Maharudra Mangnale: कसलीही शाश्वती नसताना शेती करायला जिगर लागतं!

पाणी दिलेल्या रानात भसाभस पाय जातात. त्यामुळं ही पाईपांची वाहतूक त्रासदायक ठरते. पण याला काही पर्याय नाही. स्प्रिंकलरची सगळी जोडणी करून मोटार चालू केली की, किमान एकतरी नळी फिरत नाही, एखादी नळी नीट पाणी फेकत नाही.
Maharudra Mangnale
Maharudra MangnaleAgrowon

पाऊस थांबून आज बारा दिवस झाले. त्याआधी पडलेला पाऊसही जेमतेम होता. दहा दिवस झड होती. नाममात्र पाऊस. त्यामुळं आमच्या हलक्या जमिनीतील सोयाबीनची वाढ अपेक्षेप्रमाणे झाली नाही. मुरमाड जमीन असल्याने, पावसाच्या आठवड्याच्या खंडानंतर पिकं ऊन धरू लागतात. सध्या विहीरीत पाणी असल्याने, पाच दिवसांपासून पाणी देणं सुरू आहे. शेततळ्यात मासे आहेत. त्यांना दररोज खाद्य टाकलं जातं. काही दिवस शेणही टाकलं. त्यामुळं पाण्याचा रंग हिरवट झालाय. या पाण्यात मिनरल्स असल्याने, तळ्यातील पाणीच पिकांना देतोय व विहीरीचं पाणी तळ्यात सोडतोय. यात लाईट हा सर्वात मोठा अडथळा आहे.

विहिरीत सध्या तरी भरपूर पाणी आहे पण अपेक्षित वेगाने ते तळ्यात येत नाही. सध्या तळ्यातील सहा फुट पाणी कमी झालयं. ते भरायचंय. दुसऱ्या बाजूला तळ्यातील पाणी उपसणे सुरूच आहे. सोयाबीनची पुरेशी वाढ झाली नसली तरी, दिवस पूर्ण झाल्याने निळसर फुलं चमकत आहेत. या दिवसात पाणी मिळालं नाही तर, ही फुलं गळून पडतील. त्यामुळं पळापळी सुरू आहे. पाईप, नळ्या उचलून पुढच्या जागी लावणं हे काम सोपं नाही.

पाणी दिलेल्या रानात भसाभस पाय जातात. त्यामुळं ही पाईपांची वाहतूक त्रासदायक ठरते. पण याला काही पर्याय नाही. स्प्रिंकलरची सगळी जोडणी करून मोटार चालू केली की, किमान एकतरी नळी फिरत नाही, एखादी नळी नीट पाणी फेकत नाही. अशावेळी त्या नळीत अडकलेला कचरा काढावा लागतो. हे काम करणारा अर्धा अधिक भिजून जातो. तो कधी नरेश असतो तर कधी गजानन.

आज सकाळी एका नळीला दुरूस्त करताना गजानन पूर्ण भिजला. त्याचा फोटो काढत मी म्हटलं, हिरो दिसतोयस गजानन आणि तो ही वास्तवातला. सिनेमातील हिरो तर केवळ दिखावा करीत असतात. तु हे सगळं जगतोयस. तो मस्त हसत बोलला, मामा कितीही त्रास होवो. विहिरीत पाणी आहे तोपर्यंत पाणी द्यायची हयगय करायची नाही. आपल्या हातात आहे तेवढं करायचंच. नाहीतरी सोयाबीनशिवाय आपल्या शेतात दुसरं काहीच नाही. खर्चा पण निघल असं वाटत नाही. माझी तर झोप उडालीय.

मी म्हटलं, चिंता सोडून दे. ज्या बाबी आपल्या हातात नाहीत, त्याची चिंता करणं चुकीचं आहे. शेतकरी म्हणून माझ्यासाठी ही परिस्थिती नवीन नाही. आज तरी गुगल २२ ऑगस्टपर्यंत पाऊस दाखवत नाही. हा मोठा लांबचा पल्ला आहे. कठीण आहे. विहिरीत पाणी आहे तोपर्यंत देत राहू. जमेल तेवढं हसत खेळत काम करू. आपलं आनंददायी जगण्याचं सुत्र काही सोडायचं नाही.

