Nano DAP : नॅनो डीएपी, ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर

Drone Technology : पर्यावरण प्रदूषण कमी होण्यासाठी तसेच रासायनिक खतांचा योग्य वापर होण्यासाठी नॅनो डीएपी खताची निर्मिती करण्यात आली आहे. ड्रोनमुळे शेताचे अचूक नकाशा मिळवणे शक्य होते, त्यामुळे पीक परिस्थितीची अचूक माहिती मिळते.
Drone Technology
Drone TechnologyAgrowon
Published on
Updated on

डॉ. विनेश रेगे

Nano DAP, Drone Technology : पर्यावरण प्रदूषण कमी होण्यासाठी तसेच रासायनिक खतांचा योग्य वापर होण्यासाठी नॅनो डीएपी खताची निर्मिती करण्यात आली आहे. ड्रोनमुळे शेताचे अचूक नकाशा मिळवणे शक्य होते, त्यामुळे पीक परिस्थितीची अचूक माहिती मिळते. पारंपारिक पद्धतींच्या तुलनेत शेतीकामांसाठी ड्रोनचा वापर केल्याने वेळ आणि मजुरीचा खर्च वाचतो.

औषध, ऊर्जा, इलेक्ट्रोनिक्ससारख्या क्षेत्रामध्ये नॅनो तंत्रज्ञानमुळे यशस्वीरित्या क्रांती घडून आली आहे. आता हे तंत्रज्ञान भारतीय शेतीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. नॅनो तंत्रज्ञान पीक उत्पादकता, गुणवत्ता आणि संपूर्ण मातीचे आरोग्य राखण्यासाठी उपयुक्त ठरणारे आहे.

कृषी क्षेत्रामध्ये पीक संरक्षणासाठी नॅनो कीटकनाशके, अचूक शेतीसाठी नॅनो सेन्सर आणि पीकवाढीसाठी नॅनो तंत्रज्ञानावर आधारित खते उपलब्ध झाली आहेत. खत वापर परिणामकारकता लक्षात घेता जमिनीतून देण्यात येणाऱ्या खताला फवारणीच्या माध्यमातून अन्नद्रव्यांची जोड देणे गरजेचे आहे. पिकाच्या वाढीसाठी १७ अन्नद्रव्यांची गरज असते. स्फुरद हे अन्नद्रव्य वनस्पतीतील उतींची वाढ तसेच जीवनसत्वे आणि खनिजे यांच्या संतुलित वापरासाठी आवश्यक असते.

प्रत्येक पिकासाठी डीएपीचा वापर जमिनीत मिसळून करतात ,परंतु अशा पद्धतीमध्ये दिल्या गेलेल्या स्फुरदपैकी फारच थोडा भाग पिकाकडून वापरला जातो. हे लक्षात घेऊन पर्यावरण प्रदूषण कमी होण्यास, कमी रासायनिक खतांचा वापर तसेच जैवविविधता संवर्धनासाठी नॅनो डीएपी खताची निर्मिती करण्यात आली आहे.

Drone Technology
Nano Dap Fertilizer : नॅनो यूरियानंतर आता नॅनो डीएपी!; अंतरिम अर्थसंकल्पातच अर्थमंत्र्यांनी केली घोषणा

नॅनो डीएपी हे पांढरे द्रवरूप खत असून हे प्रगत नैसर्गिक पॉलिमर क्रॉसलिंकिंग तंत्रज्ञानासह विकसित झाले आहे. यात शुद्ध, उच्च गुणवत्तेच्या डायअमोनियम फॉस्फेटच्या नॅनो कणांचा समावेश आहे.

डीएपी जमिनीतून दिल्यामुळे पिकाच्या वाढीच्या महत्त्वाच्या अवस्थेत फॉस्फरसची गरज पूर्ण होत नाही. नॅनो डीएपी पिकाच्या महत्त्वाच्या टप्प्यावर फॉस्फरसची आवश्यकता पूर्ण करून वापर क्षमता वाढविण्यात मदत करते.

