सतीश खाडे
Value of Water : रात्रीच्या वेळी शहरातील रिकाम्या रस्त्याने एक भिकारी मोठमोठ्याने ओरडत चालला होता, “देवा तू मला काहीच दिलं नाहीस. मला राहायला घर नाही, अंगावर कपडे नाहीत की खायला काही नाही. देवा, तू माझ्यावरच का अन्याय केला?” त्याचा आवाज हवेलीतील एका श्रीमंताने ऐकला. त्याने नोकराकडून भिकाऱ्याला बोलावले. भिकाऱ्याची विचारपूस केली.
तो खरोखरच गरीब असल्याची खात्री केल्यावर भिकाऱ्यासमोर पेच टाकत म्हणाला, ‘‘तुझा हात तर चांगला दिसतोय, मला देशील का? तुला हजार रुपये देतो.’’ हजार रुपयाच्या लालचीने तो तयार झाला. मग दुसऱ्या हाताचा सौदा, मग दोन पायांचा सौदा झाला. आता कानाचा, मग डोळ्याचा. डोळ्यासाठी भिकाऱ्याने दहा हजार रुपये मागितले.
त्यालाही फारशी खळखळ न करताना श्रीमंत माणूस तयार झाल्यावर भिकाऱ्याला वाटले, की आपण कमीच तर मागितले नाहीत ना? चाचरत त्यांनी रक्कम वाढवली. चक्क एक लाख रुपये मागितले. श्रीमंत माणूस म्हणाला, ‘‘काही हरकत नाही, देतो तुला रक्कम.’ आता भिकाऱ्याच्या मनामध्ये विचारचक्र सुरू झाले. एका डोळ्याचे एक लाख रुपये, दोन्ही डोळ्यांचे मिळून दोन लाख, दोन कान म्हणजे चार लाख, असा हिशेब करू लागला.
थोड्याच वेळात त्याला आपल्या पूर्ण शरीराच्या किमतीचा हिशेब करता येईना. तेवढ्यात त्याला त्या श्रीमंताने प्रश्न केला, ‘‘ हे शरीर तुला कोणी दिले?’’ त्यांच्या डोक्यात एकदम प्रकाश पडला. ‘‘हे शरीर तर देवानेच आपल्याला दिले की!’’ तो शरमला आणि हात जोडून म्हणाला, ‘‘महाराज, मी देवाला फुकट दोष देत होतो. ज्याचे मोलही करता येणार नाही, असे शरीर मला देवानेच दिले.’’
आपण शेतकरीही या माणसाप्रमाणे वागत असतो. आपल्याजवळ काय आहे, याचा विचार न करता देवाला, जगाला दोष देत राहतो. हे आपण जमीन किंवा पाण्याच्या उदाहरणावरून पाहू. भूमिहीनापेक्षा अल्पभूधारक थोडा तरी भाग्यवान. नुसतीच जमीन असण्यापेक्षा योग्य पाऊस आणि जमिनीत पाण्याची सोय असेल, तो त्यापेक्षा अधिक भाग्यवान.
ज्याच्याकडे जमिनीसोबत भरपूर पाऊस, भूजल अन् धरण किंवा कालव्याचे नियमित पाणी असेल, तर त्याच्या भाग्याची गणना कशी करायची? अर्थात, या सर्वांचे मूल्य आपण आपले ज्ञान, कामाचे व व्यवहाराचे कौशल्य यानुसार किती लावणार यावर ठरणार. गोष्टीतल्या भिकाऱ्याप्रमाणे अमूल्य अवयव कवडीमोलाने वाया घालवणार की त्याच अवयवाच्या साह्याने नियमित कमावणार?
नुसतीच पडीक जमीन, कोरडवाहू शेती आहे. यापेक्षाही त्यात एक किंवा दोन सिंचनाची सोय झाली, की त्याची किंमत कशी वाढते? याचा विचार करा. त्यावरून आपल्याकडील पाण्याचे मोल कळू शकेल. आता पाण्याचे मूल्य कसे काढायचे? तहान लागल्यावर पाण्याची बाटली विकत घेतो, त्या वेळी त्याची किंमत असते १५ ते २० रुपये लिटर.
घरात मोठा जार भरून घेतला की मिळतो ३०-४० रुपयाला वीस लिटर. सार्वजनिक नळातून शुद्ध केलेले पाणी घरी आले, की ते पडते पैशाला वीस लिटर. कॅनॉलचे पाणी शेतात मिळते ते वीस पैशात दहा हजार लिटर. नीट विचार केला तर यातील पाण्याचे कोणतेही मूल्य खरे नसल्याचे कळेल. कुठल्याही जिवाचे प्राण वाचवणाऱ्या पाण्याचे मूल्यच होऊ शकत नाही.
