Bail Pola : पुणे जिल्ह्यात भाद्रपदी बैलपोळा उत्‍साहात

Bail Pola Festival : शेतकऱ्यांचा सवंगडी असलेल्या बैलाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा बैलपोळा सण जिल्ह्यात उत्साहात साजरा झाला.
Bail Pola
Bail PolaAgrowon
Published on
Updated on

Pune News : शेतकऱ्यांचा सवंगडी असलेल्या बैलाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा बैलपोळा सण जिल्ह्यात उत्साहात साजरा झाला. शेतकऱ्यांनी आपल्या सर्जा - राजाची मनोभावे पूजा करत, ढोलताशांच्या गजरात, भंडाऱ्याची मुक्त उधळण करीत, सजविलेल्या बैलांची सामूहिक मिरवणुका काढल्या होत्या.

शिरूर तालुक्यात साजऱ्या झालेल्या भाद्रपद बैलपोळ्यासाठी खेड्यापाड्यात विशेष उत्साह, जल्लोष आणि आनंदाचे वातावरण होते. शेतीतील वाढत्या यांत्रिकीकरणामुळे बैलांची संख्या कमी झाली असली, तरी आजही अनेक शेतकरी कुटुंबात बैलांची मनोभावे जोपासना केली जाते. शिरूर परिसरात विशेषतः जुने शिरूर, अण्णापूर येथे बैलपोळ्याचा उत्साह जाणवला.

Bail Pola
Bail Pola : बैलांविना साजरा होतोय पोळा

सकाळीच नदीवर किंवा ओढ्यांवर बैलांना अंघोळ घालून आणल्यानंतर गळ्यात घागरमाळा, पायात तोडे, शिंगे रंगवून त्यात गोंडे किंवा फुगे अडकवून आणि अंगावर रेशमी झूल पांघरून बैलांची मनोभावे पूजा केली. पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घातल्यानंतर आपापल्या परिसरातील दैवतांच्या मंदिरांपर्यंत मिरवणुका काढण्यात आल्या.

Bail Pola
Bail Pola 2024 : पोळ्याच्या सणाला ग्रामीण भागात उत्साह

कडूस (ता. खेड) परिसरात भाद्रपदी बैलपोळा उत्साहात साजरा झाला. परिसरात मशागतीच्या बैलांची संख्या नगण्य असली तरी बैलगाडा मालक व बैलगाडा शौकीनांची संख्या मोठी आहे. विविध संघटनांच्या या बैलगाडा मालक व बैलगाडा शौकीनांनी एकत्र येत भंडाऱ्याची उधळण, वाद्यांच्या तालावर मिरवणूक काढीत तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील कडूस, रानमळा, दोंदे, वडगाव, सायगाव, साबुर्डी, गारगोटवाडी परिसरात भाद्रपद महिन्यातील बैलपोळा साजरा झाला.

ग्रामदैवताच्या दर्शनानंतर सुवासिनींच्या हस्ते औक्षण करून बैलांना पुरणपोळीचा घास भरविण्यात आला. यंदाच्या वर्षी पाऊस समाधानकारक झाला, परंतु सोयाबीनला समाधानकारक बाजारभाव नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. बाजारभाव मिळाला तर शेतकऱ्यांनी बैलपोळा सण आणखी उत्साहात साजरा केला असता, असे पैलवान अक्षय गायकवाड बैलगाडा संघटनेचे कुमार गायकवाड यांनी सांगितले. शेटफळगढे (ता. इंदापूर) येथे भर पावसातच बैलांची मिरवणूक काढत शेतकरी आणि ग्रामस्थांनी बैलपोळा साजरा केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com