Pune News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक मंत्रालयात बुधवारी (ता.१०) घेण्यात आली. जिल्ह्यासाठी सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत २०२४-२५ चे ९४८ कोटी रुपये, अनुसूचित जाती योजनेअंतर्गत १३५ कोटी आणि आदिवासी उपाययोजने अंतर्गत ४५ कोटी ८४ लाख रुपये अशा एकूण एक हजार १२८ कोटी ८४ लाख रुपयांच्या प्रारुप आराखड्यास मान्यता देण्यात आली.
बैठकीस दूरदृश्य प्रणालीद्वारे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मंत्रालयातून सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रे, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, आमदार दिलीप मोहिते पाटील, सुनील शेळके, अतुल बेनके, दूरदृष्य प्रणालीद्वारे आमदार उमा खापरे, दत्तात्रेय भरणे, अशोक पवार, ॲड. राहुल कुल, सिद्धार्थ शिरोळे, अश्विनी जगताप आदी उपस्थित होते.
सर्वसाधारण योजनेअंतर्गत ग्रामीण विकास, जनसुविधा १२५ कोटी, नागरी सुविधांच्या बळकटीकरणासाठी १४१ कोटी, आरोग्य सुविधा ५१ कोटी १६ लाख, रस्ते विकास १०५ कोटी, अपारंपरिक ऊर्जा व ऊर्जा विकास ९५ कोटी, पर्यटन विकास ५३ कोटी ४४ लाख, हरित महाराष्ट्र ६२ कोटी, महिला व बालकांचे सशक्तीकरण २८ कोटी ४४ लाख, गतिमान प्रशासन ७५ कोटी ८४ लाख, कौशल्यपूर्ण रोजगार निर्मिती १६ कोटी ६५ लाख, शैक्षणिक दर्जा वाढीसाठी पायाभूत सुविधांवर भर देण्यासाठी ४७ कोटी ४० लाख, क्रीडा कलागुणांच्या विकासासाठी ३० कोटी २० लाख आणि नावीन्यपूर्ण योजनेसाठी ४१ कोटी ८६ लाख रुपयांचा नियतव्यय प्रस्तावित केला आहे.
‘१०० टक्के निधी खर्चण्याचे नियोजन’
‘‘सर्वसाधारण योजनेअंतर्गत २०२३-२४ या वर्षात ५९० कोटी रुपये म्हणजेच ८३.७२ टक्के निधी खर्च झाला आहे. राज्यात पुणे जिल्हा प्रशासकीय मान्यता व वितरित निधीच्या बाबतीत प्रथम क्रमांकावर आहे. अनुसूचित जाती उपाययोजनेअंतर्गत १२.८० टक्के आणि आदिवासी उपाययोजनेअंतर्गत ५२.९५ टक्के निधी खर्च केला आहे. मार्चअखेर १०० टक्के निधी खर्च करण्याचे नियोजन केले आहे,’’ अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी दिली.
थोडक्यात महत्त्वाचे...
अजित पवार यांच्या सूचना...
- भंडारा डोंगर तीर्थक्षेत्र विकासासाठी आराखडा सादर करावा
- जिल्ह्यातील तीर्थस्थळे आणि पर्यटन विकासाच्या कामांना गती द्या
- या कामांसाठी राज्यस्तरावरून निधी देणार
- पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात उद्योग यावेत यासाठी विशेष लक्ष द्यावे लागेल
- पंतप्रधान आणि नीती आयोगाच्या प्रधान्याच्या योजनांच्या अंमलबजावणीसाठी विशेष लक्ष द्यावे
- सौर वीजनिर्मितीकडे लक्ष द्यावे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.