Multiple Cropping Systems : बारमाही उत्पन्नाची बहुविध पीक पद्धती

Crop Pattern : बुलडाणा जिल्ह्यातील कंडारी बुद्रुक येथील बाळकृष्ण पाटील यांनी फळबाग केंद्रित व हंगामी पिके अशी सांगड घालणाऱ्या बहुविध पीक पद्धतीची शेती यशस्वी केली आहे.
Multiple cropping systems
Multiple cropping systemsAgrowon

गोपाल हागे
Fruit Crop : बुलडाणा जिल्ह्यातील कंडारी बुद्रुक येथील बाळकृष्ण पाटील यांनी फळबाग केंद्रित व हंगामी पिके अशी सांगड घालणाऱ्या बहुविध पीक पद्धतीची शेती यशस्वी केली आहे. त्यातून शेतीतील जोखीम कमी करण्याबरोबर पगाराप्रमाणे वर्षभर उत्पन्न सुरू राहील असे व्यवस्थापन केले आहे. शेतीतील उल्लेखनीय कार्यासाठी विविध पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे.

बुलडाणा जिल्ह्यात नांदुरा तालुक्यातील कंडारी बुद्रुक येथील बाळकृष्ण वासुदेव पाटील यांची प्रयोगशील व प्रगतिशील शेतकरी अशी ओळख आहे. संयुक्त कुटुंबाच्या शेतीच्या वाटण्या झाल्यानंतर त्यांच्या वाट्याला ४० एकर शेती आली.

सुयोग्य नियोजन, मेहनत आहेच. पण शेतीतील जोखीम कमी करण्यासाठी फळबाग केंद्रित व हंगामी पिके अशी बहुविध पीक पद्धती हे त्यांच्या शेतीचे वैशिष्ट्य आहे. दर महिन्याला मिळणाऱ्या पगाराप्रमाणे वर्षभर उत्पन्नाचा ओघ सुरू राहिला पाहिजे यादृष्टीने पिकांची निवड त्यांनी केली आहे.

शेतीचा विकास

कंडारी शिवारात काही भागांत हलक्या प्रतीची जमीन आहे. सन २००७ मध्ये पाटील यांनी डोंगरमाथ्यावरील अशी २५ एकर शेती खरेदी केली. त्यात पिके घेणे जिकिरीचे होते. मात्र जमिनीचे सपाटीकरण व चौफेर बांधबंदिस्ती केली. धरणातील १०० ट्रॉलीपेक्षा अधिक गाळ आणून वापरला. दरवर्षी शेणखत व पिकांचे अवशेष वापरले.

आता जमीन सुपीक झाली असून, त्यात फळबागांचे नंदनवन फुलवले आहे. जागेवरच मृद्‌ व जलसंवर्धन केले आहे. धरणाजवळ जमीन असल्याने पाण्याची कमतरता नाही. चार विहिरी आहेत. सन १९९८ पासून ठिबकद्वारे सिंचन केले जाते. खरिपात कपाशी, सोयाबीन, काही क्षेत्रावर भाजीपालावर्गीय पिके आहेत. मात्र तूर हे मुख्य पीक आहे.

Multiple cropping systems
Fruit Crop Cultivation : फळबागेसह बहुविध पीक पद्धतीमुळे शेतीतील जोखीम कमी झाली

तुरीची उल्लेखनीय शेती (ठळक बाबी)

-तुरीचे एकरी १० ते १२ क्विंटलपर्यंत उल्लेखनीय उत्पादन. कमाल १४ क्विंटलपर्यंतही उत्पादन साध्य.
-बीएसएमआर ७३६ व पीकेव्ही तारा या दोन वाणांचा वापर.
- दोन ओळींत ८ ते १० फूट तर दोन झाडांतील अंतर सव्वा फुटापर्यंत.
-उगवणीनंतर एक महिन्याच्या आत विरळणी.
-एका ठिकाणी एकच रोप ठेवण्याच्या पद्धतीमुळे झाड चांगले सशक्त, जोमदार व डेरेदार होते असा अनुभव.
-दोन ओळींत भरपूर अंतर असल्याने उडदाचे आंतरपीक.
-तुरीकडे आंतरपीक म्हणून न पाहता मुख्य पीक म्हणूनच पाहतो व त्यादृष्टीने सर्व काळजी घेतो असे
पाटील सांगतात. तुरीला फुले, शेंगा येण्यास ऑक्टोबर नंतर सुरुवात. त्या वेळी पाण्याची पुरेशी सोय वा जमिनीत पुरेसा ओलावा असणे गरजेचे असते. त्यादृष्टीने ठिबकद्वारे पाण्याची सोय केली जाते.
-कपाशीचेही उत्पादनही एकरी १५ क्विंटलपासून फरदडीसहित २५ क्विंटलपर्यंत.
सोयाबीनचे एकरी ९ ते १० क्विंटलपर्यंत उत्पादन साध्य.

