Book Review : विहिरीची मुलगी : स्त्रियांचा मुक्तिमार्ग

Vihirichi Mulgi Book : या कादंबरीची नायिका मीरा आजच्या काळातील मुलीशी नातं सांगणारी आहे. कादंबरीतील मीरा आदिम पुरुषी संस्कृतीची मळलेली पायवाट न स्वीकारता स्वत:च्या वाटा निर्माण करणारी जात्याच बंडखोर आहे.
Vihirichi Mulgi Book
Vihirichi Mulgi Book Agrowon
Published on
Updated on

Book :

पुस्तकाचे नाव : विहिरीची मुलगी

लेखिका : ऐश्वर्या रेवडकर

प्रकाशन : न्यू ईरा पब्लिशिंग हाऊस

पाने : २७४

किंमत : ३५० रू.

या कादंबरीची नायिका मीरा आजच्या काळातील मुलीशी नातं सांगणारी आहे. कादंबरीतील मीरा आदिम पुरुषी संस्कृतीची मळलेली पायवाट न स्वीकारता स्वत:च्या वाटा निर्माण करणारी जात्याच बंडखोर आहे. तिच्या बंडाची कथा ही या कादंबरीची मध्यवर्ती संकल्पना आहे. लेखिका ऐश्वर्या रेवडकरांनी कादंबरीतून समाज व्यवस्थेसमोर आरसा धरला आहे.

कादंबरीमधील मीराच्या जन्मानंतर तिची आई तिला सोडून जाते. बालपणाचे मूळ शोधण्याच्या धुंदीत मीरा स्वत:च्या वडिलांचा तिरस्कार करू लागते. आईविना वाढलेली पोर या विचाराने मीराचे वडीलही कित्येक गोष्टींवर पडदा टाकतात. कित्येक छोट्या-मोठ्या गोष्टींमधून मीराचं पात्र वाचकांसमोर उलगडत जातं. ती तिला हव्या असणाऱ्या प्रेमाचा शोध घेत असते. तारुण्यसुलभ आकर्षण की प्रेम या वादाच्या भोवऱ्यात न अडकता ती प्रेमात पडते. प्रेमात पडल्यानंतर बॉयफ्रेंडकडून आलेल्या बरे-वाईट परिणामांना सामोरी जाते.

Vihirichi Mulgi Book
Book Review : पाणी प्रश्नातील अनेक पैलूंचा सखोल आढावा...

याच दरम्यान ती स्त्रीच्या नैसर्गिक लैंगिक भावनेविषयी मुक्तपणे व्यक्त होऊ लागते. मुळात आजही आपण या विषयावर मोकळेपणाने बोलत नाही. परंतु या कादंबरीने स्त्रियांना देखील शारीरिक सुखाची गरज आहे आणि ती नैसर्गिक आहे, या विषयाला वाचा फोडली आहे. कादंबरीतील काही प्रसंग वाचकांना अंतर्मुख करतात. भवतलाकडे डोळस पाहण्याची दृष्टी देतात. स्त्रीला गर्भाशय आहे, म्हणून जन्माला येणाऱ्या बाळाची जबाबदारी तिच्यावर टाकली जाते. मात्र या धारणेला मीराची डॉक्टर मैत्रीण गर्भपात करून फाटा देते. त्यावेळी स्त्रीचे स्वत:चे अस्तित्व आहे, याची जाणीव लेखिका वाचकांना करून देते.

एका प्रसंगात मीराचा बॉयफ्रेंड इतर मुलीकडे वासनेच्या नजरेने बघतो आणि मीराला म्हणतो की, तू रंगाने सावळी, अंगाने जाड आहेस. त्यावेळी मीरा अपमान सहन न करता हिंमतीने नात्यातून बाहेर पडते. या प्रसंगातून समाजाच्या अंगवळणी पडलेल्या वर्णभेद, बॉडी शेमिंग यासारख्या विषयांकडे लेखिका लक्ष वेधते. आजही कित्येक मुलींना त्यांच्या शरिराविषयी न्यूनगंड आहेत. ते घालवण्यासाठी त्या त्यांच्या शरिरावर अनेक प्रयोग करत असतात.

Vihirichi Mulgi Book
Book Review : वासरांच्या संगोपनातून तयार करा ‘घरची लक्ष्मी’

त्यामुळे दुष्परिणाम देखील उद्भवतात. स्वत:चं शरीर आपण स्वीकारलं पाहिजे. शरीर निरोगी असावं, हा दृष्टिकोन महत्त्वाचं आहे. परंतु शरीर ठराविक मोजमापातच बसायला हवं, असा अट्टाहास नको, यावर कादंबरीत प्रकाश टाकण्यात आला आहे. त्यामुळे कादंबरी वाचकाला केवळ कल्पनाविलासात गुंतवून न ठेवता समाज व्यवस्थेसमोर प्रश्न उपस्थित करते. कादंबरीत शेवटी मानसिक आजाराचा पट येतो. त्यावर मात करीत जीवनावर प्रेम करत स्त्रियांनी त्यांच्या सुखाची जबाबदारी उचलली पाहिजे, याकडे लेखिकेनं लक्ष वेधलं आहे.

ही कांदबरी म्हणजे स्त्री जीवनाचा मुक्तपणे मांडलेला पट आहे. परंतु स्त्रियांना समाजाने अनेक नियमांच्या साखळदंडात जखडून ठेवले आहे. स्त्रियांना कळसूत्री बाहुलीचं रूप देत तेच नियम स्त्रियांसाठी योग्य आहेत, ते पटवून दिलं जात आहे. अशा साऱ्याच दांभिक समाजधारणेला या कादंबरीने प्रतिप्रश्न केला आहे. त्यामुळे कादंबरी वाचत असताना कित्येक समज-गैरसमज गळून पडतात. या कादंबरीने स्त्रियांच्या भोवती आखून ठेवलेल्या लक्ष्मणरेषेला धक्का लावत तिच्या उंबऱ्याची अदृश्य नियमावली पुसली तर आहेच; पण त्याचवेळी माणूसपण स्वीकारत जगले पाहिजे, या विचारांना बळ दिलं आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com