
डॉ. राहुल काळदाते, डॉ. अशोक डंबाळे
Bajara Cultivation : मिश्र शेती पद्धतीचे पिके आणि पशुधन हे दोन मुख्य घटक असून, त्यांचा आपल्या कृषी अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होतो. मात्र पावसाचे प्रमाण कमी असलेल्या ठिकाणी, कोरडवाहू भागामध्ये जनावरांना वर्षभर पोषक हिरवा चारा उपलब्ध करणे हे मोठे आव्हान ठरते.
त्यासाठी पिकांची निवड करताना पशुखाद्याच्या दृष्टीने पौष्टिक अशा भरडधान्यांची निवड केली पाहिजे. अशा पिकांमध्ये अन्य भरडधान्य पिकांच्या तुलनेत बाजरी (पेनिसेटम ग्लॉकम) ही अनेक दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरते.
कोरडवाहू आणि अर्ध शुष्क भागामध्ये बाजरी हे कमी खर्चाचे आणि ज्वारीपेक्षा अधिक लोकप्रिय पीक असून, त्यापासून धान्य आणि हिरवा चारा उपलब्ध होतो. बाजरीच्या हिरवा चाऱ्यामध्ये ॲल्युमिनॉइड्स मुबलक प्रमाणात असल्याने जनावरांसाठी पौष्टिक चारा ठरतो. बाजरीमध्ये ज्वारीपेक्षा दुष्काळ सहन करण्याची क्षमता जास्त आहे.
बाजरीची लागवड अधिक पर्जन्यमान असलेली राज्ये वगळता देशातील जवळपास सर्वच राज्यांमध्ये केली जाते. भारतात प्रामुख्याने राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश, हरियाना, महाराष्ट्र, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, पंजाब आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये याची लागवड केली जाते.
चारा पीक म्हणून बाजरीचे महत्त्व
-बाजरीचा चारा हा मूरघास, हिरवा, कोरडा किंवा संरक्षित चारा म्हणून वापरता येतो.
-त्यात कोरड्या पदार्थाच्या आधारावर सरासरी ७-१०% क्रूड प्रोटीन, ५६-६४% एनडीएफ, ३८-४१% एडीएफ, ३३-३४% सेल्युलोज आणि १३-२३% हे मिसेल्युलोज असते.
-बाजरी हे एक अत्यंत दुष्काळ आणि उष्णता सहन करणारे पीक आहे. जमिनीच्या हलक्या ते भारी सर्व प्रकारच्या अगदी खराब जमिनीमध्ये हे पीक घेता येते.
- त्यापासून चारा आणि धान्य दोन्ही उपलब्ध होते.
- मका आणि ज्वारीच्या तुलनेत हे झपाट्याने वाढणारे पीक असून, ते कमी वेळेत हिरवा चारा तयार करते.
- त्याच्या चाऱ्यामध्ये हायड्रोसायनिक अॅसिड आणि ऑक्सॅलिक अॅसिड यांसारखे पशुखाद्याचा दर्जा कमी करणारे घटक अल्प, अत्यल्प असतात. त्याच वेळी प्रथिने, कॅल्शिअम, फॉस्फरस आणि अन्य खनिजांनी ते समृद्ध असतात.
-सुका चारा आणि बाजरीचा पेंढा देखील जनावरांना खायला उपयुक्त आहे.
-उष्णता सहन करणारे पीक असल्याने, बाजरी हे उन्हाळी हंगामात हिरवा चारा पुरविणारे एक आश्वासक पीक आहे.
तापमान आणि हवामान
- बाजरी हे उष्ण हवामानातील पीक आहे.
- कमी पाऊस असलेल्या भागात हे पीक घेतले जाते. ज्वारीपेक्षा जास्त दुष्काळ सहन करण्याची क्षमता आहे.
-बाजरीच्या रोपाला उगवण होण्यासाठी २५ अंश सेल्सिअस तापमानाची गरज असते. वाढ आणि विकासासाठी ३० ते ३५ अंश सेल्सिअस तापमान आवश्यक असले तरी हे पीक ४० अंश सेल्सिअस तापमानातही चांगले उत्पादन देऊ शकते.
जमीन व मशागत
उत्तम निचरा असलेल्या सर्व प्रकारच्या जमिनीत बाजरीचे पीक घेता येते, परंतु यासाठी हलकी ते मध्यम जमीन उत्तम मानली जाते. शेत तयार करण्यासाठी पहिली नांगरणी माती पलटणाऱ्या नांगरांने करावी. इतर २ ते ३ नांगरण्या देशी नांगराने किंवा कल्टिव्हेटरने कराव्यात.
पेरणीची वेळ
बाजरी हे प्रामुख्याने खरीप हंगामामध्ये घेतले जाणारे पीक आहे. जुलैचा पहिला आठवडा या पिकाच्या पेरणीसाठी योग्य आहे. बागायती भागात, मार्च ते मध्य एप्रिल हा कालावधी उन्हाळी पेरणीसाठी योग्य आहे. दक्षिण भारतात रब्बी हंगामात ऑक्टोबर ते नोव्हेंबरपासून पेरणी केली जाते.
बियाणे दर
चाऱ्यासाठी या पिकाची पेरणी १.५ ते २ सेंमी खोलीवर करावी. ओळीतील अंतर २५ सेंमी असावे. यासाठी प्रति हेक्टरी १० ते १२ किलो बियाणे वापरावे. पेरणीपूर्वी बियाण्याला थायरम ३ ग्रॅम प्रति किलो या प्रमाणे प्रक्रिया करावी.