नॅनो डीएपीचे अधिकतम कण ५० एनएम पेक्षा कमी आकाराचे असतात. छोट्या आकारामुळे आणि अधिक पृष्ठभाग क्षेत्रफळामुळे ते सहजगत्या आणि वेगाने वनस्पतीमध्ये प्रवेश करू शकतात. पिकाची कीड, रोग प्रतिकारक्षमता वाढते. पाने, पिकाच्या फुटव्यासाठी उपयुक्त ठरते.

नॅनो डीएपीमुळे फॉस्फरस आणि नायट्रोजन थेट वनस्पतींच्या मुळांमध्ये पोहोचविण्यासाठी नॅनो पार्टिकल्सचा वापर होतो. पारंपारिक खतांच्या तुलनेत पोषक ग्रहण कार्यक्षमता लक्षणीय वाढवते. यामुळे पिकांच्या वाढीस चालना मिळते.

खतांचा अपव्यय कमी होतो. नॅनो डीएपीमधील नॅनो कण वेगवेगळ्या वाढीच्या टप्प्यांमध्ये पिकांच्या पोषक मागणीशी जुळवून घेतात. पाण्याचा अपव्यय आणि झिरपून जाण्याचा धोका कमी होऊन जमिनीची गुणवत्ता टिकून राहण्यास आणि पर्यावरण प्रदूषण कमी होण्यास मदत होते.

नॅनो डीएपी खताच्या चांगल्या कार्यक्षमतेसाठी, सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळी तापमान कमी असताना आणि वेगवान वारा नसताना फवारणी करावी.नॅनो डीएपीचे द्रावण तयार झाल्यानंतर लगेच फवारणी करावी. फवारणी करताना हातमोजे, मास्क आणि गॉगलचा वापर मानवी आरोग्याच्यादृष्टीने महत्त्वाचा आहे.

ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर

ड्रोन तंत्रज्ञानाला मानवरहित हवाई वाहने (यूएव्ही) म्हणतात. डेटा गोळा करणे, पीक निरीक्षण आणि फवारणीसाठी हे तंत्र फायदेशीर आहे. सेन्सर आणि कॅमेऱ्यांनी सुसज्ज ड्रोन पिकांच्या उच्च गुणवत्तेच्या प्रतिमा टिपतात.

वनस्पतींचे आरोग्य, वाढीचे नमुने आणि पोषक तत्त्वांची कमतरता किंवा किडीचा प्रादुर्भाव यांसारख्या संभाव्य समस्यांबद्दल माहिती मिळते. यामुळे शेतकऱ्यांना सिंचन, खत आणि कीटकनाशकांच्या वापरासाठी योग्य माहिती उपलब्ध होते.

सर्व पिकांवरील फवारणी तसेच उसासारख्या उंच पिकांवर फवारणीसाठी उपयुक्त आहे. ड्रोन हे बॅटरीवर चालतात. सुरक्षित आणि अचूक प्रभावी फवारणीसाठी ड्रोनचा वापर फायदेशीर आहे. ड्रोनमुळे शेताचे अचूक नकाशा मिळवणे शक्य होते, त्यामुळे पीक परिस्थितीची अचूक माहिती मिळते.

पारंपरिक पद्धतींच्या तुलनेत शेतीकामांसाठी ड्रोनचा वापर केल्याने वेळ आणि मजुरीचा खर्च वाचतो. प्रगत विश्लेषण आणि सॉफ्टवेअर साधनांचा वापर करून जमा झालेल्या माहितीवर योग्य प्रक्रिया करून शेतीमध्ये काय करणे गरजेचे आहे, याचे नियोजन करणे शक्य होते.

- डॉ. विनेश रेगे,

७६६६७१९५८९

( विभागीय कृषीवेत्ता, कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड, पुणे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com