Lok Sabha Election Update : एक काळ असा होता, की, बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांचा संपूर्ण उत्तर प्रदेशात दबदबा होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेवर दलित, पीडित, कष्टकरी, अल्पसंख्य, मागासवर्गीयांसाठी सामाजिक न्यायाचा लढा देणाऱ्या नेत्या म्हणून त्यांच्याकडे पाहिले जायचे.
२००६-०७ मध्ये बसपच्या कार्यकर्त्यांकडून ‘चढ गुंडन की छातीपर, मूहर लगेगी हाथीपर’ असा निनाद होत असे. या घोषणेवरूनच उत्तर प्रदेशात तेव्हा गुंडाराज असावे, असे अधोरेखित होते. परंतु उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी चार वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या मायावतींच्या बसपला २०१२नंतर ओहोटी लागली.
आता तर बसपचा हत्ती हलायचे जराही चिन्ह दिसत नाही. ज्या समुदायासाठी मायावती लढल्या तो त्यांच्यापासून दुरावला. २००७ मध्ये २०६ आमदारांसह उत्तर प्रदेशातील इतिहासात पहिल्यांदा बहुमताचे सरकार देणाऱ्या बसपचा आज विधानसभेत एकमेव आमदार असल्याचे चित्र कोणामुळे निर्माण झाले? दहा वर्षांत बसप भाजपची ‘बी टीम’ म्हणून टीका होत आहे. सध्याच्या लोकसभा निवडणुकीत ते प्रकर्षाने जाणवते.
लोकसभेसाठी आज चौथ्या टप्प्याचे मतदान होत आहे. संपूर्ण देशाचे लक्ष उत्तर प्रदेशकडे आहे. येथूनच सर्वाधिक, ऐंशी खासदार लोकसभेत पाठवले जाणार आहेत. भाजप, समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष आणि काँग्रेस हे राज्यातील प्रमुख पक्ष. १९८९पर्यंत अनेकदा सत्तेत असलेली काँग्रेस उत्तर प्रदेशात आता नावापुरती आहे. २००९ मध्ये राज्यातून काँग्रेसचे २१ खासदार लोकसभेत गेले; २०१४ मध्ये नरेंद्र मोदी झंझावातात तो आकडा दोनवर आला.
सोनिया आणि राहुल गांधी विजयी झाले. २०१९मध्ये काँग्रेसला एकमेव रायबरेलीची जागा टिकवता आली. २०२२च्या विधानसभेत केवळ दोघांना काँग्रेस विधानसभेत पाठवू शकली. एकेकाळी या राज्यात ऐश्वर्य भोगणाऱ्या काँग्रेसची जशी दुरवस्था झाली तीच स्थिती आता मायावतींच्या बसपची आहे.
गलितगात्र बसप
उत्तर प्रदेशात १९५० पासून ३२ मुख्यमंत्री झाले. २००७ पर्यंत त्यातील एकालाही सलग पाच वर्षे सरकार चालवता आले नाही. उत्तर प्रदेशात पाच वर्षे सरकार चालविणाऱ्या मायावती पहिल्या नेत्या ठरल्या. २००७ मध्ये बसपने ४०३ पैकी २०६ जागांवर विजय मिळवत बहुमताचे सरकार आणले होते. इतकेच नव्हे, त्यांनी राज्याच्या विकासाची कास धरली. दिल्लीलगत असलेल्या नोएडाला सुरेख आकार दिला तो मायावतींनीच. बारा वर्षांनंतरही त्यांचे नाव घेतले जाते.
परंतु विकासाच्या श्रेयासोबतच प्रशासनातील भ्रष्टाचाराच्या झळाही त्यांना सोसाव्या लागल्या. समाजवादी पक्षाचे तत्कालीन अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांच्या नेतृत्वात अखिलेश यादव यांनी बसपवर मात करीत २०१२ मध्ये २२४ जागा जिंकत उत्तर प्रदेशातील जनतेला अभिप्रेत सरकार चालविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मात्र मोदी लाटेत अखिलेशना सत्ता गमवावी लागली. परंतु अखिलेश राज्यातील राजकारणात घट्ट पाय रोवून आहेत. सध्याच्या घडीला भाजपपुढे दंड थोपटणारा एकमेव समाजवादी पक्ष आहे. बहुजन समाज पक्ष गलितगात्र अवस्थेत आहे.
आकाश आनंद अपरिपक्व?
डॉ. आंबेडकरांच्या विचारधारेवर राजकारण आणि समाजकारण करीत असल्याचे मायावती प्रत्येकवेळी सांगतात. परंतु अलीकडे त्यांचे राजकारण हे भाजपला पूरक असल्याचे बोलले जाते. इतिहास पाहिला तर भाजपचे आणि त्यांचे जुने नाते आहे. १९९७ आणि २००२ मध्ये त्यांना अल्पकाळासाठी का होईना भाजपने बाहेरून समर्थन दिल्यामुळेच त्या मुख्यमंत्री होऊ शकल्या.