Multiple cropping systems
यांत्रिकीकरण, सुधारित पीक पद्धती यातून मिझो शेतकऱ्यांचे वाढले उत्पन्न

फळबागशेती

सन २०१४ पासून फळबाग शेती विकसित करण्यास सुरुवात केली. सन २०१४ मध्ये पाच एकरांत बालानगर जातीचे सीताफळ १२ बाय ८ फूट अंतरावर लावले. सन २०१८ मध्ये पुन्‍हा पाच एकरांत सुपर गोल्डन जातीची लागवड १६ बाय ८ फूट अंतरावर केली. सन २११५ मध्ये पाच एकरांत २० बाय १८ फूट अंतरावर संत्रा लागवड केली असून, एकूण सुमारे ६०० झाडे आहेत. सन २०१७ मध्ये सहा एकरात १६ बाय १४ अंतरावर पेरू असून, एकूण ११५० पर्यंत झाडे आहेत.

सीताफळाला या भागात चांगली ओळख मिळवून देणाऱ्यांमध्ये पाटील यांचा समावेश होतो. अलीकडील वर्षांत संत्र्याचे दोन एकरांत ४०० ते ६०० क्रेट (प्रति क्रेट २० किलो), सीताफळाचे पाच एकरांत ८०० ते १३०० क्रेट, तर पेरूचे साडेतीन एकरांत ७०० ते ८०० क्रेटपर्यंत उत्पादन घेतले आहे. बागेचे व्यवस्थापन, तोडणी, प्रतवारी, पॅकिंग, गाडी भरून बाजारपेठेला घेऊन जाणे, विपणन ही सर्व कामे पाटील कुटुंबीय एकत्रितपणे करतात. विविध शासकीय योजनांचा लाभ घेतला आहे.

पुरस्कारांनी सन्मान

पाटील यांच्यामुळे कंडारी गावाला ठिबक सिंचनासाठी दिशा मिळाली. शिवाय शेतीतील ज्ञान घेत केलेले प्रयोग, व्यवस्थापनातील सुधारणा, प्रगतीची धडपड आदी सर्व बाबींची दखल पुरस्कारांच्या रूपाने घेण्यात आली. सन २००८ मध्ये कै. वसंतराव नाईक शेती विकास प्रतिष्ठान, पुसद येथील पुरस्कार पाटील यांना मिळाला.

सन २०१६ मध्ये बुलडाण्याचे सहकार महर्षी कै. भास्करराव शिंगणे यांच्या स्मृतीनिमित्त प्रगतिशील शेतकरी म्हणून गौरविण्यात आले. तर २०१८ मध्ये औरंगाबाद येथे पद्मश्री कै. भवरलाल जैन यांच्या नावे शेतकरी सन्मान तर २०२२ मध्ये वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

शेतीतून समाधान

पाटील यांना शेतीचे धडे वडिलांकडून मिळाले. प्रयोगशील शेतकरी, राज्यातील कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्रे, कृषी प्रदर्शने यांना ते सातत्याने भेटी देतात. पिकांसंदर्भातील पुस्तके आणून वाचतात. शास्त्रज्ञांसोबत त्यांचा चांगला संपर्क आहे. पाटील यांच्या दोन मुलांपैकी सुदर्शन शेती करतात. हर्षवर्धन ‘एमई’ असून, शेगाव येथील संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयात ते प्राध्यापक आहेत. दोन सुना, तीन नातवंडे, पत्नी आशा असे त्यांचे कुटुंब असून, शेतीतील प्रगतीतून ते समाधानी झाले आहे.

बाळकृष्ण पाटील, ९२८४४७८७५१

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com