
डॉ. प्रफुल्लकुमार पाटील, डॉ. मत्स्यगंधा पाटील
Animal Care : जनावरांना टॅगिंगद्वारे ओळख देणे हा व्यवस्थापनाचा महत्त्वाचा भाग आहे. परंतु अजूनही बरेच पशुपालक टॅगिंग करण्याकडे दुर्लक्ष करतात. यामुळे बऱ्याच वेळा नुकसान होते. आपल्याकडील सर्व पशुधनाचे टॅगिंग करावे. वासरे/करडे जन्मल्यानंतर एक महिन्यामध्ये टॅगिंग करणे आवश्यक आहे. टॅगिंग केल्यामुळे आपल्या जनावरांना एक ओळख मिळते. जनावराने दिलेल्या उत्पादनाविषयी नोंद करणे सोपे होते. कोणत्या जनावरांची उत्पादनानुसार निवड करायची याबद्दल माहिती मिळते. टॅगिंगमुळे पशुप्रजननाबाबत नोंदी ठेवण्यास मदत होते. जनावर कधी व्यायले, गाभण झाले का, किती वेळा उलटले, उपचार केले का, माजावर किती दिवसाला येते, कधी वेत होऊ शकते इत्यादी बाबीची नोंद राहते. योग्य उपाययोजना करण्यास मदत
होते.
टॅगिंगमुळे जनावरांची वंशावळ जपली जाते. चांगल्या वंशावळीच्या जनावरांची निवड करणे सोपे होते. कमी उत्पादनक्षम जनावर ओळखता येते, नेहमीच्या आढळणाऱ्या समस्या ओळखता येतात आणि आपले नुकसान टाळण्यासाठी अशी कमी उत्पादनक्षम जनावरे कळपातून काढून टाकण्यास मदत होते. टॅगिंगमुळे गोठ्यातील जनावरांचे शारीरिक अवस्थेनुसार वर्गीकरण करता येते. वेगवेगळे व्यवस्थापन करणे सोईस्कर होते. यामुळे खर्चात बचत होऊन उत्पादन वाढीस मदत होते. आपल्या गोठ्यातील एखादे जनावर दगावल्यास टॅगिंग असेल तर सरकारकडून आर्थिक मदत मिळवणे, विमा रक्कम मिळवणे किंवा काही सवलती मिळविण्यास मदत होते. एखादे जनावर हरवल्यास शोधून काढण्यास मदत होते. पशुधन स्पर्धा, पशुप्रदर्शनात भाग घेण्यासाठी मदत होते. आजारी जनावरांची नोंद राहून जनावर मालकाच्या गैरहजरीमध्ये पशुवैद्यकास उपचार करणे सोईस्कर होते. जनावर कोणालाही विक्री केल्यास हवे त्या वेळी शोधण्यास मदत होते. जनावरांचा दाखला बनवण्यास मदत होते.
जनावरांची कायदेशीर वाहतूक करण्यात अडथळा येत नाही. कळपातील नर व मादी वेगळे करणे तसेच त्यांचे व्यवस्थापन करण्यास मदत होते. जनावरांची जन्मतारीख, वय, वेत, दिलेली वासरे याबाबत नोंद ठेवता येते. नवजात वासराची आई ओळखण्यात मदत होते, त्यामुळे दूध पाजणे, इतर काळजी घेणे सोईस्कर होते.कळपातील जुळे, तिळे यांचे प्रमाण ओळखण्यास मदत होते.लम्पी त्वचा आजार किंवा इतर संसर्गजन्य आजारामुळे जनावरांची मरतूक झाल्यास, नुकसान झाल्यास आर्थिक मदत मिळण्यास सोईस्कर होते. वेळोवेळी जाहीर झालेले दूध अनुदान मिळण्यास सोईस्कर होईल.नैसर्गिक आपत्तीने मृत्युमुखी पडलेल्या जनावरांना नुकसान भरपाई मिळण्यास सोईस्कर होईल. एखाद्या गावात, भागात, तालुक्यात, जिल्ह्यात, राज्यात किंवा देशात एकूण अचूक पशुधन किती आहे हे समजून येण्यास मदत होईल त्यानुसार लागणाऱ्या सुविधा पुरवण्यास मदत होते. चांगल्या उत्पादनशील गाई, म्हशीपासून किंवा शेळ्या-मेंढ्यापासून मिळणारा नर वळू/बोकड म्हणून प्रजननाकरिता निवड करण्यास मदत होते.
टॅगिंगबाबत गैरसमज
टॅगिंग केल्यानंतर जनावर चांगले दिसत नाही, त्यामुळे आपल्या जनावरास कमी किंमत मिळते असा एक गैरसमज काही पशुपालकांच्या मनात आहे. परंतु टॅगिंग केलेल्या जनावरास कमी किंमत मिळत नाही. टॅगच्या खाली गोचीड, पिसवा व इतर कीटक बसतात असे काही पशुपालकांना वाटते. परंतु कानाखाली गोचीड किंवा इतर कीटक बसू नयेत म्हणून वेळोवेळी कान आतून आणि बाहेरून स्वच्छ करावा. टॅगिंगमुळे कानास इजा होते किंवा कान फाटतो असे काही पशुपालकांना वाटते. कानास इजा होऊ नये म्हणून टॅगिंग करतेवेळी जनावरास व्यवस्थित पकडून ठेवावे, त्यास जास्त हलू देऊ नये. टॅगिंग करताना कोणत्याही प्रकारची जखम शक्यतो होत नाही.
टॅगिंगबाबत आवश्यक माहिती
सर्व सरकारी पशुवैद्यकीय दवाखान्यात टॅग /बिल्ले उपलब्ध आहेत. नजीकच्या सरकारी पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क करून आपल्या जनावरांना टॅग मारून घ्यावा. शेळ्यांसाठी लहान टॅग आणि गाई, म्हशींसाठी मोठे टॅग उपलब्ध आहेत. टॅगिंग केल्यानंतर आपल्या पशुधनाबाबत सर्व नोंदी ऑनलाइन ठेवल्या जातात. त्यामध्ये वेळोवेळी सुधारणा करून घेणे गरजेचे आहे.सांसर्गिक आजारास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम २००९ नुसार पशुधनातील सांसर्गिक आजार प्रतिबंध व नियंत्रण करण्यासाठी इयर टॅगिंग करणे बंधनकारक आहे.आपल्या जनावरांना इअर टॅग नसेल तर सरकारी दवाखान्यांमार्फत उपचार व इतर सुविधा मिळणार नाहीत.जनावरांना कोणत्याही प्रकारची नुकसानभरपाई मिळणार नाही किंवा दूध अनुदान मिळणार नाही. जनावरांची वाहतूक किंवा खरेदी- विक्री करता येणार नाही.
टॅगिंग करताना घ्यावयाची काळजी
कानाच्या शिरेवर टॅग मारला जाणार नाही याची काळजी घ्यावी.
कानात टॅग जलदगतीने मारावा, जास्त विलंब करू नये.
टॅगिंग करायचे यंत्र व्यवस्थित आहे का याची खात्री करावी. जेणेकरून कानास इजा टाळता येईल.
टॅगिंग करताना जनावर व्यवस्थित पकडून ठेवावे, जेणेकरून ते जास्त हलणार नाही. कानास इजा होणार नाही.
कानाला पूर्वीचे छिद्र असेल तर त्यामध्ये टॅग बसवावा.
टॅग लावताना रक्त आल्यास व्यवस्थित उपचार करावेत.
- डॉ. प्रफुल्लकुमार पाटील, ८३२९७३५३१४, (पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.