

Ahilyanagar News : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती वर्षाच्या निमित्ताने त्यांचे जीवन आणि त्यांच्या कार्याचे सर्व पैलू देशवासियांना एकाच ठिकाणी पाहता व अनुभवता यावेत यासाठी श्रीक्षेत्र चौंडी विकासाचा सर्वसमावेशक असा बृहत विकास आराखडा तयार करावा, अशी सूचना विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी केली. विकास आराखड्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लवकरच बैठक घेणार आहेत, असे ते म्हणाले.
चौंडी (ता. जामखेड) येथे चौंडी बृहत विकास आराखड्याच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठक झाली. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, सिद्धराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. प्रा. राम शिंदे म्हणाले, की अहिल्यादेवी होळकर यांचे जीवन आणि कार्य हे निःस्वार्थ सेवा, प्रशासनिक कुशलता आणि धार्मिक सहिष्णुतेचे उत्कृष्ट उदाहरण आहे.
त्यांचे कार्य समाजातील प्रत्येकापर्यंत पोहोचविण्यासाठीच्या विकास आराखड्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लवकरच बैठक घेणार आहेत. त्यामुळे प्रशासनाने या विकासाचा सुंदर, आकर्षक व नाविन्यपूर्ण संकल्पनेतून आराखडा तयार करावा. बृहत विकास आराखडा तयार होताच मा. मुख्यमंत्री यांच्या समवेत या विषयासंदर्भात बैठक आयोजित करण्यात येणार आहे.
अहिल्यादेवी होळकर यांनी त्यांच्या जीवनात कृषी, व्यापार विकास, आदर्श राज्य कारभार, धार्मिक स्थळांचा विकास व संवर्धन आदी बाबींना प्राधान्य दिले. देशातील बारा ज्योतिर्लिंगाच्या जीर्णोद्धाराचे कार्यही त्यांनी केले. चौंडी येथील विकास कामातून अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची प्रेरणा सर्वदूर पोहोचण्याबरोबरच पर्यटनाला अधिक चालना मिळून रोजगार निर्मिती होण्याच्या दृष्टीने विविध बाबींचा आराखड्यात समावेश करावा.
विकासकामांसाठी चौंडी परिसरात असलेल्या शासकीय जमिनीची पाहणी, मोजणी करून त्याचा नकाशा तातडीने तयार करण्यात यावा. याठिकाणी बाराही महिने पाण्याची उपलब्धता राहील यासाठी नदी पुनरुज्जीवन व संवर्धनाचा समावेश आराखड्यात करण्यात यावा, अशी सूचना त्यांनी केली.
विकासकामांना गती
प्रा. राम शिंदे म्हणाले, की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन आणि कार्याचा आदर्श जनतेसमोर असावा व नवीन पिढीला त्यांच्या कार्याची जाणीव व्हावी या उद्देशाने चौंडी या गावाचा विकास करण्याच्या दृष्टीने अनेक विकास कामे हाती घेण्यात आली आहेत.
सद्यःस्थितीत प्रादेशिक पर्यटन योजना व ग्रामविकास विभागाच्या ग्रामीण भागातील गावांतर्गत मूलभूत सुविधा पुरविणे या दोन योजनांअंतर्गत चौंडी येथे २४ कोटी ११ लाख रुपये रकमेच्या कामांना प्रशासकीय मान्यता प्राप्त आहे. अहिल्याबाई होळकर यांचे जन्मगाव चौंडी येथील गढीचे नूतनीकरण करणे, नक्षत्र उद्यान, संरक्षण भिंत बांधणे, चौंडी येथे उद्यानातील गढी व परिसरातील शिल्प, मुख्य प्रवेशद्वार आदी कामे पूर्ण आहेत. तर संग्रहालय, सिना नदीवर पश्चिम बाजूस घाटाचे बांधकाम करणे आदी ९ कोटींच्या कामांना मंजुरी मिळाली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.