Monsoon 2024 : यंदाच्या मॉन्सूनचे आकलन

Agriculture Update : महाराष्ट्राच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी सुमारे ७६ टक्के निव्वळ पेरणीखाली असून, त्यात खरिपाचे ८१ टक्के, तर रब्बीचे २९ टक्के क्षेत्र पेरणीखाली आहे
Monsoon
Monsoon Agrowon

डॉ. प्रल्हाद जायभाये

Weather Forecast : महाराष्ट्राच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी सुमारे ७६ टक्के निव्वळ पेरणीखाली असून, त्यात खरिपाचे ८१ टक्के, तर रब्बीचे २९ टक्के क्षेत्र पेरणीखाली आहे. फळपिकाखाली सुमारे साडेचौदा लाख हेक्टर, भाजीपाला पिकाखाली साडेचार लाख हेक्टर आणि फुलशेतीखाली सुमारे अठरा हजार हेक्टर आहे.

एकूण वहितीखालील क्षेत्रापैकी सुमारे ४० लाख हेक्टर (२० टक्के) क्षेत्र ओलिताखाली असून, ८० टक्के पावसावर आधारित आहे. उच्च तंत्रज्ञान आणि व्यवस्थापनाचा वापर करूनही किमान ७० टक्के क्षेत्र हे पावसावरच (अर्थात मॉन्सूनवर) कायमस्वरूपी अवलंबून असणार आहे.

मॉन्सूनच्या पावसावर महाराष्ट्रातील कोकण, पूर्व विदर्भ, पश्‍चिम घाट पट्ट्यात भात, नागली, वरई; तर विदर्भ मराठवाड्यात कापूस, तूर, सोयाबीन, खरीप ज्वारी, मका आणि कोकण वगळून इतर सर्वत्र भागांत कमी-अधिक प्रमाणात बाजरी, मूग, मटकी, कुळीथ, तीळ, कारळा, भुईमूग इ. पिके घेतली जातात.

या पिकांमध्ये अन्नसुरक्षा आणि जैवविविधता जोपासली जाते. यापैकी सोयाबीन (४२ लाख हे.), कापूस (३९ लाख हे.), भात (१५ लाख हे.) मका (८.४० लाख हे.), बाजरी (७ लाख हे.) आणि खरीप ज्वारी (५ लाख हे.) ही कोरडवाहू पिके शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे मुख्य साधन आहेत. मक्याच्या एकूण पेरणी क्षेत्रापैकी ८० टक्के शेती पावसावर होते. एकूणच शेतीचा भार हा मॉन्सूनवर अवलंबून आहे.

या वर्षीच्या मॉन्सूनचा अंदाज व महाराष्ट्रातील पर्जन्यमान

भारतीय हवामान विभागाने १५ मे रोजी या हंगामामध्ये भारतीय मॉन्सूनचे (इंडियन समर मॉन्सून रेनफॉल) आगमन वेळेवर होऊन सरासरी इतका पाऊस पडणार असल्याचा अंदाज जाहीर केले. त्या सरासरी वेळेप्रमाणे १९ मे रोजी मॉन्सून अंदमानात दाखलही झाला. जूनच्या प्रारंभी येणारा हवामान अंदाजही असाच असेल.

कारण या अंदाजास पूरक असे अंदाज पारंपरिक पर्जन्य अनुमान अनेक हवामान संस्थांनी उदा. अमेरिकन हवामान संस्था, कोपर्निकस क्लायमेट चेंज सर्विस (युरोप); सॅस्कॉफ (साउथ एशियन क्लायमेट आउट फोरम); स्कायमेट (भारत) यांनी दिलेले दिसतात. असे असले तरीही अंदाज आणि प्रत्यक्षात पडणारा पाऊस यातील परस्पर गुंतागुंत समजून घेणे आवश्यक आहे.

Monsoon
Monsoon: मॉन्सूनचं केरळात आगमन!

मोसमी पावसाचे आगमन म्हणजे काय ते समजून घेऊया

नैॡत्य मौसमी पावसाचे म्हणजेच भारतीय मौसमी पावसाच्या आगमनाची तारीख ठरविण्यासाठी भारतीय हवामान विभागाने काही घटकांचा विचार करते. त्यात प्रामुख्याने सहा हवामानशास्त्रीय घटक गृहीत धरलेले जातात.

भारताच्या वायव्य भागातील किमान तापमान दक्षिण भारतातील द्विपकल्पीय प्रदेशावरील पूर्वमोसमी पावसाची स्थिती (आंध्र प्रदेश, तेलंगण, कर्नाटक, तमिळनाडू तसेच पुद्दुचेरी, लक्षद्वीप इत्यादी केंद्रशासित द्वीपकल्पीय प्रदेशाचा यात समावेश आहे)

दक्षिण चीन समुद्र यावरून दीर्घ तरंग तरंग लांबीचे उत्सर्जन (आउटगोइंग लाँग रेडिएशन) आग्नेय हिंदी महासागराचे, विषुववृत्तावरील, वातावरणाच्या तपांबर थरातील, खालच्या स्तरातील वाऱ्याची स्थिती (वेग व दिशा), नैॡत्य प्रशांत महासागरावरील दीर्घ तरंग लांबीचे उत्सर्जन आणिईशान्य हिंदी महासागराचे, विषुववृत्तावरील, वातावरणाच्या तपांबर थरातील वरच्या स्तरातील वाऱ्याची स्थिती (वेग व दिशा).

