Agriculture Development: हवामानातील अनिश्चितता, उत्पादनातील घट, मजुरांची कमतरता आणि वाढते खर्च यामुळे शेतीसमोर अनेक आव्हाने उभी आहेत. अशा परिस्थितीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे ही काळाची गरज बनली आहे. यामध्ये ड्रोन तंत्रज्ञान (Drone Technology) हे एक क्रांतिकारी साधन म्हणून उदयास येत आहे. निकट भविष्यात भारतीय शेतीमध्ये ड्रोनचा वापर मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता आहे..ड्रोन म्हणजे मानवरहित उड्डाण करणारे यंत्र होय. हे यंत्र दूरस्थ नियंत्रणाद्वारे किंवा स्वयंचलित प्रणालीद्वारे उडविले जाते. सुरुवातीला ड्रोनचा वापर सैनिकी क्षेत्रात होत होता; परंतु आता शेती, उद्योग, आपत्ती व्यवस्थापन अशा विविध क्षेत्रांत त्याचा वापर वाढत आहे. भारतीय शेतीमध्ये ड्रोनचा सर्वात महत्त्वाचा उपयोग म्हणजे पीक निरीक्षण. ड्रोनद्वारे आकाशातून घेतलेल्या छायाचित्रांद्वारे संपूर्ण शेताचे एकाच वेळी निरीक्षण करणे सहज शक्य आहे. यामुळे शेतातील कीड-रोगग्रस्त क्षेत्र, पाण्याची कमतरता असलेले भाग इत्यादी समस्या लवकर ओळखता येतात..Agri Drone Mission: ‘महाराष्ट्र कृषी ड्रोन क्रांती मिशन’ला सुरुवात.ड्रोनचा दुसरा महत्त्वाचा उपयोग म्हणजे खत आणि कीटकनाशकांची फवारणी. पारंपरिक पद्धतीत फवारणीसाठी लागणारा जास्त वेळ आणि मजुरांची उपलब्धता या समस्या आहेत. परंतु ड्रोनद्वारे काही मिनिटांत एक एकर क्षेत्रावर अचूक आणि समान फवारणी करता येते. यामुळे वेळेची बचत होते, शिवाय फवारणीसाठीच्या रसायनांची २० ते ३० टक्के बचत होते. आधुनिक सेन्सरयुक्त ड्रोनच्या मदतीने मातीतील आर्द्रता, पोषक घटकांची कमतरता आणि पिकांवरील ताण यांची माहिती उपलब्ध होते. त्यामुळे योग्य प्रमाणात पाणी आणि खतांचा वापर याबाबत योग्यवेळी निर्णय घेणे सहज शक्य होते..विशेषतः दुर्गम आणि डोंगराळ भागात जिथे यंत्रे पोहोचू शकत नाहीत, तिथे ड्रोन प्रभावी ठरतील. यामुळे शेती अधिक सुलभ आणि कार्यक्षम होईल. ड्रोन तंत्रज्ञानामुळे शेतीमध्ये ‘प्रिसिजन फार्मिंग’ ही संकल्पना विकसित होत आहे. या पद्धतीत प्रत्येक क्षेत्राला आवश्यक तेवढेच पाणी, खत आणि कीडनाशके दिली जातात. त्यामुळे उत्पादन खर्च कमी होतो..विविधांगी वापर शक्यभारतीय शेतीमध्ये ड्रोनचा वापर केल्यास उत्पादन वाढीस चालना मिळण्याची शक्यता आहे. कारण ड्रोनमुळे पिकावर सतत निगराणी ठेवता येते आणि समस्यांवर तत्काळ उपाय करणे शक्य होते. यामुळे पिकांची गुणवत्ता आणि उत्पादन दोन्ही सुधारण्यास नक्कीच मदत मिळेल.ड्रोन तंत्रज्ञानाचा आणखी एक महत्त्वाचा उपयोग म्हणजे पीक विमा आणि दस्तऐवजीकरण. ड्रोनद्वारे घेतलेली छायाचित्रे विमा कंपन्यांना नुकसानाचे अचूक मूल्यांकन करण्यास मदत करतात. यामुळे शेतकऱ्यांना जलद आणि पारदर्शक पद्धतीने नुकसान भरपाई मिळू शकते..Agriculture Drone Technology: सेन्सर्स, जीपीएस, जीआयएस प्रणालीयुक्त ड्रोन .भारत सरकारनेही ड्रोन तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना सुरू केल्या आहेत. ‘किसान ड्रोन योजना’ सारख्या उपक्रमांद्वारे अनुदान दिले जात आहे. ड्रोनमुळे ग्रामीण भागात नवीन रोजगार संधीही निर्माण होत आहेत. ‘ड्रोन पायलट, डेटा विश्लेषक आणि ड्रोन सेवा केंद्र’ असे नवनवीन व्यवसाय उदयास येत आहेत. काही ठिकाणी महिला ‘ड्रोन दीदी’ म्हणूनही या क्षेत्रात कार्यरत आहेत, ज्यामुळे महिलांचे सक्षमीकरण होत आहे..निकट भविष्यात ‘Drone-as-a-Service’ (DaaS) ही संकल्पना अधिक लोकप्रिय होण्याची शक्यता आहे. या पद्धतीत शेतकरी स्वतः ड्रोन खरेदी न करता भाड्याने सेवा घेऊ शकतात. यामुळे लहान आणि मध्यम शेतकऱ्यांनाही या तंत्रज्ञानाचा लाभ मिळू शकतो. अर्धा एकर शेती असलेला एखादा शेतकरी देखील या माध्यमातून त्याचा फायदा घेऊ शकतात. त्यासाठी फवारणी पंप खरेदी करण्याची गरज नसेल. कारण, हा पंप वर्षातील ४० दिवस सुद्धा वापरला जात नाही. असे भांडवली खर्च कमी होण्याची शक्यता शेती क्षेत्रात सेवा क्षेत्र वाढल्यास निर्माण होईल..तथापि, ड्रोन तंत्रज्ञानाच्या वापरात काही आव्हानेही आहेत. ड्रोनच्या जास्त किंमती, तांत्रिक ज्ञानाचा अभाव, प्रशिक्षणाची गरज आणि नियमांची गुंतागुंत या काही प्रमुख अडचणी आहेत. तसेच भारतातील बहुतांश शेतजमिनी लहान तुकड्यांमध्ये विभागलेल्या असल्यामुळे ड्रोनचा प्रभावी वापर करणे काही वेळा कठीण ठरते. यासाठी सामूहिक शेती किंवा शेतकरी उत्पादक कंपन्यांची भूमिका महत्त्वाची ठरेल..एकंदरीत ड्रोन तंत्रज्ञानामुळे शेतीमध्ये मोठा बदल घडून येणार आहे. हे तंत्रज्ञान शेतीला अधिक कार्यक्षम, किफायतशीर आणि पर्यावरणपूरक बनवेल. भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), इंटरनेट ऑफ थिंग्स (IoT) आणि डेटा विश्लेषण यांच्याशी ड्रोनचे एकत्रीकरण झाल्यास शेती पूर्णपणे स्मार्ट होईल. थोडक्यात, ड्रोन तंत्रज्ञान हे भारतीय शेतीच्या विकासासाठी एक महत्त्वाचे साधन ठरू शकते. योग्य धोरणे, प्रशिक्षण आणि आर्थिक मदत मिळाल्यास हे तंत्रज्ञान ग्रामीण भारतात मोठी क्रांती घडवू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल, उत्पादन सुधारेल आणि देशाची अन्नसुरक्षा अधिक मजबूत होईल.shekharsatbara@gmail.com.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.