Animal Story : दावणीला जुनी खोडं का संभाळायची असतात ?

मघाशी मोटरसायकलवर दोघंजण आले. थेट गोठ्यात गेले. निवांत बसलेल्या रेडकाला त्यांनी पायानं धक्कं देऊन उठवलं. असं अचानक अनोळखी माणसांच्या धक्क्यांनी ते बावरलं.
 Animal Story
Animal StoryAgrowon

-कल्पना दुधाळ

आज दावणीचं एक दावं मोकळं झालं. पाच-सहा महिन्यांचं एक रेडकू होतं ते विकून टाकलं. त्याच्या जागी पारडी असती तर दावणीला एक म्हैस वाढेल म्हणून सांभाळली असती. आता दोन म्हशी आणि अगोदरची एक पारडी उरली. उद्या परवा ते निरागस डोळ्यांचं रेडकू या जगात नसेलही कदाचित. त्या रेडकाला  कुणी लाडात सांभाळायला नेलेलं नाही. कोण सांभाळेल ? आणि कशासाठी ? तर जन्मतः त्याच्या अंगावर काळेकुळकुळीत चमकदार केस होते. मस्तकावरचे केस कंगव्याने विंचरून भांग करावा इतके मऊसूत होते. नंतर नंतर त्याच्या अंगावरचे केस पिवळसर, भुरे, राठ झाले होते. सुरूवातीला आईच्या दुधावरचं रेडकू अगदी टुमटुमीत दिसायचं. पुढं पुढं त्याचं दूध कमी करत करत त्याला थानतुटं कधी केलं ते लक्षातपण आलं नाही. मग  काडी काडी खायला लागल्यावर गवत टाकताना, पाणी ठेवताना ते माणसाला जास्त खेटायला बघायचं. जरा खेटू दिलं की मायेनं चाटायला बघायचं. 

मघाशी मोटरसायकलवर दोघंजण आले. थेट गोठ्यात गेले. निवांत बसलेल्या  रेडकाला त्यांनी पायानं धक्कं देऊन उठवलं. असं अचानक अनोळखी माणसांच्या धक्क्यांनी ते बावरलं. त्याचं हंबरणं ऐकून त्याची आई धडपडून उठली. हंबरली. शेजारच्या म्हशीनं कान टवकारलं. पारडी, जी त्याच्या पुढचं गवत स्वतःकडं ओढून घ्यायची तीही टवकारून हंबरली. आलेल्या दोघांनी रेडकाच्या गळ्यातलं दावं सोडून टाकलं. त्यांनी बरोबर आणलेलं दावं  बांधलं. त्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील त्यांनाच माहीत.

तर रेडकाला ओढत ते गोठ्याबाहेर नेऊ लागले.  रेडकानं पाय रोवले. ते पायच उचलेना. मग त्या दोघांनी त्याला बळंच ढकलत गाडीजवळ आणलं.  नेमकं काय चाललंय हे त्या बिचा-या मुक्या जिवाला काय माहीत. गोठ्याशिवाय त्यानं बाहेरचं काहीच बघीतलं नव्हतं. गोठा, घरातली माणसं, आयती वैरणकाडी, पाण्याची बादली हेच त्याचं विश्व होतं. ते माघारी वळून ओढ घेत हंबरत होतं. कावरंबावरं झालं होतं. गोठ्यातल्या म्हशीपण हंबरत होत्या. त्याच्याकडे ओढ घेत होत्या. त्या मुक्या जिवांना कळत असेल का हा शेवटचा निरोप असल्याचं ? या पृथ्वीच्या पाठीवरचा एक शूद्र जीव आपल्यावर माया करतो आणि आपण आपल्या स्वार्थासाठी अतिशूद्र वागतो याचं मला अत्यंत वाईट वाटत होतं. 

रेडकाचा व्यवहार आधीच झाला होता. आलेल्या दोघांनी त्याच्या पोटाखाली हात घालून उचललं. एका बाजूला तोंड आणि पुढचे दोन्ही पाय दाबले. दुसऱ्या बाजूला मागचे पाय धरले. पुढच्यानं किक मारून गाडी चालू केली. मधे रेडकू आडवं धरून दुसरा मागं बसला. रेडकू गोठ्याकडं, अंगणाकडं, घराकडं केविलवाणं बघत होतं. कितीही धडपडलं तरी आता त्याचा इलाज नव्हता. म्हशी गोठ्यातनं टवकारून हे बघत होत्या. गाडीच्या वेगाबरोबर रेडकाचा प्रवास चालू झाला. त्याच्या पाठमोऱ्या नजरेचा टप्पा संपला. म्हशींचं नाइलाजाचं हंबरणं आतल्या आत मूकं झालं. तिसऱ्या, चौथ्या येताच्या म्हशींसाठी हा अनुभव नवा नसेल कदाचित. याआधीची त्यांची रेडकं अशीच गेली असतील किंवा दावणीला मेली असतील. म्हशीनं तिच्या रेडकाला ना शेवटचं चाटलं, ना रेडकाला तिच्या मानंला, कासंला घासून मायेनं खेटता आलं. तर ते रडकू गेलं.