वरील सहा घटकांच्या सरासरी नोंदीनुसार, भारतामध्ये सर्वसाधारणपणे अंदमान-निकोबार बेटांवर २० मेदरम्यान मॉन्सून दाखल होतो.

तो या वर्षी वेळेवर दाखलही झाला. यानंतर केरळ मध्ये १ जून; तर महाराष्ट्रात ७ ते १० जूनला दाखल होतो आणि २० जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र व्यापून टाकतो. असे असले तरीही मॉन्सून अंदमान निकोबारमध्ये दाखल झाल्यापासून किंवा केरळ किनारपट्टीवर दाखल झाल्यापासून महाराष्ट्रापर्यंत येण्याची, स्थिर होण्याची आणि पुढे जाण्याची प्रक्रिया ही अरबी समुद्रात आणि पश्‍चिम बंगालच्या उपसागरात, भारतीय भूमीच्या किनारपट्टीच्या लगतच्या भागात,

निर्माण होणाऱ्या वातावरणीय कमी दाबाचे पट्ट्यावर अवलंबून असते. त्यात बदल झाल्यास किंवा कमी दाबाचा पट्ट्याचे रूपांतर वादळामध्ये झाल्यास, मॉन्सूनच्या आगमनास खीळ बसते. असा परिणाम या हंगामातील पावसावर दिसण्याची सध्यातरी शक्यता नाही. कारण एल निनोचा प्रभाव कमी होत आहे. ऑगस्ट -सप्टेंबरमध्ये ‘ला निनो’ची निर्मिती होण्याची शक्यता आहे. परिणामी, मॉन्सून वेळेवर येऊन सरासरी इतका पडण्याची शक्यता अधिक बळावली आहे.

या वर्षीच्या अंदाजाचा नेमका भावार्थ काय?

या वर्षी मोसमी पावसाच्या सरासरी इतका (१०१ ते १०६ टक्के) पाऊस पाण्याची शक्यता आहे. या वर्षीच्या पावसाच्या अंदाजाची जमेची बाजू म्हणजे सरासरीहून अधिक (अतिवृष्टी) होण्याची शक्यता ६१ टक्के आहे. सरासरी इतका पाऊस पडण्याची शक्यता २९ टक्के आहे. तर सरासरी किंवा अधिक पाऊस पडण्याची शक्यता ९० टक्के आहे.

सरासरीहून कमी पाऊस पडण्याची शक्यता फक्त १० टक्के आहे. याचाच अर्थ असा निघतो की या वर्षीच्या खरीप हंगामात मुसळधार पावसांच्या घटनांची संख्या अधिक असू शकते. हंगामात पडणाऱ्या पावसाचे सरासरी दिवस १२२ आहेत. कोकणात ६० ते ७० दिवस असून, मध्य महाराष्ट्र, खानदेश, विदर्भ व मराठवाड्यात ३५-४५ पावसांचे दिवस आहेत.

परंतु मध्य महाराष्ट्र व त्यास लागून असलेल्या काही जिल्ह्यांतील भागात ३७ दिवसांहून कमी पावसाचे दिवस असतात. मुसळधार पावसाच्या दिवसाचे किंवा घटनांचे प्रमाण कोकणात ८ ते १९ असून, उर्वरित महाराष्ट्रात ३ ते ५ दिवस आहेत.

मुसळधार सरासरी पावसाचा घटनांमध्ये किंवा दिवसांमध्ये दोन ते तीन दिवसांची भर या वर्षी पडू शकते आणि तीव्रताही अधिक असू शकते. यामुळे काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता जास्त आहे. तर काही भागांत पावसात खंड पडण्याची, हंगाममध्य दुष्काळाची स्थिती उद्‌भवण्याची शक्यता अल्प प्रमाणात आहे. मात्र सर्वसाधारणपणे राज्यात सरासरीइतका पाऊस पडेल.

Monsoon
Monsoon 2024 : मॉन्सूनचा सांगावा

आपण जर महाराष्ट्राचे नऊ कृषी हवामान विभाग आणि त्यातील काही पावसाचे गणित समजून घेतले तर, याचे मूळ कारण आपल्या ध्यानात येईल. महाराष्ट्रात सर्वांत कमी पाऊस (४५० ते ४७० मिलिमीटर) सोलापूर आणि नगर जिल्ह्यामध्ये पडतो. सर्वाधिक पाऊस (३२०० ते ३३०० मिलिमीटर) कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात पडतो.

