
Namo Kisan Scheme : नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याची शेतकरी प्रतिक्षा करत होते. अखेर राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्यासाठी १ हजार ६४२ कोटी रुपयांच्या वितरणासाठी मान्यता दिली आहे.
नमोच्या हप्त्याची प्रतिक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर लवकरच निधी वितरित करण्यात येणार आहे. याबद्दलचा शासननिर्णय राज्य सरकारने बुधवारी (ता.२६) प्रसिद्ध केला आहे.
राज्य सरकारने २०२३ च्या अर्थसंकल्पात पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर नमो महासन्मान निधी योजना राबवण्याची घोषणा केली. या योजनेतून तीन समान टप्प्यात वार्षिक ६ हजार रुपयांची मदत देतं. म्हणजेच चार महिन्याला २ हजार रुपये शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा केले जातात. आत्तापर्यंत या योजनेतून पाच हप्त्याचं वितरण करण्यात आलं आहे.
पाचव्या हप्ता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर परळी येथील कार्यक्रमात केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या उपस्थितीत वितरित करण्यात आला होता. त्यावेळी घाईगडबडीने सोहळा आयोजित करून दोन दिवसांत निधी वितरित केल्याने गोंधळ निर्माण झाला. परिणामी विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर निधी जमा झाला नाही, असा आरोप शेतकरी करत होते.
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे म्हणजेच पीएम किसानचे लाभार्थी शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत पात्र आहेत. राज्यात पीएम किसान योजनेच्या लाभार्थीची संख्या ९२ लाख ८० हजार आहे. तसेच पीएम किसानचा हप्ता वितरित केल्यानंतर त्याच यादीप्रमाणे निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येतो.
दरम्यान, अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नागपूरमधील एका कार्यक्रमात नमोच्या हप्तात वाढ करण्याची घोषणा केली होती. पीएम किसान आणि नमोचा वार्षिक मदत निधी १५ हजार करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्याप्रमाणे शेतकऱ्यांना वार्षिक तीन हजार रुपये वाढीव मिळतील, अशी अपेक्षा आहे.
राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशनात यासाठी तरतूद केली जाईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. परंतु अर्थमंत्री अजित पवारांनी २०२५-२६ अर्थसंकल्प सादर केला. मात्र या अर्थसंकल्पात नमोच्या वाढीव निधी तरतूद करण्यात आली नाही. शेतकऱ्यांचा मात्र यावरून हिरमोड झाला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.