
Appasaheb Nalwade Sugar Factory : 'एका ट्रस्टकडून ३०० कोटी आणून कारखान्याला ऊर्जितावस्थेकडे नेण्याचे स्वप्न दाखविणारे अध्यक्ष डॉ. प्रकाश शहापूरकर यांच्यावर आता शेतकरी व कामगारांचा विश्वास राहिलेला नाही.
पगार थकीत ठेवून त्यांनी विद्यमान कामगारांवर उपासमारीची वेळ आणली आहे. पाच ऑगस्टपर्यंत ठोस कार्यवाही झाली नाही तर त्यानंतर डॉ. शहापूरकर यांच्या कोल्हापुरातील घरासमोर भीक मांगो आंदोलन करण्याचा इशारा कामगारांनी आज पत्रकार परिषदेत दिला.
दरम्यान, बाहेरगावी असलेले तीन संचालक वगळता सर्व संचालकांच्या दारात जाऊन कामगारांनी थकीत पगारासाठी साकडे घातले. या मोहिमेनंतर कामगारांनी आज पत्रकार परिषद घेतली.
'निवडणुकीत डॉ. शहापूरकर यांनी एकहाती सत्तेची मागणी करून २०२१ पासूनचा थकीत पगारासह सर्व प्रश्न मार्गी लावण्याचा विश्वास कामगारांना दिला. यामुळे त्यांच्या पाठीशी खंबीर राहून त्यांच्या पॅनेलला निवडून आणण्यात सिंहाचा वाटा उचलला.
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आश्वासित केल्यानुसार केडीसीतर्फे ५५ कोटींचे कर्ज दिले. या रक्ककमेतून अध्यक्षांनी कारखान्याची दुरुस्ती काढली. नूतनीकरण करूनही चार हजारांप्रमाणे गाळप करण्याची त्यांची घोषणा हवेतच राहिली. चालू अर्कशाळाही बंद पाडली. कारखान्याचे कोट्यवधीचे नुकसान केले, थकीत पगाराबाबत आश्वासन देऊनही ते न पाळता कामगारांवर उपासमारीची वेळ आणली.
स्थानिक कामगारांऐवजी बाहेरून आणलेल्या कामगारांना पूर्ण पगार दिला. तरीही आम्ही कधी तरी चांगले दिवस येतील या आशेपोटी पोटाला चिमटा लावून काम केले. अध्यक्षांच्या एकाधिकारशाहीमुळे कारखाना व कामगारांवर ही वेळ आल्याचा आरोप गोडसाखर कामगार संघाचे अध्यक्ष विजय रेडेकर, उपाध्यक्ष श्रीकांत नार्वेकर, जॉईंट सेक्रेटरी अरुण शेरेगार, सुनील आरबोळे, भाऊसाहेब पाटील, राजेंद्र कोरी, सोमनाथ घेजी, सुरेश कब्बुरी, चंद्रकांत चौगुले आदींनी यावेळी केला.
साखर अडविली, तरीही...
थकीत पगाराची ठोस कार्यवाही व्हावी म्हणून कामगारांनी दीड लाख क्विंटल साखर बाहेर सोडलेली नाही. हंगाम संपल्यानंतर सुरू झालेले हे आंदोलन अजूनही कायम आहे. साखर का अडविली, याची साधी विचारपूसही संचालक मंडळाने आजअखेर केलेली नाही, अगर चर्चेसाठी बोलावले नसल्याचे कामगारांनी यावेळी सांगितले.
दरवाजावर चिकटविले निवेदन
कारखान्याचे अध्यक्ष डॉ. शहापूरकर कोल्हापुरात राहतात. तिकडे जाण्याचा खर्च कामगारांना परवडणारा नाही. यामुळे त्यांच्या कौलगे येथील निवासस्थानासमोर कामगारांनी एकत्र येऊन थकीत पगार मिळालाच पाहिजे, अशा घोषणा देत बोंब मारो आंदोलन केले आणि बंद दरवाजावर मागण्यांचे निवेदन चिकटविल्याचे रेडेकर, नार्वेकर, शेरेगार यांनी सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.