Akola News : यंदाच्या मोसमात मागील काही दिवस सातत्याने पाऊस येणे, ढगाळ वातावरण राहणे हे कपाशी पिकाला मारक ठरले आहे. कपाशीवर कापूस पट्ट्यात यंदा बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून आला.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ तसेच कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी ठिकठिकाणी भेटी देऊन निरीक्षण केले असता जूनच्या प्रारंभी लागवड केलेल्या कपाशी पिकात गुलाबी बोंड अळीचा शिरकाव झाल्याचे दिसून आले आहे. सध्या प्रमाण अल्प असून, तातडीने उपाययोजना केल्या तर पुढील नुकसान टाळणे शक्य होईल, असा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे विभाग प्रमुख डॉ. धनराज उंदीरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रज्ञांनी अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी, तेल्हारा या ठिकाणी पाहणी केली असता त्यांना कापूस या पिकावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव आढळून आलेला आहे. तसेच अकोला, बुलडाणा व वाशीम जिल्ह्यांत प्रक्षेत्र भेटीदरम्यान केलेल्या पाहणीत कापूस या पिकावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव आढळून आला.
सद्यःस्थितीमध्ये गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव हा अल्प आहे, असे म्हटले आहे. तर दुसरीकडे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे व त्यांच्या चमूनेही जिल्ह्यातील दोनद खुर्द, दोनद बुद्रुक, अंजनी बुद्रुक या काही गावशिवारात काही शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्रावर कापूस पिकाची पाहणी केली.
त्या वेळी गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून आला. विशेष करून ज्या शेतांमध्ये पेरणी जूनच्या पहिल्या आठवड्यात केलेला आहे त्या कपाशीवर सध्या फुले, पात्या व लहान बोंड आहेत. त्या ठिकाणी गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झालेला आहे.
कपाशीच्या शेतामध्ये जी फुले सुकलेल्या अवस्थेत किंवा डोमकळी सदृश अवस्थेत होती अशा प्रत्येक फुलात गुलाबी बोंड अळी आढळून आली. त्या फुलांमध्ये गुलाबी बोंड अळीची दुसऱ्या व तिसऱ्या अवस्थेतील अळी फुलांमधून कोवळ्या बोंडामध्ये शिरताना दिसून आली.
कपाशीच्या शेतात गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव त्यांना १० ते २० टक्के आढळून आला, असे सांगण्यात येते. त्यामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यात पेरणी केलेल्या शेतकऱ्यांनी निरीक्षण करण्याची सूचना करण्यात आली.
कृषी विभागातर्फे सुचविलेल्या उपाययोजना
- पीक उगवणीनंतर ३५ ते ४० दिवसांपासून गरजेनुसार पाच टक्के निंबोळी अर्काची किंवा ॲझाडिरेक्टीन या कीटकनाशकाची कृषी विद्यापीठांच्या शिफारशीनुसार फवारणी करावी.
- गुलाबी बोंडअळीचे सर्वेक्षण करण्यासाठी पीक उगवणीनंतर ४० ते ४५ दिवसानंतर एकरी दोन किंवा हेक्टरी पाच कामगंध (फेरोमोन) सापळे लावावेत. सतत दोन दिवस या सापळ्यांमध्ये आठ ते दहा पतंग आढळल्यास गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनाचे उपाय योजना करण्यात यावेत.
- पिकातील डोमकळ्या नियमित शोधून त्या अळीसहित नष्ट कराव्यात. म्हणजे पुढील पिढ्यांची वाढ थांबवता येईल.
- गुलाबी बोंड अळीच्या व्यवस्थापनासाठी प्रत्येक आठवड्याला एकरांतील २० झाडे निवडून निवडलेल्या प्रत्येक झाडावरील फुले, पात्या व बोंडाची संख्या मोजून त्यात गुलाबी बोंड अळीग्रस्त फुले, पात्या व बोंडे यांची टक्केवारी काढावी व प्रादुर्भावग्रस्ताची टक्केवारी ५ टक्क्यांपेक्षा जास्त आढळल्यास रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करावी. त्यासाठी कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांचा सल्ला घेऊन लेबल क्लेम युक्त कीटकनाशकांचा वापर प्रमाणित मात्रानुसार करावा.
कपाशीची यंदाची लागवड
राज्यात - ४० लाख ८२ हजार ३६४ हेक्टर
पश्चिम विदर्भात- १० लाख ३४ हजार ३८८
अकोला -१ लाख २०२३७
बुलडाणा- १ लाख ६५ हजार ५३४
वाशीम- २९३२९ हेक्टर
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.