नरेशशी तर माझा सतत संवाद चालूच असतो. गेल्या अनेक वर्षांत पहिल्यांदा नरेशशी जुळवून घेणारा गजानन हा सहकारी मिळालाय. नरेश हा शेतीतील सगळी कामं करीत असला तरी, तो चारचाकीचा चालक आहे, हे समजून घेण्याची इतरांची तयारी नसायची. नरेशशी तुलना करून इतर सालगडी नसते प्रश्न निर्माण करायचे. यावर्षी तो विषय नसल्याने, वातावरण खेळीमेळीचं आहे. त्यामुळं मी ही खूष आहे. ही सगळी काम त्रासाची असल्याने, त्यांना कायम मदत करण्याची माझी भूमिका असते. याची मला आवडही आहे. बऱ्याचदा मला ताण पडू नये म्हणून ते दोघे पाईप बदलण्याची कामं माझ्या परस्पर करतात. ते मला कळतं. पण मी माझ्या परीने कामात कुचराई करीत नाही.

या कामात कधी कोणता अडथळा निर्माण होईल ते सांगता येत नाही. परवा रात्री एका पालीमुळे मोटार जळाली. तिनं स्टार्टरमधील प्लस, मायनसवर जाऊन जीव दिला आणि मोटारीचा बळी घेतला. मोटार काढणं हे पुन्हा त्रासाचं काम. किमान चौघेजण लागतात. सगळेच आपापल्या कामात व्यस्त असल्याने शेजारच्या गड्यालाही बोलावणं शक्य नव्हतं. शेवटी सविता, अनिता आणि संगीता यांना मदतीला घेऊन परवा मोटार काढली. ती खोलून इलेक्ट्रिशियन भोसले यांच्याकडं गावात पोचती केली.

त्यांना कामाची निकड माहिती असल्याने, त्यांनी काल दहा वाजताच मोटार तयार करून दिली. नरेश ती शेतात घेऊन आला. मोटारीचं कनेक्शन त्यांनी देणं अपेक्षित होतं. मी तीनवेळा फोन केला. दुपारचे तीन वाजले तरी भोसलेंना येणं शक्य झालं नाही.त्यांची अडचण लक्षात आली. शेवटी नरेशनेच वायरींगचं कनेक्शन दिलं. मोटार पाण्यात सोडली.पहाटे दोन वाजता मोटार सुरू झाली. अशा छोट्या छोट्या बाबींची यादी करायची म्हटली तर,त्याचाच एक लेख होईल. हे सांगण्याचा हेतू एवढाच आहे कि, शेतीतील कामं आणि इतर कामं यात खूप फरक आहे.

सलग पाच दिवसांपासून एकाच पध्दतीचं काम सुरू असतानाही,अद्याप हात-पाय सेटल झालेले नाहीत. रात्री झोपताना बेकार दुखताहेत. पाठिचे, मानेचे व्यायाम करतोय. त्यांचा त्रास नाही. रात्री दिड वाजता शरीराला ऊठ ऊठ मोटार चालू करणं किती महत्त्वाचं आहे, ते तुला माहिती नाही का, असा आदेश देतच उठलो. नरेश, गजानन माझ्या आधीच उठले होते. ते दोघेही माझ्यापेक्षा जास्तच काम करतात. त्यामुळं त्यांना माझ्यापेक्षा अधिक त्रास होत असणार हे उघड आहे. त्रासाबद्दल कुरकुर न करता, त्याची मजा घ्यायची, हे माझं तत्वज्ञान त्यांनाही पाठ झालयं. कामाच्या पळापळीत मी त्यांना चहा बनवतो, तेव्हा तो चहा त्यांच्यासाठी टॉनिक असतं.

Maharudra Mangnale
Maharudra Manganale: शेतकऱ्यांना तुझ्यासारखी पेन्शन असती तर....