सुधारित वाण
सुधारित वाण --- महत्त्वाची वैशिष्ट्ये --- लागवडी खालील क्षेत्र --- हिरवा चारा उत्पादन (क्विंटल)
एक कापणी वाण
एवीकेबी-१९ --- दुहेरी उद्देशीय --- उत्तर पश्चिम भारत --- ३८०
एएफबी-३ --- कमी आडवे पडणारे वाण --- उत्तर पश्चिम भारत --- ४५०
बायफ बाजरा-१ --- दुहेरी उद्देशीय, डाऊनी मिल्ड्यू, लीफ स्पॉट, लीफ ब्लाइट या रोगांना मध्यम प्रमाणात प्रतिरोधक --- उत्तर पश्चिम आणि मध्य भारत --- ५१०
एनडीएफबी-२ --- खरीप आणि उन्हाळा या दोन्ही हंगामासाठी योग्य, सामान्य आणि क्षारग्रस्त जमिनीसाठी योग्य --- उत्तर प्रदेश --- ४००
टीएसएफबी-१५-४ --- चांगला पचण्यायोग्य चारा --- दक्षिण भारत --- ३५०
एफबीसी-१६ --- कमी ऑक्सॅलिक ॲसिड --- पंजाब --- ४९०
पीसीबी-१४१ --- कमी ऑक्सॅलिक ॲसिड --- पंजाब --- ४००
राज बाजरा चरी-२ --- दुहेरी उद्देशीय, क्षारग्रस्त जमिनीसाठी योग्य --- राजस्थान --- ३००
एकापेक्षा अधिक कापणीचे वाण ः
जायंट बाजरा --- हिरवा चारा, कोरडा चारा आणि मुरघास बनवण्यासाठी योग्य --- संपूर्ण भारत --- ५५०
प्रोएग्रो नंबर -१ --- नरवंध्य (मेल स्टराइल) वाण --- संपूर्ण भारत विशेषतः महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक --- ७५०
पीसीबी-९८१ --- रसाळ खोड आणि जास्त फुटवे होण्याची क्षमता --- उत्तर पश्चिम आणि मध्य भारत --- ५५०
बायफ बाजरा-१ --- दुहेरी उद्देशीय, डाऊनी मिल्ड्यू, लीफ स्पॉट, लीफ ब्लाइट या रोगांना मध्यम प्रमाणात प्रतिरोधक --- उत्तर पश्चिम आणि मध्य भारत --- ५१०
एपीएफबी-२ --- अत्यंत पौष्टिक आणि चवदार चारा --- आंध्र प्रदेश --- ३००
एनडीएफबी-५ --- खरीप आणि उन्हाळा या दोन्ही हंगामांसाठी योग्य, सामान्य आणि क्षारग्रस्त जमिनीसाठी योग्य --- उत्तर प्रदेश --- ५०५
जीएफबी-१ --- उन्हाळ्यात लागवडी योग्य --- गुजरात --- ११५०
मोती बाजरा --- जास्त फुटवे आणि कापणी नंतर पुन्हा चांगली वाढ होण्याची क्षमता --- तेलंगण --- ६३३.५०
खत व्यवस्थापन
बागायती शेतीतील पिकाची योग्य पोषक तत्त्वाची गरज भागवण्यासाठी (प्रति हेक्टरी प्रमाण)
पेरणीपूर्वी २० दिवस आधी : १० टन शेणखत किंवा कंपोस्ट
पेरणीच्या वेळी : ५०:३०:३० किलो नत्र : स्फुरद : पालाश.
पेरणीनंतर एक महिन्याने : ३० किलो नत्र द्यावे.
बिगर सिंचन परिस्थितीमध्ये : पेरणीच्या वेळी योग्य खत आणि पीक ३०-३५ दिवसांचे असताना २० ते ३० किलो प्रति हेक्टर या प्रमाणे फवारणीतून नत्र द्यावे.
तणनियंत्रण
पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांच्या अवस्थेत खुरपणी करावी.
किंवा ॲट्राझिन हे तणनाशक ०.५० ते ०.७५ किलो प्रति हेक्टर किंवा ०.७५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे हेक्टरी एक हजार लिटर पाणी या प्रमाणे तणे उगवण्यापूर्वीच्या सुरुवातीच्या दिवसांत केलेली जमिनीवरील फवारणी प्रभावी ठरते.
सिंचन
बाजरी हे प्रामुख्याने खरीप (सामान्यतः पावसावर अवलंबून असलेले) आणि दुष्काळ सहन करणारे पीक आहे. मात्र त्याच्या योग्य वाढीसाठी ओलावा हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. जेव्हा पावसामुळे पुरेसा ओलावा मिळत नाही, तेव्हा वेळोवेळी सिंचन करावे लागते.
उन्हाळी पिकात वातावरणातील बाष्पोत्सर्जनाच्या मागणीमुळे ४ ते ५ पाणी पाळ्या द्याव्या लागतात. एकापेक्षा अधिक कापणीच्या जातीमध्ये पहिली कापणी ४० ते ४५ दिवसांनी आणि नंतर ३० दिवसांच्या अंतराने केली जाते. योग्य प्रकारे नियोजन व सिंचन व्यवस्थापन केलेल्या पिकातून ४५० ते ५५० क्विंटल चारा मिळतो.
संपर्क - डॉ. राहुल काळदाते, ९८६०९०७०४१, (रिसर्च फेलो, पीक सुधारणा विभाग, भारतीय चरागाह व चारा संशोधन संस्था, झांसी, उत्तर प्रदेश)
डॉ. अशोक डंबाळे, ८७८८०२७४७४, (कृषी विद्याशास्त्र विभाग, बोर्डीकर कृषी महाविद्यालय, सेलू)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.