Satara News : सातारा जिल्ह्यातील ऊसदरप्रश्नी आज (ता. ३०) सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांच्या उपस्थितीत साताऱ्यातील नियोजन भवनमध्ये शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी, साखर कारखान्यांचे प्रतिनिधी यांची बैठक होणार आहे. त्यातून ऊसदराचा तोडगा निघेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.
साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू होऊन महिनाभराचा कालावधी होत आला. तरीही साखर कारखान्यांनी ऊसदर जाहीर केलेला नाही, असा आरोप करीत शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री शंभुराज देसाई यांना बैठक घेण्याचे आवाहन केले होते. त्या वेळी पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी बैठक घेतील, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार ही बैठक होत आहे.
उसाला योग्य भाव मिळावा, या साठी शेतकरी संघटनांच्या वतीने आंदोलन सुरू आहेत. त्यामुळे ऊस वाहतुकीची वाहने अडवून उसाला शेतकरी संघटनांकडून दर मागण्यात येत आहेत. या बैठकीत बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत यादव, ‘स्वाभिमानी’चे जिल्हाध्यक्ष राजू शेळके,
रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विकास जाधव, शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल खराडे, शेतकरी संघटना किसान मंचचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जाधव, मधुकर जाधव, महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष शंकर गोडसे यांना या बैठकीत अतिरिक्त जिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी निमंत्रित केले आहे.
‘‘जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आज (ता. ३०) सकाळी अकरा वाजता बैठक होत आहे. त्यास जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे अध्यक्ष, कार्यकारी संचालकांना निमंत्रित केले आहे. त्या बैठकीस कारखानदारांनी प्रतिनिधी पाठवू नये, स्वतः यावे,’’ असे आवाहन अतिरिक्त जिल्हाधिकारी पाटील यांनी केले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.