व्यक्तिगत पातळीवर पाणी हा जीवनावश्यक घटक आहे हे शाश्वत सत्य आहे. पण त्याचा शेतीसाठी वापर होऊ लागल्यापासून ती सामाजिक बाब झाली. त्यातून उत्पन्न मिळू शकते हे लक्षात आल्यानंतर गेल्या शंभर, दीडशे वर्षांतच पाणी व्यापारी वस्तू झाली.
तिला व्यावसायिक मूल्यही आले आहे. मागील एका लेखात मी अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील शेअर बाजारात सोने-चांदी, प्लॅटिनम याबरोबरच पाण्याचीही खरेदी-विक्री सुरू झाली आहे. अहो, इतक्या दूरचे कशाला सांगू. आपल्या नाशिक जिल्ह्यातील वाघाड धरणावरील पाणी वापर संस्थेतील शेतकऱ्यांनी दुष्काळांच्या वर्षात पाण्याचा लिलाव करून पाणी वाटून घेतले.
म्हणजेच कोणत्याही वस्तूप्रमाणेच पाण्याची गरज कोणाला किती आहे, यावर त्याची किंमत ठरते किंवा ठरवली जाते. याच आधारावर आपल्या शेतात उपलब्ध असलेले पाणी आपण कोणत्या पिकाला देणार आणि त्यातून शेतकऱ्याला किती उत्पन्न मिळणार, यावर त्याची किंमत काढता येईल. याला पाण्याचे मूल्यांकन असे म्हणता येईल.
आपण शेतकरी पाण्याच्या मूल्यांकनाचा विचार फारसा करत नसलो, तरी मोठमोठ्या उद्योगांना तो करावा लागतो. प्रति १००० लिटर पाण्यात किती उत्पादन व फायदा होणार आणि पाणीच न मिळाल्याने कामगार बसून राहण्यासोबतच सर्व स्थिर खर्चाचा, कर्जांचा भार बोकांडी बसणार, याचा विचार उद्योगांच्या व्यवस्थापनाला करावाच लागतो.
आपण कधी करणार पाणी मूल्यांकनाचा विचार?
जेव्हा पाण्याची उपलब्धता असते, तेव्हा सोडाच, पण पाण्याच्या थेंबाथेंबाला महाग असतानाही हा विचार केला जात नसल्याचा माझा अनुभव आहे. दुष्काळाच्या वर्षात, ऐन उन्हाळ्यात, भर दुपारी शेताला पाणी देताना शेत किंवा चारीचे बारे फुटून पाणी अस्ताव्यस्त पसरून वाया जाताना आपल्या डोळ्यांना दिसतच नाही का?
पाणी कालव्याचे असो, की आटत चाललेल्या विहिरीचे वा बोअरचे असो, आपण तुम्ही या पाण्याचे मूल्यांकन केले तर कळेल की आपल्या विहिरीत किती किमतीचे पाणी आहे.
माझा अनुभव, प्राथमिक माहिती यातून पाण्याचे मूल्य काढण्याची ढोबळ पद्धत मी तयार केली केली आहे. त्याला अर्थशास्त्राचे सर्वच नियम लागू होत नाहीत, याची मला पूर्ण कल्पना आहे. पण साध्यातल्या साध्या शेतकऱ्याला ढोबळमानाने समजून, त्याने त्याचे गणित करावे, इतकाच त्याचा उद्देश आहे.
हात आखडायचा की मोकळा सोडायचा?
आज पावसाच्या रूपात पाणी आपल्या दारात येते. पिण्याच्या किंवा सिंचनाच्या पाण्यासाठी आकारली जाणारी पाणीपट्टीही अगदीच नगण्य आहे. त्यामुळे त्याची खरी किंमत कळत नाही. पाण्याकडे संपत्तीप्रमाणे पाहिले, तर त्यातून जाणीवपूर्वक नियोजनातून अधिक संपत्ती तयार करता येईल.
याच पद्धतीने आपल्या शेतात पावसाच्या रूपात पडणाऱ्या पाण्याचे मूल्यांकन काढा. कॅनॉलच्या शेतात येणाऱ्या पाण्याचे मूल्यांकन काढल्यावर कळेल, की आपल्या शेतात किती लाखाची संपत्ती येतेय. ही संपत्ती फाटक्या झोळीत घ्यायची की व्यवस्थित जपायची, हे आपणच ठरवले पाहिजे. गावातून वाहून ओढ्याला, नदीला मिळणाऱ्या पाण्याचे मूल्यांकन काढून बघा.
