
Mumbai News: राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयांचा पाऊस पाडला जात आहे. राज्य सरकार गुरुवारी (ता.१०) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ८० निर्णय घेतल्याची माहिती मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
यामध्ये शेतकऱ्यांसाठी चार महत्त्वाचे निर्णयांचा समावेश आहे. राज्य सरकारने ॲग्रिस्टॅक योजना राज्यात राबवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्रासाठी अतिरिक्त निधी आणि नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबवण्यासाठी मान्यता दिली आहे.
निर्णय खालील प्रमाणे-
केंद्राची ॲग्रिस्टॅक योजना राज्यात राबवणार
राज्यातील कृषी क्षेत्रातील डिजिटल सेवांचा लाभ शेतकऱ्यांना देण्यासाठी केंद्र सरकारचा ॲग्रिस्टॅक मिशन राबवली जाणार आहे. यामध्ये माहिती निर्मिती कक्ष, शेतकरी माहिती संच, हंगामी पिकांचा माहिती संच आणि भूसंदर्भाकीत भूभाग असणारे गाव नकाशे माहिती संच महसूल विभाग तयार करणार आहे.
त्यासाठी माहिती वापर कक्षाची स्थापना करण्याची जबाबदारी कृषी विभागाकडे आहे. सुकाणू समिती, अंमलबजावणी समिती, क्षेत्रिय स्तरावर विभागस्तरीय, जिल्हास्तरीय समिती आणि तालुकास्तरीय समिती गठित करण्यात येतील. पिकांच्या माहिती संचासाठी तिन्ही हंगामात मिळून सुमारे ८१ कोटी ८३ लाख रुपये खर्च दरवर्षी करण्याच्या निर्णयास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.
नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबवणार
जागतिक बँक अर्थसहाय्यित नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबविण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या प्रकल्पात एकूण २१ जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, धाराशीव, लातूर, नांदेड, हिंगोली तर विदर्भातील अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली तसेच खानदेशातील जळगाव व नाशिक अशा एकूण २१ जिल्ह्यांमध्ये अंदाजित ६ हजार कोटी रुपयांच्या नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचा टप्पा-२ राबविण्यात येणार आहे.
प्रकल्पाच्या टप्पा दोनमध्ये समाविष्ट करण्यासाठी गावांसाठीचे निकष निर्धारित करुन त्यानुसार गावांच्या निवडीबाबतची प्रक्रिया पूर्ण करुन निवड केलेल्या एकूण ६ हजार ९५९ गावांच्या यादीस मान्यता देण्यात आली आहे. नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाच्या टप्पा दोनसाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली सुकाणू समितीची स्थापन करण्यात आली आहे.
बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्रासाठी अतिरिक्त निधी
मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड जिल्ह्यात हळदीचं पीक मोठ्याप्रमाणावर घेतलं जातं. त्यामुळे हळदीवरील संशोधन, प्रक्रिया आणि पायाभूत सुविधाची उभारणी करण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे बाळासाहेब ठाकरे हळद (हरिद्रा) संशोधन व प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे. त्यासाठी ७०९ कोटी २७ लाख रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या केंद्रासाठी मंजूर अतिरीक्त निधी टप्पेनिहाय वितरीत करण्यात येणार आहे.
पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाची पुनर्रचना
पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभागाची पुनर्रचना करून या विभागाचे नामकरण पशूसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मस्त्यव्यवसाय विभाग असे करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. पुनर्रचनेनंतर पशूसंवर्धन आयुक्तालय व दुग्धव्यवसाय आयुक्तालयाचे एकत्रीकरण करून पुनर्रचनेनंतर आयुक्त पशूसंवर्धन व दुग्धव्यवसाय असे या पदाचे नाव राहील.
राज्यातील ३५१ तालुक्यांत तालुका पशूसंवर्धन व दुग्धव्यवसाय अधिकारी कार्यालय सुरु करण्यात येईल. त्याचप्रमाणे १६९ तालुक्यात तालुका लघू पशूवैद्यकीय सर्वचिकित्सालय सुरु करण्यात येतील. राज्यातील २ हजार ८४१ पशू वैद्यकीय श्रेणी दोन दवाखान्यांचे श्रेणी एक दवाखान्यात श्रेणीवाढ करण्यात येईल. त्याशिवाय १२ हजार २२२ नियमित पदांना व कंत्राटी तत्वावरील ३ हजार ३३० पदे यांच्या वेतनासाठी १ हजार ६८१ कोटी रुपये खर्चास मान्यता देण्यात आली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.