घर लहान पाहुण्यांनी भरलेले. दिवसच्या दिवस पाच तीन दोन,सत्ती लावणी वगैरे पत्त्यांचे डाव, नया व्यापार, कॅरम. एवढं खेळणं की झोपेत फक्त स्ट्राईकरचं स्वप्नात दिसत राहावा. पलंग गच्चीत गेलेले. ओसरीत जेवायला बसलेल्या पंगती. संध्याकाळी गाद्या घालून ठेवायच्या म्हणजे झोपेच्या वेळेपर्यंत गार गार होणार. मच्छरदाणी ही एक आणखी विस्मृतीत जाणारी लक्झरी.

पलंगाला लोखंडी काड्यांचा सांगाडा, त्यावर लावली जाणारी मच्छरदाणी. नीट न खोचल्याने किंवा रात्री उठल्यावर संधीचा फायदा घेऊन हमखास आत शिरणारे वस्ताद डास. वळीव पडून गेल्यावर येणारा दमटपणा, हवेतील घुसमट, डास टाळायला, पडत्या पावसात गच्चीत भिंतीच्या आडोश्याला अंगावर पांघरून घेऊन तुषार अंगावर घेत पडून राहणे. कधी फारचं जोरात पाऊस आला की हमखास जाणारी वीज आणि त्या अंधारात गाद्या उचलून खाली येताना हॉलमध्ये आल्यावर कोण न दिसलेल्या कोणीतरी खांद्यावर हात ठेवला म्हणून पाचावर धारण बसलेले पप्पूशेठ.

गच्चीत सकाळी उठायला उशीर झाला आणि माकडं आली तर म्हाळ्याची एखादी झापडं खायची आणि मागोमाग मोठ्यांचे बोलणे खात बसायचं. गच्चीच्या पायऱ्याच्या कठड्यावर बसून खाली उतरणाऱ्या बारक्याना हमखास थापडणार एक माकडं. ते बसलेलं बघून भिंतीवरून थेट खाली उतरणारे आम्ही आणि पायऱ्यांवरून उतरणारी ताई याची हमखास झापडं खाणार हे ठरलेलं.

घराच्या चौकाच्या विहिरीच्या कट्ट्यावर सगळ्या लहान मोठ्यांबरोबर संध्याकाळी गप्पाष्टक रंगवायचं. सकाळी दात घासून तोंड धुवून, बादलीत पाणी घेऊन माळवद्यावर शिडीने चढायचं. आंबे भिजवायचे. आणि बनियन रसात रंगवून खाली उतरायचं. आणि मग ताप वगैरे आल्यावर डॉक्टरकडे गेल्यावर आंबे जास्त खाल्ले का असं विचारल्यावर डॉक्टरला कसं कळलं हे आपलं रंगलेले बनियन विसरून आश्चर्य करत बसायचं.

Summer Holiday
Success Story : ‘डॉक्टर’चा व्यावसायिक शेतीचा आदर्श

आजूबाजूच्या गावातील जुन्या शेतातील आंब्याचे हिस्से आणायला बैलगाडी घेऊन जायचं. जबरदस्त चवीचे,सुवासाचे आंबे एकमेकांत वानवळा म्हणून पाठवायचे. तुपाच्या धार सोडून आमरस, कुरडई, शेवया दुपारच्या जेवणात रिचवायच्या. या काळात गावातील पंगतीत कैरीची लोणजी, रोडगे वरण भाजी याचीच चलती. रेटून जेवायचं आणि पाणी पाणी करत ज्याच्या शेतात जेवण त्या शेतातच आंव्याखाली ऊन्ह उतरेपर्यंत पडून राहायचं.

भोपळे, प्लास्टिक कॅन पाठीला बांधून विहिरीत सकाळ घालवायची. मग सपाटून भूक लागल्यावर सोबत नेलेली रात्रीची पोळी, चटणी आणि ताज्या कैऱ्या. यापेक्षा अद्भुत काहीच नाही.

विठ्ठल मंदिरात रामनवमीला प्रभू भटजी रामजन्म डोळ्यापुढे उभा करणार. हनुमान जयंतीला सकाळी निघणारी फेरी. गुढीपाडव्याला संघाचे भल्या पहाटे जोरात होणारं संचलन तर अक्षय तृतीयेला रात्रभर रंगलेल्या रामनवमी/दशावतार नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी निघणार देवी आणि दैत्याच सोंग गावभर मिरवणाऱ. मळ्यात रामफळाची झाडे दांडग्या फळांनी लडबडणार तर काकांच्या शुगर बेबी टरबूज वाड्या बहरणार. कधी कधी फळं विकायला आजूबाजूच्या आठवडी बाजारात बैलगाडीवर बसून दिवस भर किरकोळ विक्रीला भोयाना सोबत करायची. टरबूज आणून पाण्याच्या टाकीत टाकून ठेवणे. संध्याकाळी कापून गच्चीवर नेऊन ठेवणे गार करायला आणि जेवण झाल्यावर खाणे.

