Khultabad Bribe News : राज्याचे कृषीमंत्री असलेल्या अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात संपूर्ण कृषी अधिकारी कार्यालयच लाचखोरीत (Bribery) दंग असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे.
लाचलुचपत प्रतिबंध विभागाने (Anti Corruption Bureau) (एसीबी) सोमवारी (ता. २७) केलेल्या कारवाईमध्ये खुलताबाद तालुका कृषी कार्यालयातील तीन महत्त्वाच्या अधिकाऱ्यांसह काही कंत्राटी कर्मचाऱ्यांना अटक (Arrest In Bribe) केली आहे.
लाचखोरीप्रकरणी कार्यालयातील सर्वच अधिकारी, कर्मचाऱ्यांना अटक झाल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात या प्रकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे.
गेल्या काही दिवसांत छ. संभाजीनगर जिल्ह्यात एसीबीच्या कारवायांचा धडाका सुरू आहे. अशाच कारवाईत अख्ख्या कृषी अधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना लाच प्रकरणी अटक केल्याने ही कारवाई चर्चेचा विषय बनली आहे.
ठिबक सिंचन साहित्य विक्रेत्याचे स्टॉक रजिस्टर चेक करण्यासाठी तसेच अनुदानप्राप्त ३५ फाईलींसाठी २४ हजार ५०० रुपयांची लाच घेणाऱ्या कृषी अधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करत अटक केली आहे.
या प्रकरणात तीन महत्त्वाचे वर्ग दोनचे अधिकारी आणि एका कंत्राटी ऑपरेटरचा समावेश आहे.
तालुका कृषी अधिकारी शिरीष रामकृष्ण घनबहादुर (वय 49 वर्षे), मंडळ कृषी अधिकारी विजयकुमार नरवडे (57 वर्षे), बाळासाहेब संपतराव निकम (57 वर्षे) आणि कंत्राटी ऑपरेटर सागर नलावडे (वय 24 वर्षे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
कृषी विभागाच्या पोकरा योजनेअंतर्गत विभागातील ३५ शेतकऱ्यांना तक्रारदार विक्रेत्याने कृषी ठिबक सिंचन साहित्य पुरविले होते. सदर साहित्यातील संचिका आरोपी कृषी अधिकारी विजयकुमार नरवडे यांच्यामार्फत सादर न करता परस्पर तपासून घेतल्या होत्या.
त्यामुळे स्टॉक रजिस्टर चेक करण्यासाठी व तक्रारदार यांच्याविरुद्ध आलेला माहिती अधिकार अर्ज फाईल करण्यासाठी तसेच अनुदान प्राप्त ३५ फाईलसाठी प्रत्येकी सातशे रुपये याप्रमाणे २४ हजार ५०० रुपयांची लाच अधिकाऱ्यांनी मागितली होती.
दरम्यान, विक्रेत्याने याबाबत एसीबी कार्यालयात तक्रार केली होती. विक्रेत्याच्या तक्रारीवरून एसीबीने सापळा लावला. अधिकाऱ्यांच्या मागणीनुसार कंत्राटी कर्मचारी सागर नलावडे याने लाचेची रक्कम स्विकारली.
तसेच एसीबीने अधिकची शहानिशा करत इतर आरोपी अधिकाऱ्यांनी देखील लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे चौघाही आरोपींना एसीबीने अटक केली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.