
Ahmednagar News : ग्राहकांना फुकट वाटा, पण गरिबांना मारू नका, शेतकऱ्यांना मारू नका, त्यांच्या उत्पादन खर्चाएवढा तरी भाव दिला गेला पाहिजे. आज कांद्याला किमान चार हजार रुपये भाव देणे अपेक्षित आहे, असे मत माजी महसूलमंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांनी गुरुवारी (ता. २४) पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
नगर तालुक्यातील खडकी येथे भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. थोरात म्हणाले, ‘‘कांदा हे जिरायती पीक आहे. शेतकऱ्यांना आता चार पैसे जास्त मिळायला लागले आहेत. लगेच निर्यात बंदी करून टाकली. वास्तविक पाहता उत्पादन खर्च हा पंचवीसशे रुपयांच्या पुढे गेलेला आहे व तेवढा तरी भाव किमान मिळायला पाहिजे. मात्र तुम्ही त्याचा उत्पादन खर्च देण्यास सुद्धा तयार नाही, शेतकऱ्यांना ते परवडणार नाही. त्यामुळे त्यांच्यामध्ये असंतोष मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झाला आहे. टोमॅटोचे बाजार वाढले, की नेपाळ वरून टोमॅटो आयात केला. इतकी घाई करायला काही कारण नाही,
ग्राहकांना सांभाळायचं असेल तर निश्चितपणे सांभाळले पाहिजे. शेतकऱ्याचे जीवन कठीण झालेले आहे. शेतकरी आत्महत्या वाढत चाललेल्या आहेत. ही सुद्धा बाब गंभीर आहे. मताचे राजकारण करताना शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये तुम्ही हा निर्णय घेतला तो योग्य नाही. दोन लाख क्विंटल ते खरेदी करणार आहे. हे किरकोळ असून, २४१० भाव हा परवडणारा नाही. नगर तालुक्यातल्या शेतकरी हा २६० किलोमीटर लांब जाऊन कसा काय कांदा विकू शकतो? त्याला ते परवडणार आहे का? न्याय हा सर्वांना सारखा असला पाहिजे. ग्राहकांना कांदा स्वस्त द्यायची आमची बिलकुल अडचण नाही तुम्ही फुकट वाटा आमचे काही म्हणणं नाही, पण शेतकऱ्यांना मारून काय करणार, असा सवाल थोरात यांनी उपस्थित करत वास्तविक पाहता तुम्ही अनुदान हे शेतकऱ्याला किंवा ग्राहकांना दिले पाहिजे ही आमची भूमिका आहे.
देशांमध्ये, राज्यामध्ये मूलभूत प्रश्न आहेत. ते प्रश्न विचलित करण्याचा प्रयत्न होत आहे बेरोजगारी, महागाई हा विषय सुद्धा महत्त्वाचा आहे. यावर कुणीही बोलायला तयार नाही, महागाईवर बोलायला तयार नाही. लोकशाहीची गळचेपी होत चालले आहे. मणिपूरमध्ये अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे. जगात बेइज्जती झाली आहे, असेही थोरात म्हणाले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.