या ९ कृषी हवामान विभागापैकी सहाव्या विभागात (सोलापूर, बीड, छत्रपती संभाजीनगर, नगर, धुळे) सर्वांत कमी ४५० ते ६०० मिलिमीटर पाऊस पडतो आणि तोही अनियमित असतो. तर सातव्या कृषी हवामान विभागात ७०० ते ८०० मिलिमीटर पाऊस हमखास पडतो, यामुळे या भागात खरीप पिके प्रामुख्याने घेतली जातात.

या विभागामध्ये खानदेश, मराठवाड्याचा पूर्वेकडील भाग, पश्‍चिम विदर्भाचा भाग येतो. कृषी हवामान आठव्या विभागांमध्ये (नांदेड, हिंगोली, मध्य विदर्भ) पुरेसा ते चांगला पाऊस पडतो. म्हणून या भागात खरीप पिकांबरोबरच रब्बी आणि बागायती पिके घेतली जातात. कृषी हवामान नवव्या विभागामध्ये (कोकण, घाटमाथा, संक्रमण प्रदेश एक व दोन, पूर्व विदर्भ इ.) जास्त पावसाचा प्रदेश येतो.

जो कृषी हवामान विभाग निसर्गत: कमी पावसाचा व अनियमित पावसाचा प्रदेश आहे; तिथे निश्चितपणे सरासरी इतका पाऊस पडेलच असे होत नाही. नैसर्गिकरित्या काही तालुक्यात सरासरी इतका पाऊस पडेल, तर काहींमध्ये पडणारही नाही. दुसरे म्हणजे महाराष्ट्राचा बहुतांश खरिपाचा भाग हा सातव्या कृषी हवामान विभागात येतो.

यामध्ये पावसाचे आगमन वेळेवर झाले तरीही हंगाम माध्यान्ह दुष्काळाचे सावट हे राहू शकते. जर मॉन्सून वेळेवर दाखल झाला, तर सहाव्या व सातव्या कृषी हवामान विभागात जुलैच्या दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यात पावसात खंड पडू शकतो. नंतर पुन्हा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात किंवा ऑगस्टचा शेवटचा आठवडा व सप्टेंबरचा पहिला आठवडा या काळात पावसात खंड पडू शकतो. खरीप हंगामात काढणीच्या वेळी म्हणजे सप्टेंबरअखेर पाऊस पडून पिके अडचणीत येऊ शकतात.

कमी अधिक प्रमाणात इतर विभागातही अशीच पर्जन्य स्थिती या वर्षीच्या पावसाळ्यात असू शकते. जूनचा दुसरा व तिसरा आठवडा, जुलैचा पहिला- दुसरा आठवडा, ऑगस्टचा मध्य आणि सप्टेंबरअखेर मुसळधार पावसांच्या घटना घडू शकतात. अशा प्रकारच्या संभाव्य खरिपातील पावसाच्या अंदाजाची स्थिती गृहीत धरून आपण शेतकऱ्यांनी खरिपाची तयारी करावी. त्याच प्रमाणे रब्बी व उन्हाळी पिकाच्या पाण्याचे नियोजन व्यवस्थापन केले पाहिजे.

मॉन्सूनचे आगमन ठरवणारे हवामानशास्त्रीय निकष

भारतीय हवामान विभागाने मॉन्सूनच्या आगमनासंदर्भात हवामान शास्त्रीय निकष निश्‍चित केलेले आहेत. एखाद्या प्रदेश किंवा हवामान विभागामध्ये,

१) तापमानात अचानक घट होऊन सरासरी तापमानाच्या इतके म्हणजे सरासरी २२ ते २५ अंश सेल्सिअस इतके तापमान झाले असेल,

२) वाऱ्याचा वेग वाढला असेल आणि सरासरी इतका झाला असेल,

३) वाऱ्याची दिशा नैॡत्य असेल,

४) सापेक्ष आर्द्रतेमध्ये एकदम वाढ होऊन ७० टक्क्यांच्या आसपास राहिली असेल,

५) एका आठवड्यामध्ये तीन ते पाच पर्जन्य दिवसांची (२.५ मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस) सलग नोंद झाली असेल. आणि अशा प्रकारची एकूण स्थिती त्या भागातील ६० टक्के भूप्रदेशावर आढळून आली असल्यास त्या भागामध्ये मॉन्सून दाखल झाला असे समजावे. कृषी हवामान शास्त्रीयदृष्ट्या मॉन्सूनचे आगमन ठरविण्यासाठी वरील घटकांमध्ये आणखी दोन निकषांची भर घालावी लागते. ती म्हणजे भारी जमिनीच्या प्रदेशामध्ये एक आठवड्यात सलग तीन ते पाच पर्जन्य दिवसांमध्ये ७५ ते १०० मीटर किंवा त्याहून अधिक पाऊस झालेला असावा, मध्यम जमिनीमध्ये साठ ते ७५ मिलिमीटर किंवा त्याहून अधिक पाऊस झालेला असावा आणि हलक्या जमिनीच्या प्रदेशांमध्ये ५० मिलिमीटर किंवा त्याहून अधिक पाऊस झालेला असावा.

डॉ. प्रल्हाद जायभाये, ७९८०६८४१८९, (कृषी हवामान शास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com