मग आपोआपच हात आखडता न घेता शेतकरीच नव्हे, तर सर्व गावच जल संधारणाच्या कामाला, शेताच्या बांधबंदिस्तीला, विहीर व बोअरवेलच्या पुनर्भरणासाठी खर्च करायला तयार होईल. ड्रीप व स्प्रिंकलर बसवायला येणारा खर्च आपोआपच अत्यंत कमी वाटेल. पुढे जाऊन सांडपाणी शेतीयोग्य शुद्ध करून त्यातील संपत्तीची निर्मिती करण्याकडे गाव वळेल, यात शंका नाही.
पाणी मूल्यांकनाचे गणित
पाणी मूल्यांकनाचे गणित समजावून घेण्यासाठी आपण कांदा पिकाचे उदाहरण पाहूयात.
कांद्याचे पीक पूर्ण हाती येईपर्यंत ठिबकद्वारे पाणी वापरले तर एकरी २० लाख लिटर पाणी लागते.
एकरी सरासरी उत्पादन १५ टन आणि सरासरी बाजारभाव १० हजार रुपये प्रति टन धरला, तर एकूण उत्पन्न होईल दीड लाख रुपये.
आता २० लाख लिटर पाणी उपसण्यासाठी तीन एच.पी.च्या पंपाला लागणारा कालावधी हा १११ तास.
म्हणजे फक्त १११ तास पंप चालला, की एक एकर कांद्याचे पीक उत्तम उत्पादन देते. (खरंतर आपण पद्धतीनुसार यापेक्षा कितीतरी अधिक पाणी देतो, याचा प्रत्येकाने आपापला विचार करावा.)
म्हणजेच ३ एचपीचा एक पंप रोज आठ तास चालवला, तर १११ तासांचे होतात १४ दिवस.
म्हणजेच १४ दिवसांत उपसून दिल्या जाणाऱ्या पाण्यावर एक एकर कांद्याचे उत्पादन हाती येते. म्हणजेच १४ दिवसांत उपसलेल्या पाण्याची किंमत झाली दीड लाख रुपये. त्यावर १,५०,००० ÷ १४ असा साधा भागाकार केला, तर एका दिवसाच्या पाण्याची किंमत येते १०,७०० रूपये.
आता तुमच्या विहिरीचे किंवा बोअरवेलचे पाणी एक एकर भरणे करण्यासाठी आठ महिने (२४० दिवस) पुरत असेल, तर उपलब्ध पाण्याचे मूल्यांकन १०,७०० रु. (प्रति दिवस) × २४० दिवस या प्रमाणे होते २५.५ लाख रुपये. जर विहीर वर्षभर चालत असेल, तर ३६५ दिवसांनी गुणल्यास पाण्याचे मूल्य होईल ३८.५ लाख रुपये. हे झाले कांद्याच्या दरानुसार केलेले मूल्यांकन.
जर तुमच्याकडे निर्यातक्षम द्राक्षासारखे पीक असेल किंवा सीताफळासारखे कमी पाण्यात अधिक उत्पादन देणारे पीक असेल, तर मूल्य कदाचित याहीपेक्षा कितीतरी अधिक येईल. त्यावरून तुमच्या विहीर, बोअर किंवा अन्य स्रोतांमध्ये असलेल्या पाणीरूपी संपत्तीचा हिशेब शेतकरी म्हणून कायम मनात राहिला पाहिजे. कृपया डोळे व बुद्धीची कवाडे उघडून बघा. पाणी ही संपत्ती समजून संपत्तीप्रमाणेच जपा. मग ज्या प्रमाणे एखाद्या उद्योगातील व्यवस्थापन जसा जाता येता फायद्या-तोट्याचा हिशेब करतो, तसेच आपण शेतकरीही पाण्याच्या बाबतीत कायम हिशेबी राहू.
हे झाले शेती व्यवसायातील गणित. पण जीवनावश्यक बाब म्हणून पाण्याचे मूल्यच करता येत नाही. कारण पाणी निर्माण करता येत नाही आणि पाण्याला अन्य काही पर्याय नाही.
- सतीश खाडे, ९८२३०३०२१८
(लेखक पाणी अभ्यासक असून, पाणी तंत्रज्ञावर लिहिलेल्या ‘अभिनव जलनायक’ पुस्तकाचे लेखक आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.