

विनोद इंगोले
Mahatma Gandhi : महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांनी ग्रामीण भारताच्या विकासाविषयी ( Development Of Rural India) मुलभूत चिंतन केलेले होते. त्यावेळी भारतात सात लाख गावे होती. ही गावे स्वयंपूर्ण व्हावीत, यासाठी एका गावातून एक याप्रमाणे सात लाख ग्रामसैनिक तयार करण्याचा गांधीजींचा विचार होता.
परंतु तो प्रत्यक्षात येण्यापूर्वीच त्यांची भ्याड हत्या करण्यात आली. गांधीजींची ही संकल्पना पुढ नेण्यासाठी त्यानंतरच्या काळात सर्वोदय मंडळ, सर्व सेवा संघाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात आले. सर्व सेवा संघाची संकल्पना काय, त्या माध्यमातून कोणती कामे केली जातात, याविषयी सांगत आहेत सर्व सेवा संघाचे अध्यक्ष व कोलकाता येथील निवासी चंदन पाल.
सर्व सेवा संघाची स्थापना कधी झाली? त्याचे नेमके स्वरूप काय आहे?
महात्मा गांधी यांनी ग्रामीण भारताच्या विकासाविषयी मुलभूत चिंतन केलेले होते. त्यावेळी भारतात सात लाख गावे होती. गांधीजींनी एक कल्पना मांडली होती की या प्रत्येक गावात एक याप्रमाणे सात लाख सैनिक तयार करावेत.
त्यांच्या माध्यमातून स्वयंपूर्ण गावाची उभारणी करणे शक्य होईल. ३० जानेवारी १९४८ रोजी गांधीजींची भ्याड हत्या करण्यात आली. त्यामुळे त्यांचे हे स्वप्न अपूर्णच राहिले. ते प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यानंतरच्या काळात विनोबा भावे यांच्यासह ४७ व्यक्तींनी मिळून मार्च १९४८ मध्ये सर्वोदय समाज व सर्व सेवा संघ यांची स्थापना केली.
सर्व सेवा संघाविषयी आणखी काय सांगाल?
सर्व सेवा संघाची स्थापना राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत झाली. आचार्य विनोबा भावे, जयप्रकाश नारायण, पंडित जवाहरलाल नेहरु, अबुल कलाम आझाद, डॉ. जाकीर हुसेन, जे.बी. कृपलानी, तुकडोजी महाराज यांच्यासह अनेक दिग्गज या बैठकीला उपस्थित होते.
या बैठकीत निर्णय घेण्यात आला की सर्वोदय संमेलनाचे स्वरूप हे मेळाव्यासारखे असेल. त्यात जात-पात, देशी-विदेशी, गरीब-श्रीमंत, उद्योगपती-शेतकरी असा कोणताच भेदाभेद राहणार नाही. तेच धोरण आजही कायम आहे.
सर्वोदय संमेलनांत सहभागी करुन घेताना कोणताच भेदाभेद राखला जात नाही. परंतु गांधी विचार ज्यांना मान्य नाही त्यांना मात्र या आयोजनातून टाळले जाते. मात्र ज्यांना गांधी जाणण्याची इच्छा आहे त्यांचे निश्चितच या ठिकाणी स्वागत होते.
वाराणसी येथून यंदाच्या संमेलनात उषा नामक महिला सहभागी झाली होती. आधी ती हिंसक होती मात्र गांधी वाचल्यानंतर तिच्यात मोठे परिवर्तन झाले. अशी अनेक उदाहरणं सांगता येतील.
सेवा संघाच्या माध्यमातून काय काम होते?
देशात गांधी विचारांना मानणाऱ्या व्यक्ती व संघटना यांचा सहभाग असणारी रचना म्हणजे सर्व सेवा संघ होय. प्रदेश, गाव तसेच जिल्हा स्तरावर सर्वोदय मंडळ काम पाहतात. सर्वधर्म समभाव रुजविणे, लोकशाही, संविधानाचे जतन, स्वावलंबी समाजाची उभारणी, खादी, ग्रामोद्योग यांचा प्रचार-प्रसार अशी कामे सर्वोदय मंडळाच्या माध्यमातून होतात.
गांधीजींनी १८ विचार दिले आहेत. त्यांचाही प्रसार संघाव्दारे होतो. नैसर्गिक शेतीला देखील गांधीजींनी प्रोत्साहन दिले होते. आज आपण परत त्याच शेतीकडे वळत आहोत. भारतातच नाही तर जागतिक स्तरावर हा विचार पोचावा याकरिता संघ प्रयत्नशील आहे.
विनोबा भावे यांच्या प्रयत्नातून भुदान चळवळ राबविली गेली. हा एक अभिनव प्रयोग होता. विनोबांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सुमारे ३८ लाख एकर जमीन दान करण्यात आली. भुमिहिनींना या जमिनीचे वितरण करण्यात आले. त्यातून त्यांना रोजगाराचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला.
डाकूंकडे आर्थिक स्त्रोत नसल्याने त्यांच्याकडे चरितार्थासाठी लुटमारीशिवाय इतर कोणताच मार्ग नव्हता. त्यांनाही समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम झाले. गरीब-श्रीमंतामधील दरी कमी व्हावी, या उद्देशाने काम झाले. अहिंसक समाजाची पायाभरणी करणे हा देखील मुख्य उद्देश होता. सर्वोदयी आजही भोगवादाविरोधात प्रचार करतात. त्यामुळेच सर्वोदयी हे जय जगतचा नारा देतात.