लहानपणी आमच्या आईच्या वडलांनी आम्हाला एक म्हैस दुधासाठी दिली होती. तिला रेडकू झालं तेव्हा त्याचं नाव आम्ही हॅपी ठेवलं होतं. हॅपी म्हणून हाक मारली की ते मान वळवून बघायचं. आम्ही त्याच्यासाठी गवत काढून आणायचो. पाणी पाजायचो. धुवायचो. त्याचा लाड करायचो. सगळ्यांची नजर चुकवून म्हशीची पेंडपण त्याला चारायचो. आमच्याकडं एकच बैल होता. हॅपी चांगला मोठा झाल्यावर त्याला त्या बैलाबरोबर औताला जुंपायचे. नंतरनंतर शेजारीपाजारीपण त्याला औताला न्यायचे.  वडिल म्हणायचे, हॅपीनं आपलं चांगलं केलंय. त्याला विकायचं नाही. बरेच दिवस त्यानं बैलाबरोबर एक बाजू सांभाळली. नंतर त्याच्या घशाला कसलातरी आजार झाला. त्याचं वैरण खाणं कमी कमी होत गेलं.

आई रानातनं येताना त्याच्यासाठी गवत घेऊन यायची. पण तो त्यालाही तोंड लावेनासा झाला. डॉक्टरकडूनही इलाज होईना. त्याचा आजार बळावला. त्याच्यातून तो सावरेना. एके दिवशी दिवस मावळताना आम्ही गोठ्यापाशी होतो. हॅपीनं किंचीत हंबरल्यागत केलं. जसं की तो आम्हाला बोलवत होता. आम्ही सगळे जवळ गेलो. हॅपी आमच्याकडं बघत होता. बघता बघताच त्यानं पाय ताणले आणि जीव सोडला. त्यानं आम्हाला त्याच्या नजरंत साठवून घेतलं. त्याच्या दोन्ही डोळ्यातून दोन अश्रू  ओघळत होते. वडलांनी ते अश्रू पुसले. त्याची नजर आमच्यावर कायमची थांबली होती. आम्ही सगळे रडत होतो. तो आमच्या घरातलाच होता. त्यानंतर हॅपीसारखा रेडा आमच्या दावणीला टिकला नाही की आम्ही टिकू दिला नाही ?  दुसरीकडंही रेडे दिसणं हळूहळू कमी झालं. बारामतीच्या कृषीप्रदर्शनात कमांडर नावाचा मोठा रेडा बघितला. अजब होता तो. एखाद्याच रेड्याचं तसं नशीब म्हणायचं.  मोठ्या गोठ्यात वगैरे रेडे पाळलेले असतात. 

काळ बदलतोय तसतसं आपण माणसं बदलतोय. गायीला गो-हं, म्हशीला पारडी, बाईला मुलगा झाला की आपल्याला बरं वाटतं. आपल्याला रानसुद्धा कसं एकसारखं पाहिजे. बांधावर झाड नको, झाडावर पाखरू नको.  उत्पन्न मात्र भरपूर निघावं. माणसांची भाषा शिकताना हो हो, हट्, हाल्या हाल्या, थेरss थेरss अशी जनावरांना वळवण्याची भाषा शिकतो आपण. जीभ दुमडून टिटीरट्यव करायला, ओठ जुळवून च्यक च्यक करायला गोठा शिकवतो आपल्याला. मग ते शब्द शिकता शिकता गवताच्या मुठीबरोबर हातातला कोरकुटका जित्रांबांला कधी चारतो ते पण कळत नाही. हळूहळू धीट होत काठी उगारून वळवतो त्यांना. हिरवळीकडं ओढ घेणं हा त्यांचा गुन्हा नसताना सटासटा त्यांच्या थोबाडावर मारतो. फक्त पान्हस्तवर वासरू चोखवतो, तोंडात धार आली की आखडतो. इख मिळंल पण चीक मिळायचा नाय म्हणत गायीनं वासरासाठी सोडलेला पान्हा कासंवर पाणी मारून फराफरा बादलीत ओढतो.  दुभत्या गायीच्या लाथा गोड मानतो. शेणामुताच्या शेपटांचे फटकारेही खातो. इस्कटलेल्या पोवट्यांच्या ठिक-या गोळा करून गोव-या थापतो. कृत्रिम रेतनानं माज जिरवतो.

 Animal Story
Soybean Rate : सोयाबीनचा बाजारभाव आज काय राहीला?

