
Pune News : 'ईव्हीएम'वर आक्षेप घेत सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मारकडवाडीतील ग्रामस्थ बॅलेट पेपरवर मतदान घेण्यावर ठाम आहेत. तर जमावबंदी आदेशाचे उलंघन केल्यास गावकऱ्यांवर गुन्हे दाखल करू, असा इशारा पोलिस प्रशासाकडून दिला जात आहे. यानंतर आमदार उत्तम जानकर यांच्या मध्यस्थतीनंतर आज होणारी बॅलेट पेपरवर मतदान तात्पुरते थांबवण्यात आले आहे. पण आम्ही कायदेशीर पद्धतीने जाऊ असेही आमदार जानकर यांनी म्हटले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मारकडवाडी गावात भाजपचे उमेदवार राम सातपुते यांना आमदार उत्तमराव जानकर यांच्यापेक्षा अधिकचे लिट मिळाले. जे याआधी कधीच झाले नव्हते, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. यावरून ग्रामस्थांनी बॅलेट पेपरवर पुन्हा एकदा मतदान घेण्याचा ठराव केला होता. तर आज मतदान घेतले जाणार होते. मात्र जिल्हा प्रशासनाने २ ते ५ डिसेंबरपर्यंत गावात जमावबंदीचा आदेश लागू केला आहे.
तसेच गावात अशप्रकारे बॅलेटपेपरवर मतदान होऊ न देण्यासाठी प्रशासनाकडून दबाव ठाकला जात असून गावाला पोलिस छावनीचे स्वरूप देण्यात आले आहे. येथे मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
यावेळी पोलिसांनी एखादे देखील मतदान झाले तर आम्ही गुन्हे दाखल करू, सर्व साहित्य जप्त करू. यावेळी ग्रामस्थ आणि पोलिसांमध्ये झटापट होऊ शकतो. यामुळे दंगल ही होऊ शकते. यामुळे ग्रामस्थांवर गुन्हे देखील दाखल होऊ शकतात. या कारणाने आता मार्कडवाडी गावात होणारी बॅलेटपेपरवर मतदान प्रक्रिया तात्पुरती थांबवण्यात आल्याची माहिती आमदार जानकर यांनी दिली आहे.
तसेच जानकर यांनी, ईव्हीएममध्ये गोंधळ असल्यानेच येथे मतदान होऊ दिले जात नाही. आम्ही आमच्या खर्चाने मतदन प्रक्रिया करत होतो. पण शासनाने याला विरोध केला आहे. प्रशासनासह सरकार या मतदानाला घाबरले आहे. यामुळेच पोलिसांकडून अशा पद्धतीने दबाव टाकला जात आहे. पण यासाठी ग्रामस्थासह लढा सुरूच ठेवू, मोर्चा काढू असे देखील जानकर यांनी म्हटले आहे.
दरम्यान उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील गावागावातून फेरमतदानाची मागणी केली आहे. राऊत यांनी मारकडवाडीत गावात कलम १४४ म्हणजे कर्फ्यु लावला. अजून सरकार यायचं आहे. त्या मतदार संघात भाजपचा पराभव झाला आहे. जे जिंकून आले त्यांचे कार्यकर्ते फेरमतदान घेत आहेत. मग हे बेकायदेशीर कसं? असा सवाल देखील राऊत यांनी केला आहे.