Nagpur News : विदर्भातील कृषी परिवर्तनाचे महत्त्वाचे माध्यम ठरत असलेले मध्य भारतातील सर्वांत मोठे ‘अॅग्रो व्हिजन’ हे कृषी प्रदर्शन येत्या २४ ते २७ नोव्हेंबर दरम्यान दाभा येथील पीडीकेव्ही मैदानात आयोजित करण्यात आले आहे. प्रदर्शनाचे हे १४ वे वर्ष असून यंदा गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होईल.
केंद्र सरकारचे पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसायमंत्री पुरुषोत्तम रुपाला, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल आणि पशुसंवर्धनमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, राष्ट्रीय दूग्ध विकास मंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. मीनेश शहा, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभागाच्या सचिव अलका उपाध्याय, तुकाराम मुंढे, मंत्री सुधीर मुनगंटीवार आदी मान्यवर उद्घाटनावेळी उपस्थित राहतील.
कृषी तंत्रज्ञान प्रशिक्षणाचे केंद्र ठरणाऱ्या कार्यशाळा, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील उत्कृष्ट अत्याधुनिक तंत्रज्ञान सादरीकरणाची दालने, कृषिविषयक ताज्या विषयांवरील कार्यशाळा, विदर्भाच्या शेती उद्योगाला नवी दिशा देणाऱ्या परिषदांसह तंत्रज्ञान संशोधनासाठी तसेच एमएसएमई व पशुधन ही विशेष दालने या प्रदर्शनाची वैशिष्ट्ये आहेत.
अॅग्रो व्हिजन फाउंडेशन, एमएमअॅक्टीव सायटेक कम्युनिकेशन, वेद, एमइडीसी, पूर्ती पॉवर अॅन्ड शुगर लि. यांच्या वतीने प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती अॅग्रो व्हिजनचे आयोजन सचिव रवी बोरटकर यांनी दिली. या वेळी रमेश मानकर, अॅग्रो व्हिजन फाउंडेशनचे सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. सी. डी. मायी, डॉ. पिनाक दंडे, डॉ. सुनील सहातपुरे उपस्थित होते.
प्रदर्शनात एकूण ३ परिषदा होतील. विदर्भात डेअरी उद्योगाच्या संधी, विदर्भात गोड्या पाण्यातील मत्स्य व्यवसाय संधी, ‘अन्न प्रक्रिया : मध्य भारतातील संधी आणि आव्हाने’ या विषयांचा त्यात समावेश असेल. कृषी व बिगरकृषी विद्यापीठातील विद्यार्थी, शेतकरी संशोधक, नव उद्योजकांना शेती विषयक संशोधन व स्टार्टअप बिझनेस मॉडेल या प्रदर्शनात मांडण्याची संधी असेल.
३० पेक्षा जास्त कार्यशाळा
‘ॲग्रो व्हिजन’चे प्रमुख आकर्षण असलेल्या नि:शुल्क कार्यशाळांमध्ये उत्पादन तंत्रज्ञान, नव्या शेतीपद्धती, जोडधंदे, अत्याधुनिक तंत्रज्ञान, बाजार सुविधा, पशुधन व्यवस्थापन आणि पायाभूत सुविधांविषयी भर देण्यात येणार आहे. समितीने निवडलेल्या ३० पेक्षा जास्त विषयांवर कार्यशाळा होतील. कृषी पर्यटन तसेच शेतीमध्ये कृत्रीम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर, शेतीसाठी ड्रोन तंत्रज्ञान, हवामान अंदाजाचे महत्त्व आदी विषयांवर मार्गदर्शन होईल.
ठिकाण : पीडीकेव्ही ग्राउंड, दाभा, नागपूर
प्रदर्शन कालावधी : २४ ते २७ नोव्हेंबर २०२३
वेळ : दररोज सकाळी ११ ते सायंकाळी ७ पर्यंत
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.