सर्वोदय संमेलन यंदा कोठे आयोजित करण्यात आले होते?
सर्वोदय मंडळाच्या स्थापनेला यंदा ७५ वर्ष पूर्ण झाली. त्या निमित्ताने ४८ वे सर्वोदय संमेलन वर्ध्यातील सेवाग्राममध्ये १४ ते १६ मार्च २०२३ या कालावधीत पार पडले. गांधींजींच्या वास्तव्याने हा भाग पावन झालेला आहे.
तसेच सेवाग्राम येथेच सर्वोदय मंडळ व सेवा संघ यांची स्थापना झालेली होती. त्यामुळे हे औचित्य साधून संमेलनाचे आयोजन सेवाग्राम येथे करण्यावर सर्वांचे एकमत झाले. संमेलन दरवर्षी आयोजित केले जात नाही. त्यामुळे स्थापनेला ७५ वर्षे झाली असली तरी संमेलन आयोजनाचे मात्र हे ४८ वे वर्ष आहे.
गरीब-श्रीमंत दरी कमी व्हावी यासाठी कोणते उपक्रम हाती घेण्यात आले?
विनोबा भावे यांच्या नेतृत्वात भुदान, ग्रामदान आंदोलन झाले. १९७० च्या दशकात जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण क्रांती आंदोलन झाले. त्यातून देशातील राजकीय पट बदलला.
चंबळ खोऱ्यातील डाकूंनी मुख्य प्रवाहात सहभागी व्हावे, याकरिता जयप्रकाश, विनोबा, सुब्बारावजी यांनी पुढाकार घेतला. याच्या जोडीला इतर रचनात्मक कामांसाठीही प्रयत्न करण्यात आले. आजही सेवा संघ, सर्वोदय मंडळातील सेवाधारी याच विचाराची कास धरून काम करत आहेत.
नजीकच्या काळातील सेवा संघाची उपलब्धी कोणती ?
२०१२ मध्ये आसाम मधील कोकडाझाड जिल्हयात कट्टर बोडो व मुस्लीम यांच्यात दंगल झाली. त्यात ११४ व्यक्तींची यावेळी निर्घुण हत्या करण्यात आली. याच जिल्हयात १२ हजार घरे उध्वस्त करण्यात आली. सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी तत्कालीन राज्यपाल जे.बी. पटनायक यांची भेट घेतली. दंगलग्रस्त भागात काम करण्याचा प्रस्ताव त्यांच्या समोर ठेवला.
परंतु त्यावेळची एकंदर तणावग्रस्त स्थिती पाहता त्यांनी सुरूवातीला परवानगी नाकारली. मात्र आम्ही गांधीवादी असून अहिंसेच्या माध्यमातून या प्रश्नावर तोडगा काढू असा विश्वास त्यांना दिला. तब्बल ४० मिनिटांच्या चर्चेनंतर त्यांनी सुरक्षा दलाच्या सोबत जाण्यास परवानगी दिली. परंतु सर्वोदयच्या पदाधिकाऱ्यांनी सुरक्षा नाकारली.
आमचा हा आत्मविश्वास पाहत अखेरीस राज्यपाल पटनायक यांनी त्या भागात जाण्यास परवानगी दिली. २०१२ ते २०१६ या कालावधीत सर्वोदयी कार्यकर्त्यांनी त्या भागात रचनात्मक काम उभे केले. दोन्ही समाजांतील विरोधाची धार कशी कमी करता येईल याकरिता प्रयत्न या काळात झाले.
दोन्ही समाजातील मुले, महिलांचा सहभाग असलेले मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. ध्यानाकर्ष सत्याग्रह यावेळी केला गेला. तुम्ही एकमेकाचे शेजारी होता आणि आता एकमेकांशी वैर बाळगून काय साधणार? असा प्रश्न त्यांना केला जात होता. महात्मा गांधी यांचे अहिंसवादी विचार त्यांच्यामध्ये बिंबविण्यात आले.
दंग्यामुळे विस्थापित झालेल्यांना त्यांच्या घरी परत आणले गेले. आम्ही सातत्याने काम करत राहिलो. त्यामुळे गेल्या सात वर्षांत त्या भागात एकही दंगल झाल्याची नोंद नाही. अशा प्रकारच्या रचनात्मक कार्यावर सेवा संघ, सर्वोदय मंडळांचा विश्वास आहे.
शांततेसाठी आणखी काय प्रयत्न केले जातात?
२०१६ मध्ये आसाम ते जम्मु-काश्मीर पर्यंत ९ प्रदेशांतून २९०० किलोमीटरची सायकल यात्रा काढण्यात आली. ती ५० दिवस चालली. शांतीचा संदेश देण्यासाठी अशा प्रकारच्या सायकल यात्रा अनेक राज्यांमध्ये काढल्या गेल्या.
सायकल यात्रा ज्या भागातून जात होती, त्या भागातील शाळांमधील मुलांमध्ये गांधी विचार बिंबविले जात होते. काही गावांमध्ये शांतता कमिटीची स्थापना करण्यात आली. आजही या कमिटीच्या माध्यमातून गाव स्तरावर शांतता नांदण्याचे काम होते.
ज्यावेळी गरज असेल त्यावेळी देशाच्या विविध भागात सायकल रॅली किंवा तत्सम उपक्रम राबविण्यावर आजही भर दिला जातो.
चंदन पाल- ९४३३०२२०२०
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.