भारतीय संस्कृतीची (Indian Culture) सुरुवात इ.स. पूर्व पाच हजार वर्षांपूर्वीची, जगातल्या प्राचीन संस्कृतीपैकी एक. जगाला व्यापार, कृषी (Agriculture), खगोलशास्त्र शिकविणाऱ्या या संस्कृतीत बैल, पाणी आणि जमीन याला अनन्यसाधारण महत्त्व होते. श्रावणापूर्वी येणारा बेंदूर, श्रावणात येणारा पोळा, पोंगल हे याच संस्कृतीच्या पाऊलखुणा. आत्तापर्यंत अनेक संक्रमणे झाली. उत्क्रांतीची बिजे पडली की ती रुजली आणि त्यांच्या परंपरा झाल्या पण कृषिप्रधान संस्कृतीतील बैलाचे स्थान कायम होते.
ग्रामीण महाराष्ट्रात बैलपोळा अथवा बेंदूर हा अतिशय उल्हासाने साजरा होणारा सण होता. दोन दिवसांपूर्वी पार पडलेल्या पोळा सणानिमित्त माझ्या लहानपणीचा माहोल मला आठवला. आम्ही तर पोळा म्हणजे एकदम बैलांना पोहणी घालणं, सकाळी हिरव्यागार गवताच्या कुरणात बैल चरण्यासाठी सोडणं, हिरवेगार गवत खाऊन पोट खराब होऊ नये म्हणून डिकमळ पाजविणं, अंडी पाजणं, आठवडाभर बैलावर साज कोणते चढवायचे याचा खटाटोप करण्यात गुंग असायचो.
पोळ्याच्या दिवशी कोणाचे बैल सशक्त याची जणू स्पर्धाच लागलेली असायची पण जागतिकीकरणाच्या रेट्यात कृषी संस्कृतीतले बैलाचे स्थान आता दुय्यम ठरत आहे. आता यांत्रिकीकरणाचा वारू चौफेर उधळतोय. भौतिक प्रगतीतला हा तीस वर्षांचा टप्पा उत्क्रांतीची त्सुनामी ठरला. या त्सुनामीत बैल, नांगर, पाळी, दुंडे, एटन, सापत्या, कासरा, फास, रूमण, खुटी असे बैल अन् औतफाट्याचे सगळे सामान वाहून गेले.
दोन दिवसांपूर्वी पोळा सण पार पडला. बैलाच्या जोड्या चार आणि मागे दहा ते बारा ट्रॅक्टरची रांग आणि सर्वांत पुढे डॉल्बीवर उडत्या चालीवरची गाणी आणि उसळत्या तरुणाईचा बेफाम नाच हे चित्र पाहायला मिळतंय. नुकत्याच पार पडलेल्या पोळ्यानिमित्त परंपरेच्या यज्ञात आठवणीच्या आहुत्या टाकल्या! बाकी पुढच्या पिढ्यांना उत्खननात ह्या वस्तू सापडतील. वस्तू संग्रहालय सजतील. बैलाचे पुतळे असतील आणि संस्कृतीचा गौरव होईल. वर्तमान हा अत्यंत कृतघ्न असतो. त्याला भूतकाळाचा गौरव करायला आवडतो. आपणही त्याच वर्तमानाचे अपत्य आहोत.
- युवराज पाटील, जिल्हा माहिती अधिकारी लातूर
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.