भाजपने समर्थन काढल्यानंतर त्यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले होते. परंतु मागच्या दहा वर्षांत त्या भाजपच्या दहशतीत वावरत असल्याचा राजकीय गोटात चर्चेचा विषय होतो. या ना त्या कारणाने तपास संस्थांच्या ससेमिऱ्याने विरोधकांना तुरुंगात डांबण्याच्या शृंखलेत त्यांचाही नंबर लागू शकतो; याच भीतीने त्यांनी राजकीय विजनवास स्वीकारला, असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.
एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासारखी त्यांनी थेट युती केली नसली, तरी त्यांनी त्यांच्या मतदारांचा वापर हा भाजपच्या उमेदवारांना फायदा पोहोचवण्यासाठी केला आहे, हे कसे नाकारायचे? या वेळी लोकसभेची निवडणूक जाहीर होईपर्यंत त्या किती उमेदवार मैदानात उतरवणार, याची निश्चिती नव्हती. परंतु पाहता पाहता संपूर्ण ऐंशी जागांवर उमेदवार जाहीर झाले. अनेक मतदार संघातील उमेदवार तीनदा-तीनदा बदलले गेले. उमेदवारांच्या जातीय समीकरणाची गोळाबेरीज केली तर भाजपच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठीची ही उठाठेव असल्याचे दिसते.
भाजप सांगतो त्याच उमेदवारांचे नाव मायावती जाहीर करत असल्याचा आरोप सप-काँग्रेसकडून होत आहे. उत्तर प्रदेशातील जाणकारांचे म्हणणे आहे, की ‘इंडिया’ आघाडीच्या उमेदवारांकडे जाणारी मते थोपविण्यासाठी भाजपच्या दबावात मायावतींना असे निर्णय घ्यावे लागत आहेत. मायावतींवर होणारी टीका हा विरोधकांच्या राजकारणाचा भाग असू शकतो. परंतु त्यांनी त्यांचा पुतण्या आकाश आनंद यांना तडकाफडकी पदावरून काढून टाकल्याने संशय बळावला आहे.
आकाश आनंद हे मायावतींचे भाऊ आनंद कुमार यांचे पुत्र. मायावतींनी त्यांना पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक नेमले. डिसेंबरमध्ये आपला उत्तराधिकारी म्हणूनही जाहीर केले. आकाश आनंद राजकारणात नवे असले तरी त्यांनी मोदी-योगी सरकारवर जोरदार प्रहार सुरू केले. त्यामुळे बसलेला हत्ती आता उठेल, असे संकेत होते. त्यांच्या भाषणात ‘जोडे मारो’पासून ‘गोली मारो’पर्यंतची वक्तव्ये होती. भाजपला दहशतवादी म्हणण्यापर्यंत त्यांची मजल गेली. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हाही नोंदवला.
प्रचारात अनेक नेते बेताल बोलतात. तसाच प्रकार आकाश आनंद यांच्याकडून झाला. त्यांचे भाषण समाजवादी पक्षाला पूरक असल्याचा निष्कर्ष काढला जाऊ लागला. मागच्या आठवड्यात मायावतींनी आकाश आनंद हे परिपक्व नसल्याने त्यांना उत्तराधिकारी आणि समन्वयक पदावरून दूर केल्याचा फतवा काढला. त्यात डॉ. आंबेडकरांच्या विचारांचा जयघोष केला.
जबाबदारी सोपवली त्या वेळी आकाश अपरिपक्व नव्हते का? मायावती पुतण्याला इतकी अपमानास्पद वागणूक देऊ शकतात तेव्हा बसपच्या मतदारांच्या भावना कशा समजून घेतल्या जातील, असे बोलले जाते. आकाश आनंदकडून राजीनामा घेऊन प्रश्न सोडवता आला नसता का? मात्र भाजपच्या व्यूहनीतीशी याला जोडले जाते.
एक मात्र खरे, बसपचे उमेदवार परीक्षेला बसले आहेत आणि भाजपचे उमेदवार उत्तीर्ण झाल्याचा निकाल लागण्याची दाट शक्यता आहे. राजकीय परिस्थिती प्रतिकूल असली, तरी एका लढाऊ नेतृत्वाने स्वत:चा आणि पक्षाचा राजकीय अस्त केल्याचे जाणवते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेने मायावतींच्या पाठीशी कायमच खंबीरपणे उभ्या असलेला तमाम जनतेचा अपेक्षाभंग झाला, असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती नसेल.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.