फणस वगैरे भाजी बेत करून गच्चीत चांदण्यात जेवायला बसणे. काकांच्या जुन्या वाड्यात चार चार फूट रुंद भिंतीच्या मधल्या खोलीत दरवाजे खिडक्या बंद करून, केवळ एक फॅन लावून झोपल्यावर तीन चार तासाने जाग आल्यावर दिवस की रात्र हे सुद्धा उमगायला काही काळ जावा लागायचा. मग पाण्याच्या टाकीतील टरबूज यायचं.

त्या काळात चहा म्हणजे एकदम वर्ज्य. मुलांसाठी अकल्पनीय पेय. एरंडेल द्यायला कधी काळी आई चहाच्या गाळणीतून दूध गाळून दोन थेंब टाकायची आणि पाजायची पण चुकून वसुकाकांनी बघितलं तर काय होईल या भीतीने थरथर व्हायची.

कोणी मोठा नेता, जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्हा बँक अध्यक्ष गावभेटीला आल्यावर रात्री मुक्कामाला आल्यावर गच्चीवर झोपण्यापूर्वी बाबांबरोबर गप्पा मारताना सिगरेट पितांना बघतांना सिगरेट पितांना माणूस बघण्याचे आश्चर्य का वाटायचं हे अजून कळलं नाही.

Summer Holiday
Aquaculture Business : कांदळवन प्रकल्पाने दिला देवली ग्रामस्थांना रोजगार

माळावर उन्हाळ्यात हराळी वगैरे निर्मूलनासाठी माणसे बेटे खोदून काढायची कामे सुरू असायची. तर मळ्यात एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात कापूस लागवडीसाठी रोपे तयार करायला पळसाचे द्रोण भरायचं काम सुरू व्हायच. मिरची रोपांसाठी जमीन, वाफे करायचे काम सुरू व्हायचे.

भल्या पहाटे चार साडेचार ते सकाळी आठ पर्यंत चार-सहा बैली नांगराने नांगरटीसाठी सगळे गडी रात्रीचं रवाना व्हायचे. बाकी मजूर काम सकाळी आठ ते दहा अकरापर्यंत. मात्र सगळ्यांचा मुक्काम संध्याकाळ पर्यंत डेरेदार आंब्याखाली. कारणं गावातल्या पत्र्याच्या उष्म्यात दिवस काढणं तसे अशक्यच. मार्च एप्रिल मध्ये हमखास होणारी गारपीट. घरात कांदा बी गोंडे पसरवून ठेवलेले किंवा लावणीचा कांदा माळवद्यावर पसरवून साठवलेला.

शाळेच्या आणि सार्वजनिक वाचनालयातून आलेल्या अँडरसनच्या परीकथा किंवा असलीच काही भन्नाट पुस्तके. शेकड्यात असलेली जनावरे या काळात चरायला एक दोन महिने डोंगरात नेली जायची..मग हळूच मामा लोक एक दिवस ट्रॅक्टर ट्रॉली आणि बंदुका घेऊन अवतीर्ण व्हायची. बाबांच्या आरडाओरड्याकडे दुर्लक्ष करून काका सुद्धा जनावरांच्या खांड बघायच्या निमित्ताने त्यांच्यासोबत पसार व्हायचे.

मग कधीतरी सकाळी उठलं की गायवाड्याच्या दगडी ओट्यावर भल्या पहाटे काकाबरोबर गेलेला एखादा गडी मसाल्याचे गोळे करतांना दिसायचा. म्हणजे तिकडे डोंगरात मामांच्या बंदुका चालणार आणि मसाल्याचे गोळे मात्र धावपळ करून गडी घरून घेऊन जाणार. हे काम आई माई करतांना दिसल्या नाहीत.

तर मांस कधी घरी आणलं आणि शिजवल्या गेल्याच आठवत नाही. एकदम निषिद्ध असावं बहुदा किंवा बाबांचा धाक. दरवर्षी १ मे च्या दरम्यान शाळेचा निकाल येणार. तो दिवस एकदम स्पेशल. खूप महिन्यांनी सकाळीच आंघोळी, गणवेश चढवून शाळेत जाणं. रिझल्ट कायम भारीच असायचा. मग तो दिवस म्हणजे एकदम भारलेला आणि हवेत राहण्याचा असायचा.

उन्हाळ्याचे रुटीन असंच सुरू राहायचं. सात जून दरम्यान मृग नक्षत्रावर पाऊस यायचाच..आणि मग पेरण्यांची, लागवडीची धामधूम एकदम उसळी घ्यायची. परत शाळेचे, नवीन वर्षाच्या वर्गाचे वेध लागायचे.

हे सगळं आता अर्वाचीन इतिहास झाल्यासारख झालंय. सालं आता सगळे सिझन, हंगाम एक झालेत. आणि हा जीवनक्रम पण एकदम रटाळ, उदासीन झालाय. पैसा आलाय, पण हे संपन्न जीवन व जगण्याचा उद्देश घालवून बसल्याची भावना दिवसेंदिवस प्रबळ होत चाललीय. मुळात, संपन्नतेची ,जगण्याची व्याख्याच गंडलीय.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com