डॉ मुकुंद शिंदेCybersecurity Challenges: अनोळखी नंबर वरून फोन येणे अधूनमधून चालूच असते. कधी फ्रॉड कॉल असतात, कधी कंपन्यांचे मेसेज असतात. मी शक्यतो अनोळखी नंबर वरून फोन घेण्याचे टाळत असे. परंतु नाशिकमधील एमआयडीसी कौशल्य विकास केंद्रामध्ये संचालक म्हणून रुजू झाल्यापासून माझे कामाचे स्वरूप बदलले, मित्रांचे नेटवर्क बदलले आणि अनोळखी नंबर वरून फोन येण्याचे प्रमाण वाढले आणि मला ते घेणे भाग पडू लागले. मी शक्यतो फोन बंद ठेवत नाही परंतु रविवारी दुपारी जेवण केल्यानंतर आराम करायच्या आधी फोन फ्लाइट मोडवर ठेवतो..मागील रविवारी मात्र गंमतच झाली. जेवण केल्यानंतर फोन फ्लाइट मोडवर ठेवायचा विसरलो आणि झोप लागली. तेवढ्यात एका अनोळखी नंबर वरून फोन आला. मी फोन घेतला. एक शेतकरी बोलत होता. त्याची एक समस्या होती आणि त्यासाठी त्याला मशीन पाहिजे होते. मी महात्मा फुले कृषी विद्यापीठात आहे असे समजून त्यांनी मला फोन केला. मी त्यांना म्हटलं, ‘‘साहेब, मी कृषी विद्यापीठातून निवृत्त होऊन दीड वर्ष झालं. माझा नंबर तुम्हाला कोणी दिला.’’.Artificial Intelligence: कोणाचीही वाट न बघता ‘एआय’ जलदपणे पुढे जातेय: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार.त्यावर त्या शेतकऱ्याचे उत्तर ऐकून मला धक्का बसला.‘‘साहेब, मी राहुरी विद्यापीठातील खूप नंबर्स गुगलवर, यू-ट्यूबवर शोधले. बऱ्याच फोनवर फोन लावले परंतु कोणी फोन उचलले नाही, कुणाचा लागला नाही. शेवटी मी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाची मदत घेतली आणि या तंत्राने मला सांगितले, तुम्ही डॉ. मुकुंद शिंदे यांना फोन करा ते तुमचा फोन निश्चित घेणार आणि ‘एआय’ने मला तुमचा फोन नंबर दिला आणि त्यामुळे मी त्यावर फोन केला आणि तुम्ही तो घेतला त्याबद्दल तुमचे आणि ‘एआय’चे पण धन्यवाद.’’ मी त्या शेतकऱ्याचा फोन उचलला, याचे त्याला फार विशेष वाटले नाही. परंतु ‘एआय’ने त्याला योग्य व्यक्तीचा संपर्क करून दिला त्याबद्दल त्याने ‘एआय’चे तोंड भरून कौतुक केले..ही गोष्ट वाटते तेवढी सोपी नाही. सामान्य शेतकऱ्यांमध्ये आज ‘एआय’बद्दल उत्सुकता निर्माण झालेली आहे. तो ‘एआय’चा वापर करू इच्छित आहे. किरकोळ समस्येपासून तर शेतीतील उत्पादकता वाढवणे, कीड, रोग निदान, मार्केट इंटेलिजन्स, खत, पाणी व्यवस्थापन यासाठी शेतकरी ‘एआय’ची मदत घेऊ पाहत आहे. महाराष्ट्र शासनाने कृषीसाठी ‘महा ॲग्री एआय पॉलिसी’च्या स्वरूपात टाकलेले पाऊल या दृष्टीने निश्चितच अभिनंदनीय आहे. आज स्मार्ट फोन वापरणारा प्रत्येक व्यक्ती अप्रत्यक्षपणे ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर करत आहे..Artificial Intelligence Technology: ‘एआय’चा वापर ; ठरेल लिंगभेदावर उत्तर.१९५६ साली पहिल्यांदा आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता या शब्दाचा जन्म झाला. परंतु इतकी वर्ष ‘एआय’ सुप्तावस्थेत पडलेले होते. त्याचे कारण म्हणजे त्यासाठी लागणारी कॉम्प्युटिंग पॉवर आणि डेटा. पर्सनल कॉम्प्युटरचा शोध लागल्यानंतर कॉम्प्युटिंग पॉवर झपाट्याने वाढत गेली. इंटरनेटचा शोध लागला. डेटा गोळा होऊ लागला. फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सॲप, ट्विटर, गुगल मॅप याद्वारे प्रचंड मोठ्या प्रमाणात डेटाचे एकत्रीकरण होऊ लागले. ‘एआय’च्या विकासासाठी पोषक वातावरण तयार झाले आणि हळूहळू ‘एआय’ने डोके वर काढायला सुरुवात केली..मानवी मेंदू हा नेहमी नावीन्याच्या शोधात असतो. परंतु यामध्ये काही शोध हे क्रांतिकारी असतात. ते पूर्ण समाज जीवन बदलून टाकतात. विजेचा शोध, यंत्रांचा शोध, पर्सनल कॉम्प्युटर, इंटरनेट, समाज माध्यमे या शोधांनी समाज जीवन पूर्णतः बदलून टाकले. परंतु या शोधांच्या शृंखलेमध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे तंत्रज्ञान विकासाचा वेग प्रचंड गतीने वाढत चाललेला आहे..सध्याच्या इंडस्ट्री ४.० क्रांतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, क्लाउड कॉम्प्युटिंग, थ्रीडी प्रिंटिंग, ब्लॉक चेन तंत्रज्ञान भविष्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात उलथा पालथ करून सामाजिक जीवनशैलीमध्ये अनाकलनीय बदल घडवून आणतील, असे या क्षेत्रातील तज्ञांचे उघड मत आहे. आज अतिशय अवघड वाटणाऱ्या बऱ्याच गोष्टी भविष्यात खूप सोप्या होतील. परंतु त्याचबरोबर आव्हाने पण वाढतील. कारण कोणतेही तंत्रज्ञान मनुष्य कसा वापरतो यावर त्याचे फायदे तोटे अवलंबून असतात. ‘एआय’मुळे खूप गंभीर आणि क्लिष्ट समस्या निर्माण होऊ शकतात. एक मात्र निश्चित सकारात्मक तसेच नकारात्मक दोन्ही बाजूंनी ‘एआय’ मानवाची झोप उडविणार. आज माझी उडविली उद्या सर्वांची...- डॉ. मुकुंद शिंदे,९४०३६०५९७९(माजी विभाग प्रमुख, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी आणि संचालक, एमआयडीसी कौशल्य विकास केंद्र, नाशिक).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.