
दिव्य मराठीत कॉलम सुरू होता त्याच काळात विठ्ठल आप्पा खिलारी याचा फेसबुकवर एसएमएस आला. त्याचं प्रोफाइल पाहिलं तर सुप्रसिद्ध लेखक राजन गवस सरांचा फोटो होता. हा विठ्ठल शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे मराठी विषयात एम ए करत होता. मग अधूनमधून फोन करायचा. भरपूर आयुष्य जगलेला. आणि अनुभवाचं गाठोडं डोक्यावर घेऊन फिरणारा. आता आलेले अनुभव बिलकुल चांगले नव्हते. कोल्हापूरला होता तेव्हा घरची आठवण यायची. दुःख व्हायचं. भोगलेले अनुभव त्रास द्यायचे.
'सर पुस्तक वाचायचो. दुःख विसरतय का बघायचो.' विठ्ठल सांगतो. आटपाडी तालुक्यातील झरे गाव संपलं की पंढरपूर रोडने गेलं की शेणवडी गाव येत. या गावापासून माण तालुका सुरू होतो. सातारा जिल्हा. पुढे पाच कोसावर गेलं की पुन्हा सांगली जिल्हा आणि दिघची गाव. अशा या शेणवडी गावातला हा विठ्ठल.
याच रोडने कोकणातील लोक पंढरपूरला जातात. रोज किमान दोन तीन तरी वाहन या रोडने जात असतील पंढरपूरला. त्यावरुनच विठ्ठल हे नाव ठेवण्यात आलं त्याच. याच गावच्या परिसरात वरकुटे मलवडी गावहे. तिथला अमृत पोळ हा माझा दोस्त. मला कराडमध्ये भेटलेला. खूप भारी पोरग हाय ते. याच गावचे खासेराव जगताप नावाचे मातब्बर पुढारी होते. माण तालुक्यात लोकप्रिय होते. त्याच गावाच्या पाच कोसावर पळसावडे राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक ,माजी मंत्री आमदार महादेव जानकर यांचं गाव. त्यांच्या घरी जाऊन मी त्यांच्या आईंना भेटून आलो आहे. असा हा सगळा परिसर. याच परिसरातील विठ्ठल आप्पा खिलारीची गोष्ट मी सांगत आहे.
लहानपणापासून त्याला एक माहिती होतं, आपण शिकलं पाहिजे. पण शिकण्यात खूप अडथळे आले. आईवडील ऊस तोडायला जात होते. पोराला दुसऱ्याच्या घरात ठेवून. मग त्याला तो ज्या घरात राहील त्या घरातलं सगळी कामे करावी लागत. तसच शिक्षण झालं दहावीच्या वर्गापर्यंत. पुढे आटपाडीला कॉलेजला गेल्यावर शिक्षणाला गती मिळाली. याच दरम्यान एक दिवस त्या कॉलेजात राजन गवस आले होते. त्यांचं भाषण ऐकून विठोबान ठरवलं. आपण याच गुरुजीकड शिकायला जायच.
पुढं एम ए ला कोल्हापूरला गेला.खूप वाचन केलं. सरांच्याकडून जेवढं ज्ञान घेता येईल तेवढं घेत राहिला. याचदरम्यान एक प्रसंग घडला.वडिलांनी ऊसतोड मुकादमकडुन ऐंशी हजार रुपयांची उचल घेतली होती. या उचलीच्या फेडीसाठी त्यांन जावं अशी परिस्थिती निर्माण झाली. मग विठ्ठल राजन गवस सरांच्याकडे गेला. सरांना सगळी हकीकत सांगितली. गवस सर म्हणाले,"तुझ्या वाट्याचे चाळीस हजार रुपये मी देतो. पण तुला मी जाऊन देणार नाही." ही आठवण सांगताना विठ्ठल हेलावतो. "गवस सर आयुष्यात आले आणि दुःखाचा भार कमी झाला."अस विठ्ठल म्हणतो.
मी जेव्हा जेव्हा त्या भागात जातो किंवा मला त्या भागातील कोणी भेटलं तर हमखास या विठोबाची आठवण येत राहते. मनाने निर्मळ असलेला हा पोरगा. साहित्य आणि माणसं वाचणारा आणि समजून घेणारा. खंडेराव बाभळीचा काटेरी रस्ता काही कमी सुंदर नसतो या नेमाडें सरांच्या वाक्याचा अर्थ समजलेला हा पोरगा.
सातारा जिल्ह्यातल्या शेवटच्या गावात विठू राहतो. शेजारी सांगली जिल्हा सुरु होतो. सातारा कोल्हापूर सांगली तिन्ही मोठी गाव तेवढ्याच अंतरावर असलेल्या विठूला कोल्हापूर जवळ आहे असं वाटतं कारण तिथं राजन गवस राहतात. काल विठ्ठलची 'सवळा' नावाची कादंबरी आलीय. या रांगड्या पोराने लिहिलेली कादंबरी वाचताना डोळे कधी गळू लागतात हेच कळत नाही. एक चांगला लेखक माणदेशाची समृद्ध साहित्य परंपरा खांद्यावर घेऊन पुढं चाललाय. विठ्ठल कादंबरीकार झालाय याचा आनंद आहे. आईबासोबत ऊसतोडकामगार म्हणून काम करत एम ए झालेल्या विठूची वेदना आनंद यादव त्यांच्या झोंबीच्या जवळ जाणारी आहे.
विठ्ठलला शुभेच्छा..
----------------------
पुस्तक- सवळा
लेखक- विठ्ठल खिलारी
प्रकाशक -दर्या प्रकाशन
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.