मी ही त्यांच्यासोबत अधूनमधून दुधाचा चहा घेतोय. शिवाय त्यांच्या आहाराकडंही माझं लक्ष असतं. शारीरिक कष्ट करणाऱ्या माणसांचा आहार वैविध्यपूर्ण असला पाहिजे. तरच ते काम करू शकतात. बांडगुळांच्या आहाराच्या कल्पना इथं हास्यास्पद ठरतात. इथं काम करताना उर्जा एवढी खर्च होते की, एक कप चहा, कॉफी ताजीतवानी करते.

आहाराचं व्हाट्सएप युनिव्हर्सिटीचं ग्यान देणाऱ्या चिवट्यांकडं मी ढुंकूनही बघत नाही. प्रत्येक माणूस वेगळा असतो. त्याच्या सवयी,आवडीनिवडी वेगळ्या असतात. एक बाब दुसऱ्याला लागू पडत नाही. माझ्या शरीराला काय हवं आणि काय नको, हे मला नीट कळतं. कुठलाही अतिरेक हानिकारक असतो एवढंच. त्यामुळं मी सगळं खातो, पितो. दह्यापासून तुपापर्यंत आणि चिकनपासून माशापर्यंत सगळंच आवडीने खातो. कोणी काय खावं आणि काय खाऊ नये, हे मी कधीच सांगत नाही. कोणाच्याही ताटात आणि ग्लासात वाकून पाहणं असभ्यपणाचं आहे, असं मी मानतो आणि पाळतोही!

दुसऱ्या बाजुला अनिता, संगीता आणि पुष्पामावशीला घेऊन सविता सोयाबीन खुरपणीचं काम युध्दपातळीवर करून घेतेय. तिला तर घरात खाण्याची सोय करून, हे काम करावं लागतयं. तिचे बेहाल आहेत. उन्हाने चेहरा काळपट झालाय. अर्थात तिनं स्वत: आनंदाने स्विकारलेलं हे काम आहे. ती हे सगळं छान एन्जॉय करते. तिनं ही कामं करावीत, असा माझा अजिबात आग्रह नाही. पण मी तिला काम करू नको असंही म्हणू शकत नाही. शेवटी हा तिच्या आवडीच्या जगण्याचा भाग आहे. शेतात राहणारा माणूस असा निवांत बघत बसू शकत नाही, हे वास्तव आहे.

खरं तर हे चित्र शेतकऱ्यांचं प्रातिनिधीक आहे. सगळीकडे अशीच पळापळ सुरू आहे. ज्यांच्याकडं पाण्याची सुविधा आहे, ते पाणी देताहेत. पण ज्यांच्याकडं पाणी नाही, त्यांनी काय करायचं? याचं उत्तर कोणाकडंच नाही.. पाऊस पडणं हाच यावरचा उत्तम इलाज आहे. तोपर्यंत मला तरी रुद्रा हट सोडता येणार नाही .

समोर कसलीच निश्चित हमी नसताना, काम करण्याला जिगर लागतो. तो शेतकऱ्यांकडं असतो. एवढ्या जोखमीचा व्यवसाय दुसरा नाही. त्यामुळं मी शेतकरी आहे, हे अभिमानाने सागतो.

शेतीतील त्रास, कष्टही आनंददायी होऊ शकतात. शेतीत, निसर्गात आनंद देणाऱ्या छोट्या छोट्या शेकडो बाबी आहेत. रडण्याचे विषय आता सगळ्यांनाच माहिती आहेत. आनंदाचे विषय ज्ञात नाहीत. त्यासाठी विशिष्ट अशी दृष्टी हवी,शिवाय केवळ शेतीवर पोट असायला नको. मी नरेशला म्हटलं, आपण आपल्या जगण्यावरचा एक सिनेमा काढू आणि युट्युब वर टाकू. नाही तरी शेतकऱ्यांचा सिनेमा पाहायला प्रेक्षक मिळणार नाहीतच. त्याची आपल्याला गरजही नाही. आपणच तो पाहू! सगळ्यांना रंगीबेरंगी जगायचंय, वास्तवात कधीच न उतरू शकणारी स्वप्न बघायचीत, प्रत्येकाला बांडगुळ बनायचंय. त्यासाठी त्यांना बॉलिवूडचाच सिनेमा बघावा लागेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com