
Baramati News : कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करून कमी खर्चात अधिक नफा देणारी शेती शक्य आहे, ही बाब बारामतीतील ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टने जगप्रसिद्ध मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या साह्याने सिद्ध करून दाखविली आहे. ‘मायक्रोसॉफ्ट’चे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला यांनी बुधवारी (ता. ८) दिल्ली येथे या प्रकल्पाची दखल घेत, ‘भविष्यात हा प्रकल्प भारतातील छोट्या शेतकऱ्यांसाठी वरदान ठरेल,’ अशी अपेक्षा व्यक्त केली.
सत्या नाडेला तीन दिवसांच्या भारत भेटीवर असून, त्यांनी दिल्ली येथे मायक्रोसॉफ्ट व ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या वतीने सुरू असलेल्या ‘फार्म ऑफ द फ्यूचर’ या प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेतला. ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश नलावडे यांनी या प्रकल्पाचे सादरीकरण केले.
ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टद्वारा संचालित कृषी विज्ञान केंद्रामार्फत आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने कमी खर्चात अधिक उत्पादन देणारी उसाची शेती कशी करावी याचे प्रात्यक्षिक प्लॉट्स विकसित करण्यात आले आहेत. राज्यातील एक हजार ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्यक्षपणे हे काम सुरू असून, त्या संशोधनाचे निष्कर्ष, त्याचे चित्रीकरण, माहिती संकलन याची माहिती नाडेला यांनी समक्ष घेतली.
पुरुष व महिला शेतकऱ्यांच्या शेतावर प्रायोगिक तत्त्वावर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून कशा पद्धतीने उसाचे एकरी उत्पादन कमी खर्चात वाढविण्याचा प्रयोग सुरू आहे, त्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, सॅटेलाइट, ॲपचा वापर कसा केला जातो, याचे सादरीकरण झाले. ग्रामीण भागातील शेतकरी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत आहेत, याबद्दल नाडेला यांनी आनंद व्यक्त केला. ऊस शेतीत एआय तंत्रज्ञान वापरणाऱ्या महिला शेतकरी सीमा चव्हाण यांच्याशी त्यांनी संवाद साधत ॲपवरून कशा पद्धतीने नियंत्रण केले जाते, याची माहिती घेतली. या वेळी प्रकल्प समन्वयक तुषार जाधव उपस्थित होते.
प्रतापराव पवार यांचा समन्वय महत्त्वाचा
या संपूर्ण प्रकल्पासाठी पहिल्या टप्प्यापासून संस्थेचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांची दूरदृष्टी, संस्थेचे विश्वस्त व ‘सकाळ माध्यम समूहा’चे अध्यक्ष प्रतापराव पवार, ‘ऑक्सफर्ड’चे संचालक डॉ. अजित जावकर यांचे प्रयत्न, संस्थेचे चेअरमन राजेंद्र पवार व मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश नलावडे व सहकाऱ्यांनी प्रत्यक्षपणे राबविलेला प्रकल्प यामुळे कृषी क्षेत्रात क्रांती घडविणारा हा प्रकल्प प्रत्यक्षात साकारला आहे. प्रतापराव पवार यांनी या बाबत सर्वच पातळ्यांवर पुढाकार घेत समन्वय साधल्याने कमी वेळात हा प्रकल्प प्रत्यक्षात उतरला.
फळबागांवरही प्रयोग होणार
ऊस शेतीपाठोपाठ आता फळबागांच्या संवर्धनामध्येही कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सुरू करण्यात आला आहे. बारामतीतील कृषिक प्रदर्शनात त्याचे प्लॉट्स शेतकऱ्यांना पाहायला मिळणार आहेत. हा प्रयोगही यशस्वी ठरत असून यामुळे कृषी अर्थकारणाला गती मिळणार आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांनाही कमी क्षेत्रात अत्यल्प खर्चात चांगले उत्पादन घेणे शक्य होईल. बेभरवशाची असणारी शेती या तंत्रज्ञानाचे भरवशाची बनेल, असा विश्वास ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्तांना वाटत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.