दूध, भूसा, पसाभर पेंड, खुराक घालून कालवडींना पोसतो. रेड्यांची मात्र फिकीर करत नाही. रेडकांना बारीक असताना पोटभर पाणी पाजलं किंवा भरपूर ताक पाजलं की ते आपोआप मरतं असं ज्ञान कुणीतरी देतं आपल्याला आणि आपण प्रयोग करून बघतो. मग कोरड्या कॅनॉलमधे ओढून टाकतानाही वाईट वाटत नाही. मेल्यावर त्याचा भोत बनवून म्हशीपुढं उभं करतो आणि तिनं पान्हा सोडला की कसं फसवलं असं म्हशीला म्हणत मनातल्या मनात हसतो. मग कधीतरी पहाटे स्वप्नात टक्करी खेळणाऱ्या अदृश्य गो-ह्यांची तासलेली शिंगं आपल्या पोटात घुसतात. घंट्या किणकिणतात. आपण बघतो इकडं तिकडं तर बिचारे गो-हे, रेडकं, टोणगे, हाले आशाळभूत जीव डोळ्यात आणून आपल्याकडं बघत असतात. आपण त्या नजरा चुकवून गोठ्याकडं बघतो. आपला दुधाचा धंदा, गोठा, वैरणी, खुराक, दुधाची डीग्री, किटल्या, धारंच्या बादल्या असं सगळं जागच्याजागी आहे का ते बघत बघत  ते आशाळभूत जीव विसरून जातो.

कधी वेळ आली तर दावणीची गुरं छावणीत बांधताना लटपटतं अंग. वाळक्या वाड्यानं सवळलेली तोंडं बघून  फडक्यात बांधलेल्या आपल्या भाकरीचे घास तोंडात फिरतात. पाण्याचा घोट घेतला तरच घास घशाखाली उतरतात. आपलंच आपल्याला कळत नाही की वासराच्या लाळाक चाटण्याला आपण मायेचा पाझर फुटणं म्हणायचो. त्या मायेच्या जिभांना काटे कसे आले ? जे रक्ताळतात आपल्यालाच.

परिस्थितीच अशी होतेय, की दुभती जनावरं संभाळणं अवघड होतंय. त्यात रेडेबिडे संभाळून काय मिळणाराय ?  शिवारातला घरोघरचा बैलबारदाणा कमी झाला. एखाद दुसरा औतकरी बैलं सांभाळून असतो. स्वतःच्या नाहीतर भाड्याच्या ट्रक्टरनं शेती करायची. मग हे कशाला संभाळा ? असं किती काय काय असतं आपल्या भवतालात. जे अस्वस्थ करतं आपल्याला. पण इलाज नसतो. बदलांबरोबर जुळवून घ्यावं लागतं. 

निरशा दुधाच्या फेसाची चुरचुर अस्वस्थ करते आपल्याला. चटका लावते जिवाला की कधीकाळी म्हातारीचे थरथरते हात हातात घेऊन दावण जपायचे शब्द दिले होते आपण. वळचणीला काठी आपटत बसलेली म्हातारी म्हणाली होती, बाबांनो जीवावरनं जीव जाणत जावा माणसानं. म्हंजी माणसाला माणूसपण शोभतं. म्हातारे, तू मरून गेलीस कधीच. हे जग बघ किती बदललंय. आता आम्ही तुझं ऐकत बसलो तर जग वेड्यात काढील आम्हाला. तू बोललीस तेवढं बोललीस. आता काय बोलणार म्हणा तू तरी ? आणि काय ऐकणार आम्ही तरी ? तू म्हणायचीस ना प्रत्येक जिवाला देव जन्माला घालतो.

तसं असलंच तर असे जीव जन्माला तरी का घालावेत देवानं ? आम्ही माणसं त्यांना जगवणारच नाही आता. रेडे, टोणगे जगत नसतात असं आम्ही ठामपणे म्हणू शकतो. आम्ही ते दाखवूनच दिलंय ना. ज्याची गरज नाही ते आम्ही सांभाळून करणार तरी काय ? म्हातारे, मी असं ऐकलंय की, शे दिडशे म्हशींच्या गोठ्यातले रेडे जन्मल्या जन्मल्या एका खड्ड्यात टाकतात. ते कोवळे धुकधुकते जीव त्यांची आई, आईची माया, दूधाची चव, कोवळ्या गवताचा एखादा घास, पाण्याचा घोट, सूर्याचा एखादा किरण,  हे जग, अजून किती काय काय बघण्याआधीच ते ह्या जगातून नाहिसे होतात. जाता जाता मालकाच्या दुधाच्या धंद्याला थोडाफार हातभार लावून ट्रकांमधनं ते पुढं जातात. त्यांच्या हक्काच्या दूधाचे पैसे होतेत. आमचे संसार चालतेत. म्हातारे, पुढचं मी सांगू नये नि तू ऐकू नये. पुढच्या पिढीला जर रेडा दाखवायचा असला तर प्रदर्शनात नेऊन दाखवू आम्ही. हे जग असं आहे की, ना मागच्या गोष्टींना खोटं मानता येतं, ना आत्ताच्या गोष्टींना खोटं ठरवता येतं.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com