Join Agresco : अडीचशे उत्पादन तंत्रज्ञान शिफारशी, २० पीकवाण, ८ यंत्र-अवजारांना मान्यता

PDKV Akola : कृषी क्षेत्र व शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञांच्या जॉइंट अॅग्रोस्कोचे रविवारी (ता.९) सूप वाजले.
Joint Agresco
Joint AgrescoAgrowon

Akola News : कृषी क्षेत्र व शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञांच्या जॉइंट अॅग्रोस्कोचे रविवारी (ता.९) सूप वाजले. या वर्षी या बैठकीत २५० उत्पादन तंत्रज्ञान शिफारशी, २० पीकवाण आणि ८ यंत्र-अवजारांना मान्यता मिळाली आहे.

महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद (पुणे) आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने येथे शुक्रवारपासून (ता.७) संयुक्त कृषी संशोधन व विकास समितीची ५२ वी बैठक आयोजित करण्यात आली होती.

बैठकीच्या समारोपीय सत्राचे अध्यक्ष महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील (राहुरी) होते. या वेळी व्यासपीठावर ‘पंदेकृवि’चे कुलगुरू डॉ. शरद गडाख, बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे, कृषी शिक्षण संशोधन परिषदेचे संशोधन संचालक डॉ. हरिहर कौसडीकर, कार्यकारी परिषद सदस्य विनायक काशीद, संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, शिक्षण विस्तार संचालक डॉ. धनराज उंदीरवाडे, डॉ. श्यामसुंदर माने यांच्यासह इतर मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

Joint Agresco
Okra Variety : ‘‘वनामकृवि’चे केळी, भेंडी’चे वाण ‘जॉइंट अॅग्रोस्को’मध्ये’

मार्गदर्शनात कुलगुरू डॉ. भावे यांनी, शास्त्रज्ञांना कर्तव्याची जाणीव करून देत सध्या बैठकीत सादर झालेल्या काही शिफारशी पाहिल्या असत्या प्रयोग करताना अभ्यास, परिश्रम कमी पडतो की काय अशी शंका येत असल्याचे सांगितले. कुठे माहितीचे, आकडेवारीचे संकलन अर्धवट होते. वास्तविक आज शेतकरी जशी शेती करतो त्यानुसार आपल्या संशोधनाची दिशा असावी.

सामाजिक व गृहशास्त्र विभागाच्या शिफारशी त्याच-त्या मार्गाने वर्षानुवर्षे जात असल्याचे दिसून येते. शेतकऱ्यांचे, महिला शेतकऱ्यांच्या नेमक्या समस्या काय आहेत, हे शास्त्रज्ञ म्हणून आपण शोधले पाहिजे. जास्तीत जास्त शिफारशी, सूचना देण्याऐवजी मोजक्या दिल्या तरी चालतील, मात्र त्या उपयोगी असायला हव्यात, अशी सूचनाही त्यांनी संशोधकांना दिल्या.

कुलगुरू डॉ. गडाख म्हणाले, ‘‘या बैठकीत ३०२ शिफारशी ठेवण्यात आल्या होत्या. चर्चा, विचारविनिमयातून २५० शिफारशींना मंजुरी मिळाली. पीकवाण २० आणि ८ यंत्र-अवजारे मंजूर झाले. शास्त्रज्ञ म्हणून आपल्या मोठ्या जबाबदाऱ्या आहेत. संशोधन शेतकरीभिमुख हवे.

आपल्याला काय संशोधन करायचे याचा निश्चित रोडमॅप हवा. उपलब्ध संसाधनांचा वापर करून संशोधन पुढे नेण्याची गरज आहे. आजवर चारही कृषी विद्यापीठांनी असंख्य पीकवाण, यंत्र-अवजारे काढले. दर वर्षी आपण नवनवीन संशोधित वाण, शिफारशी देत असतो. हे सर्व जोवर बांधापर्यंत जाणार नाही तोवर त्याचे मूल्य शून्य आहे.

Joint Agresco
Joint Agresco 2024 : अकोल्यात आजपासून ‘जॉइंट अॅग्रोस्को’चे आयोजन

यासाठी विस्तारकार्य वाढवावे लागेल. विद्यापीठांकडे असलेल्या या विभागात सर्वत्रच मनुष्यबळ कमी आहे. म्हणून कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांचे सहकार्य घेऊन आपण संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवू शकतो. आपल्या संशोधनाचा किती प्रभाव झाला, आर्थिक फायदा काय होत आहे, हेही सांगता आले पाहिजे, असेही डॉ. गडाख यांनी सुचवले. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दिवसरात्र मेहनत करीत ही बैठक यशस्वी केल्याबद्दल त्यांनी कौतुकही केले.

डॉ. पाटील अध्यक्षीय भाषणात, विद्यापीठांसमोरील अडचणी, निधी, कुलगुरूंचे अधिकार, मनुष्यबळाची समस्या, विद्यापीठांकडून असलेल्या समाजाच्या अपेक्षांबाबत ओघवत्या शैलीत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे यांनी केले. संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे यांनी आभार मानले.

सेवानिवृत्तांचा सन्मान

समारोपीय सत्रात चारही विद्यापीठांत या महिन्यात, पुढील काळात सेवानिवृत्त होत असलेल्या शास्त्रज्ञांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. त्यांनी दिलेल्या योगदानाविषयी कृतत्रज्ञा व्यक्त करण्यात आली.

विद्यापीठनिहाय मिळालेली मंजुरी

विद्यापीठ पीकवाण यंत्रे उत्पादन तंत्रज्ञान

अकोला ६ ३ ७३

राहुरी ७ ५ ८९

परभणी २ - ५२

दापोली ५ - ३६

एकूण २० ८ २५०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com