
Pune News : नैसर्गिक शेतीच्या नावाखाली काही कृषी अधिकारी भजन, कीर्तन तसेच परराज्यात दौरे आयोजित करू लागल्यामुळे कृषी आयुक्तालयात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ‘‘परराज्यात दौरा काढण्यासाठी एका अधिकाऱ्याने परवानगी मागितली होती. परंतु, दौरा नाकारण्यात आल्याने वैयक्तिक रजा काढून संबंधित अधिकारी दौऱ्यावर गेला आहे,’’ असे आयुक्तालयाचे म्हणणे आहे.
‘शून्य खर्चाची नैसर्गिक शेती’ अशी संकल्पना केंद्राने पुढे आणली आहे. ही संकल्पना राज्यानेदेखील स्वीकारली आहे. परंतु, नैसर्गिक शेती करायची म्हणजे नेमके काय करायचे, या बाबत राज्यभर कृषी अधिकाऱ्यांमध्येच संभ्रम आहे. त्यात पुन्हा नैसर्गिक शेती शिकायची असल्यास भजन, कीर्तन तसेच परराज्यांत दौरे करण्याची आवश्यकता असल्याचे काही कृषी अधिकारीच भासवत आहेत.
आयुक्तालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, मराठवाड्यातील एका जिल्हा अधीक्षक अधिकाऱ्याने आत्मा उपक्रमांतर्गत नैसर्गिक शेतीसाठी भजन, कीर्तन तसेच परराज्यात दौरा करण्यासाठी निधी देण्याचा प्रस्ताव पाठवला होता.
परंतु, आत्माच्या मार्गदर्शक नियमावलीत धार्मिक दौऱ्याची बाब येत नव्हती. त्यामुळे सदर प्रस्ताव नामंजूर करीत निधी नाकारण्यात आला आहे. तरीही या अधिकाऱ्याने रजा काढून परराज्यात दौऱ्याचे आयोजन केले आहे. यामुळे इतर जिल्ह्यांमधील अधिकारीदेखील दौरा आयोजनासाठी चाचपणी करू लागले आहेत.
सूत्रांच्या म्हणण्यानुसार, नैसर्गिक शेती ही संकल्पना राज्याच्या अनेक भागांमधील शेतकरी सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून वर्षानुवर्षे करीत आलेले आहेत. शेतकऱ्यांकडून बीजामृत, जीवामृत, आच्छादन आणि वाफसा अशा चतुःसूत्रीवर आधारित सेंद्रिय शेती केली जात आहे.
त्यामुळे या शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीकरिता उपयुक्त ठरणारे उपक्रम राबविणे, प्रात्यक्षिके घेणे, सेंद्रिय उत्पादकांचे गट तयार करणे अशा कामांमध्ये कृषी अधिकाऱ्यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. परंतु, ते सोडून नैसर्गिक शेतीच्या नावाखाली सहली काढण्याकडे अधिकाऱ्यांचा ओढा आहे.
‘‘नैसर्गिक शेतीच्या नावाखाली परराज्यात दौरा काढण्याचा प्रस्ताव आमच्याकडे आला होता. परंतु, या प्रस्तावाला मान्यता नाकारण्यात आली आहे. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्याने एक महिन्याची वैयक्तिक रजा मागितली होती. या रजेला कृषी आयुक्तांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे हा दौरा शासनाच्या निधीतून झालेला नसल्याचे स्पष्ट होते,’’ अशी माहिती आयुक्तालयातील सूत्रांनी दिली.
शेतकरीप्रिय अधिकारी असल्याचा दावा
नैसर्गिक शेतीसाठी धार्मिक दौरा आयोजनाचे प्रयत्न करणारा अधिकारी शेतकरीप्रिय आहे. मात्र, काही अधिकाऱ्यांना त्याची भूमिका पटत नसल्याने ते तक्रारी करतात, अशा शब्दात एका अधिकाऱ्याने संबंधित जिल्हा अधीक्षकाचे समर्थन केले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.